बडगुजरांच्या पायात बेडी

18 Mar 2025 10:36:34

reshuffle in nashik ubt thackeray group sudhakar badgujar promoted to deputy leader
 
 
उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या जबर तडाख्यांनी उबाठा गटाचे बुरुज एकामागून एक ढासळू लागले आहेत. या बुरुजांची डागडुजी करणे अजूनही उद्धव ठाकरे यांना शक्य झालेले नाही. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या कामाचा आवाका पाहून, ठाकरेंचा एक एक मोहरा एकनाथ शिंदेंकडे डेरेदाखल होत असून, ठाकरे आणि त्यांच्या विश्वप्रवक्त्यांना हताशपणे बघण्यावाचून दुसरा पर्यायच राहिलेला नाही. कोकणातून राजन साळवी यांनी ठाकरेंना रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. तिकडे छत्रपती संभाजीनगरमधूनही ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली आहे. अनेक पदाधिकारी आणि माजी आमदार उबाठा गटाला सोडचिट्ठी देत इतर पक्षांची वाट धरत आहेत. राज्याच्या कानाकोपर्‍यातून अनेकजण पक्ष सोडत असताना नाशिक तरी कसे मागे राहणार? येथेही उबाठाच्या अनेक नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांनी पक्षाची साथ सोडत वेगळी वाट धरली.
 
त्यात विश्वप्रवक्ते संजय राऊत यांच्या अत्यंत जवळचे सहकारी आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर हेदेखील विधानसभा निवडणुकीत सीमा हिरे यांच्याकडून धोबीपछाड मिळाल्यानंतर पक्ष सोडणार असल्याची कुजबुज नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यांच्यासोबत इतरही पदाधिकारी हाती धनुष्यबाण घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यांनी वेगळा विचार करण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पायात बेडी अडकावण्याचे काम केले. सुधाकर बडगुजर यांना बढती देत उपनेतेपद बहाल केले गेले, तर माजी नगरसेवक डी. जी. सुर्यवंशी यांच्या गळ्यात जिल्हाप्रमुखपदाची माळ घातली. उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील पक्षफुटीला थोपवण्यात तात्पुरते यश मिळवले असले तरी, पुढे होऊन काम करणार्‍या बिनीच्या शिलेदारांनी ठाकरेंची साथ कधीच सोडली आहे. उरलेल्या बर्‍याचजणांची स्थिती तळ्यात-मळ्यात अशी आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणाच्या जीवावर लढायच्या, हा प्रश्न अजूनही ‘जैसे थे’ आहे. जनाधार संपलेल्या उबाठा गटाने सुधाकर बडगुजर यांच्या पायात उपनेतेपदाची बेडी जरी अडकाविण्याची कसरत केली असली, तरी येत्या काळात बडगुजर ती कायम ठेवतील का? हा प्रश्न नाशिकमधील राजकीय विश्लेषकांकडून उपस्थित केला जात आहे.
 
 
शाश्वत विकासाची कास
 
 
भविष्यात द्राक्षशेती करताना पाण्याची अडचण निर्माण होऊन द्राक्षबागा वाचवणे मुश्किल होईल, हे ओळखत द्राक्ष उत्पादकांनी ‘ड्रीप इरिगेशन’ची आधुनिक पद्धत वापरत पाण्याची बचत करत शेतीला फुलवले. शेतीसाठी नेहमीच पूरक हवामान राहिलेल्या नाशिकचा पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि सटाणा तालुक्याचा भाग काहीसा मागे होता. पावसाळ्यात भरपूर पाणी आणि उन्हाळ्यात कोरडेठाक, अशी परिस्थिती येथे पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे या भागाचा विकास काहीसा खुंटला होता. यासोबतच आपल्या उपजीविकेसाठी या भागातील लोकांना कायम रोजगाराच्या शोधात भटकंती करावी लागायची. मात्र, सरत्या दिवसांबरोबर तंत्रज्ञानाला आपलेसे करत पेठ-सुरगाण्यात स्ट्रॉबेरी, इगतपुरी-त्र्यंबकमध्ये भात, तर सटाणा तालुक्यात कांदा, डाळिंब, केळी आणि द्राक्ष ही पिके घेत शेतकरी शाश्वत शेतीकडे वळला. परंतु, काळाची पावले आणि बाजाराचा कल ओळखून शेती केली गेली, तर तोटा कमी होऊन अधिक समृद्ध होता येते. हे सध्या नाशिकमध्ये घडत असलेल्या प्रयोगावरून अधोरेखित होत आहे.
 
पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि सटाणा या भागातील शेतकरी शाश्वत उत्पन्नाचा स्रोत म्हणून रेशीमशेतीला प्राधान्य देत आहेत. येथे आतापर्यंत ३०० एकर क्षेत्रावर तुतीची लागवड झाली आहे. पिकांवर होणारा विविध रोगांचा प्रादुर्भाव व यानंतर हातात येणार्‍या पिकाला मिळणारा कमी दर या चक्रातून बाहेर पडत या आदिवासी भागातील शेतकर्‍यांनी शेतीला जोडधंदा म्हणून रेशीमशेतीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी ‘मनरेगा’च्या माध्यमातून रेशीमशेती करणार्‍या शेतकर्‍यांना एकरी ३ लाख, ९७ हजार रुपयांपर्यंत टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जाते. या आर्थिक पाठबळातून बहरलेल्या रेशीम शेतीतील कोशांना चांगला दर मिळत असल्याने ६१ लाखांची विक्री केल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. प्रतिकिलो रेशीम कोशांना ७५० इतका दर मिळत आहे. लागवड केल्यापासून फक्त तीन महिन्यांत उत्पन्न सुरू होत असल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान निर्माण झाले आहे. पहिल्या वर्षी ६० ते ९०, दुसर्‍या वर्षापासून दोन ते तीन लाख उत्पन्न आणि आपल्या शेतातच रोजगार मिळत असल्याने ’आदिवासी भाग’ ही ओळख पुसण्यात या भागातील शेतकरी नक्की यशस्वी होणार आहे.
 
 
 
विराम गांगुर्डे
 
Powered By Sangraha 9.0