राज्यभरातील अनेक तृतीयपंथींचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश!
19-Mar-2025
Total Views |
मुंबई : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यभरातील अनेक तृतीयपंथींनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. बुधवार, १९ मार्च रोजी मुंबईत तृतीयपंथी समाजातील डॉ. सान्वी जेठवानी यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी तृतीयपंथी समाजातील डॉ. सान्वी जेठवानी, मयुरी आळवेकर, राणी ढवळे, पार्वती जोगी यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तृतीयपंथी संघटनेच्या प्रतिनिधींनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, "सर्वांनी पक्षात सक्रीय सदस्यता ग्रहण करावी. भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्वात ५ लाख किन्नर आणि तृतीयपंथी समाजातील सर्वांना पक्षाचे सदस्यत्व द्यावे. संपूर्ण महाराष्ट्रातील तृतीयपंथी समाजाचा एक मोठा मेळावा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. किन्नर समाजासाठी एक मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या माध्यमातून सरकारच्या योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. प्रत्येक जिल्हातील प्रमुखांना त्या त्या जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून पक्षात स्थान देऊ. तसेच चार ते पाच प्रमुखांना प्रदेशामध्येही स्थान देऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताच्या आणि देवेंद्रजींच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ देण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे."
तृतीयपंथी आघाडी तयार करणार!
"विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत याकरिता आपल्याला सर्व समाजांना जोडायचे आहे. सर्व समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचून शेवटच्या व्यक्तीला उजेडात आणायचे आहे. जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून स्थान देणार आहोत. जवळपास ५० पदाधिकाऱ्यांना आपण हे पद देणार असून त्यानंतर त्यांना समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष अधिकार मिळतील. जिल्ह्याजिल्ह्यात बैठका घेऊन आपण एक तृतीयपंथी आघाडी तयार करू आणि त्यासाठी राज्याचा एक संयोजक बनवू. तसेच प्रत्येक विभागाला एक सहसंयोजक देऊ. या माध्यमातून प्रत्येकाच्या अडचणी समजून घेऊन सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवू," असेही त्यांनी सांगितले.