डोंबिवलीच्या कोपर खाडीत 'या' दुर्मीळ पक्ष्याचे दर्शन; महाराष्ट्रातील पहिलीच छायाचित्रित नोंद

18 Mar 2025 08:59:20
pallas grasshopper warbler



मुंबई (अक्षय मांडवकर) - 'पलासचा गवती वटवट्या' या पक्ष्याची महाराष्ट्रामधून पहिलीच छायाचित्रित नोंद करण्यात आली आहे (pallas grasshopper warbler). रविवार दि. १६ मार्च रोजी डोंबिवलीतील कोपरच्या खाडीत या पक्ष्याचे दर्शन घडले (pallas grasshopper warbler). 'पलासचा गवती वटवट्या' हा लांब पल्ल्याचा हिवाळी स्थलांतरी पक्षी असून तो पूर्व पॅलेआर्क्टिकपासून आग्नेय आशियात स्थलांतर करतो. (pallas grasshopper warbler)
 
महाराष्ट्रातील पक्षीनिरीक्षणाची चळवळ जोर धरु लागली आहे. त्यामुळे काही पक्ष्यांच्या दुर्मीळ नोंदी समोर येऊ लागल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेशात पक्षीनिरीक्षकांचे जाळे तयार झाल्यामुळे अनेक पक्ष्यांच्या नोंदी होत आहेत. डोंबिवलीच्या खाडी प्रदेशातून 'पलासचा गवती वटवट्या' या दुर्मीळ पक्ष्याची नोंद झाली आहे. रविवार पहाटे पक्षी शास्त्रज्ञ डाॅ. राजू कसंबे हे आपला मुलगा डाॅ. वेदांत कसंबे यांच्यासोबत कोपर खाडीत पक्षीनिरीक्षणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना त्याठिकाणी उंच वाढलेल्या हिरव्या गवतामध्ये छोट्या पक्ष्याची हालचाल दिसली. इतर वटवट्या पक्ष्यांपेक्षा तो वेगळा जाणवल्याने कसंबे यांनी त्याचे निरीक्षण केले. सुरुवातीला त्यांना हा पक्षी ल्युसिस्टिक वटवट्या वाटला. मात्र, त्याची मधुर शीळ यापूर्वी त्यांनी कधीही न ऐकलेली होती. त्याचवेळी कसंबे यांना या पक्ष्याच्या वरच्या बाजूला असणाऱ्या ठळक रेषा दिसल्या. सूक्ष्म निरीक्षणाअंती हा पक्षी 'पलासचा गवती वटवट्या' असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर डाॅ. वेदांत कसंबे यांनी बड्या संयमाने तासभर बसून या पक्ष्याचे छायाचित्र टिपले. डाॅ. वेदांत कसंबे हे पशुवैद्यक असून ते वाईल्डलाईफ हेल्थ मॅनेजमेंट या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहेत.

२००२ साली लोणावळ्यात हा पक्षी पाहिल्याची नोंद असून त्याचे छायाचित्र उपलब्ध नाही. त्यामुळे डोंबिवलीत नोंदवलेल्या 'पलासचा गवती वटवट्या' पक्ष्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच छायाचित्रित नोंद असल्याची माहिती डाॅ. राजू कसंबे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. 'पलासचा गवती वटवट्या' हा लांब पल्लाचे हिवाळी स्थलांतर करतो. अल्ताई पर्वत, मंगोलिया, ट्रान्सबाइकलिया, ईशान्य चीन, कोरियन द्वीपकल्प आणि ओखोत्स्क समुद्रातील बेटांवर हा पक्षी प्रजनन करतो. त्यानंतर हिवाळ्यात हे पक्षी पूर्व भारत, बांग्लादेश, म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि अंदमान-निकोबार बेटांवर स्थलांतर करतात. सध्या या पक्ष्याला बघण्यासाठी डोंबिवलीच्या कोपर खाडीत पक्षीनिरीक्षणाची रिघ लागली असून केवळ काही मिनिटांसाठी तो आपले दर्शन पक्षीनिरीक्षकांना देत आहे.

पक्ष्याचे वैशिष्ट्य
पलासचा गवती वटवट्या हा अत्यंत बुजरा पक्षी आहे. इतर वटवट्या पक्ष्यांप्रमाणे तो वाळलेल्या गवतामध्ये राहत नसून हिरव्या ओलसर गवतांमध्ये राहणे पसंत करतो. या गवतांमधील दाट झाडीत तो लपून बसतो. मधुर शीळ देत गवतामध्ये आपले अस्तित्व तो दर्शवत असतो. या पक्ष्याच्या वरच्या बाजूला जाड रेषा आहेत. तसेच शेपटीकडचा भाग आणि पिसांना पांढरी किनार आहे. त्याची शेपूट गंज लागलेल्या धातूच्या रंगासारखी आहे.
Powered By Sangraha 9.0