यंदा देशात बहुतांश ठिकाणी होळी आणि धुलिवंदनाचा सण शांततामय वातावरणात पार पडला असला तरी, झारखंडमध्ये मात्र धर्मांधांनी हिंदूंच्या मिरवणुकीवर केलेल्या हल्ल्यामुळे गालबोट लागले. पण, त्याहीपेक्षा शरमेची आणि तितकीच धक्कादायक बाब म्हणजे, सोरेन सरकारने हिंदूंवर फौजदारी गुन्हे दाखल केले आणि धर्मांधांना पाठीशी घातले.
झारखंडमधील गिरिडीह येथे होळीच्या सणानिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर हल्ला होण्याची घटना दि. १४ मार्च रोजी घडली. ही मिरवणूक एका मशिदीजवळ असलेल्या लहानशा गल्लीतून जात असताना मिरवणुकीवर हल्ला करण्यात आला. होळीनिमित्त काढण्यात येणारी ही मिरवणूक दरवर्षी त्याच मार्गावरून जात असते. पण, यंदा ही मिरवणूक त्या मार्गावरून जात असताना त्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. यावेळी काचेच्या बाटल्यांचा, पेट्रोल बॉम्बचा मारा करण्यात आला. अधिकार्यांनी ही मिरवणूक थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, मिरवणुकीत सहभागी झालेल्यांनी नेहमीच्याच मार्गावरून मिरवणूक जाईल, असे निक्षून सांगितले. मिरवणूक तेथून जाऊ लागताच त्या भागात असलेल्या मशिदीमधून आणि आसपासच्या परिसरातून मिरवणुकीवर हल्ला झाला. या हिंसाचाराचे लोण अन्यत्र पसरले. हिंसाचारात काही वाहने पेटवून देण्यात आली. मुस्लीम समाजाकडून आगळीक झाली असताना, पोलिसांनी मात्र जो एफआयआर नोंदविला, त्यामध्ये मिरवणुकीत सहभागी झालेल्यांनी त्या गल्लीत घुसण्याचा गुन्हा केल्याची नोंद केली! मिरवणुकीत सहभागी झालेल्या हिंदू समाजाने त्या गल्लीत प्रवेश करून फौजदारी गुन्हा केल्याचा ठपका एफआयआरमध्ये नोंदवण्यात आला आहे. मिरवणुकीवर हल्ला केला मुस्लीम समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी. मात्र, एफआयआरमध्ये ठपका ठेवला हिंदू समाजावर! हा सर्व चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार झाला! झारखंडमधील सोरेन सरकार मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी किती खालच्या थराला जाऊ शकते, हे या घटनेवरून दिसून येते.
दि. १४ मार्च रोजी घोरथाम्बा पोलीस ठाण्यामध्ये या घटनेच्या एफआयआरची (नंबर ६६/२५) नोंद करण्यात आली. ‘भारतीय न्याय संहिते’च्या विविध कलमांखाली संशयितांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. होळी खेळणारा गट मशीद असलेल्या गल्लीतून जाण्याचा प्रयत्न करीत होता. ती संध्याकाळच्या नमाजाची वेळ असल्याने मुस्लीम समाज तेथे मोठ्या संख्येने जमला होता. होळी खेळणार्या गटास रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्या गटाने “हा आमचा नेहमीचाच मार्ग आहे,” असे सांगून त्याच मार्गाने जाण्याचा आग्रह धरला. मिरवणूक त्या गल्लीतून पुढे जाऊ लागताच दुकानदारांनी, आजूबाजूच्या लोकांनी आणि मशिदीमध्ये जमलेल्यांनी हिंदू गटावर हल्ला केला. हिंदू गटाने परवानगी घेऊन काढलेल्या मिरवणुकीला रोखण्याचा प्रयत्न पोलीस कसा काय करतात? तसेच हिंदू समाजावर गुन्हा केल्याचा ठपका कसा काय ठेवतात? हेमंत सोरेन सरकार राज्यातील जातीय तणावाची परिस्थिती हाताळताना हिंदू समाजावरच ठपका कसा काय ठेवते? गल्लीत प्रवेश केल्याचा गुन्हा केल्याचा ठपका ठेवला जातो, पण ज्या मुस्लीम समाजाने या गटावर हल्ला केला, ते या घटनेला जबाबदार नाहीत काय? एफआयआरमध्ये त्यांनी केलेल्या दगडफेक आणि अन्य हल्ल्यांची नोंद नको का? मशीद गल्लीच्या मागे असलेल्या एका हिंदू मंदिरावर मुस्लिमांकडून हल्ला करण्यात आला. पण, त्याबद्दल मात्र सोरेन सरकार मौन बाळगून आहे. असे का? हिंदू समाजाच्या मिरवणुकींना पुरेसे संरक्षण न देण्याचा पक्षपातीपणा सोरेन सरकारने केल्यानेच तेथे दंगल उसळली, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही!
