नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्या - खा. म्हस्के यांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष

कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा मिळावा

    18-Mar-2025
Total Views |
 
on work of the new Thane railway station MP Mhaske draws the attention of the Railway Minister
 
ठाणे: ( on work of the new Thane railway station MP Mhaske draws the attention of the Railway Minister ) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडले जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रेल्वे विकासात गेल्या दशकभरात ऐतिहासिक बदल घडले आहेत. ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी, दिवा-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी, कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा द्यावा, कल्याण-पुणे लोकल करावी, दिवा-वसई लोकल सेवा वाढवावी, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या स्पेशल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवाव्यात, अशा विविध मागण्या ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्या.
 
रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवर संसदेत चर्चा करतांना खा. म्हस्के यांनी ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी, सोईसुविधा त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात आग्रही मागण्या केल्या. सुमारे १७२ वर्षांपूर्वी भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती. तो ऐतिहासिक क्षण आजही ठाणेकरांच्या आठवणीत जिवंत आहे. आता, देशाची पहिली बुलेट ट्रेनही ठाणे मार्गे मुंबईला जाणार आहे. विशेष म्हणजे मुंबई-ठाणे दरम्यान देशातील पहिली 'अंडर सी टनेल' म्हणजे समुद्राखालून जाणारा बोगदा बांधण्याचे ऐतिहासिक काम सुरू झाले आहे.
 
हे आधुनिक तंत्रज्ञान आजपर्यंत फक्त जगभरात केवळ पाच देशांकडे होतं, पण आता भारतही त्या यादीत सामील झाला आहे. हे शक्य झालं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि संपूर्ण रेल्वे विभागाच्या अथक प्रयत्नामुळे. त्यासाठी खा. म्हस्के यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच ठाणे आणि मुलुंड स्टेशनच्या दरम्यान नवीन स्टेशनचे काम सुरु आहे हे काम रेल्वे करीत आहे परंतु खर्च ठाणे महापालिका करीत आहे, त्याचा वाढीव खर्च रेल्वेने करावा व अधिकाऱ्यांना तसे निर्देश द्यावेत व नवीन रेल्वेच्या कामाला गती द्यावी. अशी विनंतीही खा. म्हस्के यांनी केली.
 
मोदी सरकारमुळे रेल्वे क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती
 
महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. पण महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला `पांढरा हत्ती' (निरुपयोगी प्रकल्प) म्हणून हिणवले होते. पण महाराष्ट्राच्या जनतेला `स्पीड ब्रेकर' नव्हे, तर `एक्सप्रेस वे' सारखा वेगवान विकास हवा आहे. महाविकास आघाडीचा विकास म्हणजे इंजिन शिवाय धावणारी ट्रेन होती. `भ्रष्टाचार एक्सप्रेस' गतीने ती धावत राहिली आणि खरा विकास प्लॅटफॉर्मवरच उभा राहिला. आज मोदी सरकारच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात रेल्वे क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती होत असल्याचे सांगुन खा. नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्रातील रेल्वे सेवेला अधिक वेग आणि सुरक्षितता देण्यासाठी रेल्वे मंत्र्यांकडे विविध मागण्या केल्या.