गुजरात प्रांताचे ‘सीमा संघोष!’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुजरात प्रांताने बनासकांठा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या नदाबेत या ठिकाणी ‘सीमा संघोष’ (घोषवादन) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संघाच्या गुजरात प्रांताचा घोष विभाग, ‘सीमा जागरण मंच’, ‘सीमा सुरक्षा दल’ आणि ‘गुजरात पर्यटन विभाग’ यांनी मिळून दि. १६ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संघाच्या घोषवादनाच्या माध्यमातून राष्ट्रीय भावना, अनुशासन आणि ऐक्य यांचे महत्त्व ठसविण्याच्या हेतूने या घोषवादनाचे आयोजन करण्यात आले होते. या घोषवादन उपक्रमात २३९ घोषवादक सहभागी झाले होते. या कार्यक्रमास सुमारे दोन हजार प्रेक्षक उपस्थित होते. घोषपथकाने ‘मीरा’, ‘संजीवनी’, ‘तिलककामोद’, ‘हंसध्वनी’, ‘केदार’, ‘जन्मभूमी’, ‘जयोस्तुते’, ‘शिवरंजिनी’, ‘श्रीराम’, ‘चेतक’, ‘विनायक’, ‘वीरश्री’, ‘दशमेश’ आदी रचनांचे वादन करून उपस्थित प्रेक्षकांना आपल्या वादनाने भारावून टाकले. ‘सीमा सुरक्षा दला’च्या ‘रिट्रीट प्लेस’वर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारत-पाकिस्तान सीमाभागात झालेल्या या घोषवादनाने उपस्थित राष्ट्रभावनेने भारून गेले. सीमाभागात झालेल्या या घोषवादन कार्यक्रमाने उपस्थित प्रभावित झाले. याप्रसंगी बोलताना पश्चिम क्षेत्र संघचालक आणि ‘गुजरात सीमा जागरण मंचा’चे अध्यक्ष डॉ. जयंतीभाई भडेसिया यांनी “सीमाभागात राहणारी जनता राष्ट्रीय सुरक्षा राखण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे,” असे सांगितले. “सीमाभागातील जनता आणि अन्यत्र राहणारी जनता यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ झाले पाहिजेत. राष्ट्रीय ऐक्य राखणे ही सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे,” असे डॉ. भडेसिया यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास गुजरात प्रांताचे संघाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच ‘सीमा सुरक्षा दला’चे अनेक ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जपानमध्ये छत्रपतींचा पुतळा
जपानची राजधानी असलेल्या टोकियो शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अलीकडेच अनावरण करण्यात आले. यानिमित्ताने भारत आणि जपान यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा ४५० किलो वजनाचा असून जपानमध्ये हा पुतळा आणण्याआधी भारतातील १३ राज्यांमधून तो नेण्यात आला होता. सुमारे आठ हजार किमीचा प्रवास केल्यानंतर या पुतळ्याचे जपानमध्ये आगमन झाले. दि. ८ मार्च २०२४ रोजी या पुतळ्याचे औपचारिक अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास जपानचे सम्राट नारुहितो हे उपस्थित होते. पुण्याचे शिल्पकार विवेक खटावकर आणि त्यांची दोन मुले विपुल आणि विराज यांनी हा पुतळा घडविला आहे. भूकंप किंवा त्सुनामी अशा नैसर्गिक आपत्तींची जराही झळ या पुतळ्यास बसणार नाही, असे तंत्रज्ञान वापरून हा पुतळा तयार करण्यात आला आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धकौशल्य, प्रशासकीय कौशल्य, त्यांची राजनैतिक मुत्सद्देगिरी, त्यांची लष्करी नीती आदींचा जपानमधील जनतेला जवळून परिचय होणार आहे.
जहाल मुस्लीम नेत्याची पाकिस्तानमध्ये हत्या
बंदी घालण्यात आलेल्या ‘लष्कर-ए-इस्लाम’ या संघटनेचा संस्थापक आणि जहाल धर्मांध मुस्लीम धर्मप्रसारक मुफ्ती मुनीर शाकीर हा गेल्या शनिवारी पेशावर जिल्ह्यातील अरमार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात जखमी झाल्याने मरण पावला. मुफ्ती शाकीर यास मारण्याच्या हेतूने आयईडी स्फोट घडविण्यात आला. या धर्मांध शाकीरच्या हत्येसंदर्भात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सामाजिक द्वेष पसरविल्याबद्दल या धर्मगुरूला त्याच्या गावातून हाकलून देण्यात आले होते. खैबर एजन्सीमधील १२ तहसील येथे स्थायिक होण्याचा निर्णय त्याने घेतला होता. तेथे काही काळानंतर त्याने त्याचे स्वतःचे रेडिओ केंद्र सुरू केले होते आणि त्याद्वारे तो आपल्या समर्थकांना जहाल धर्मांध बनविण्यासाठी मार्गदर्शन करीत होता. एकीकडे धर्मांध अशा मुफ्ती शाकीर याची हत्या होण्याची घटना घडली असताना, पाकिस्तानमध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’चा अतिरेकी अबू कातल आणि त्याच्या सशस्त्र शरीर संरक्षकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जम्मू-काश्मीरमध्ये राजौरी येथे जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या हल्ल्यासंदर्भात राष्ट्रीय तपासयंत्रणेने अतिरेकी अबू कातल याच्यावर आरोपपत्र ठेवले होते. त्या अतिरेक्याची पाकिस्तानमधील मांगला-झेलम मार्गावर हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्याच्या मोटारीवर गोळीबार केला. दि. १५ मार्च २०२४ रोजी रात्री ही घटना घडली. इस्लामाबादस्थित ‘न्यूज इंटरनॅशनल’ने हे वृत्त दिले आहे. अबू कातल याचे खरे नाव झिया उर रहमान असे आहे. तो एका काळ्या रंगाच्या जीपमधून जात असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. अबू कातल आणि त्याचा शरीर संरक्षक जागीच ठार झाले. या हत्येसंदर्भात एका संशयितास पकडण्यात आले असल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यास अधिकृत दुजोरा मात्र देण्यात आलेला नाही. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दि. १ जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या हल्ल्यासंदर्भात राष्ट्रीय तपासयंत्रणेने एकूण पाचजणांविरुद्ध आरोपपत्र ठेवले होते. त्यातील प्रमुख सूत्रधार आता मारला गेला आहे.