तयारी परीक्षेची ...

18 Mar 2025 10:52:56

exam anxiety stratergies and study techniques for children
 
 
 
पालक म्हणून आपल्या मुलांना परीक्षेची तयारी करताना पाहणे, ही काहीजणांसाठी कदाचित एक तणावपूर्ण गोष्टही असू शकते. कारण, आजच्या स्पर्धात्मक युगात चांगले गुण मिळवण्याचा दबाव फक्त विद्यार्थ्यांवरच नाही, तर तो पालकांवरही असतो. पण, या कठीण काळात आपण आपल्या मुलांना सर्वोत्तम साहाय्य कसे करू शकतो? अभ्यासयोग्य वातावरण निर्माण करण्यापासून सकारात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यापर्यंत पालक म्हणून आपण आपल्या मुलांना परीक्षेदरम्यान चांगली कामगिरी करण्यास मदत करू शकतो. या लेखात आम्ही तुम्हाला काही उपयुक्त ‘टिप्स’ आणि उपाय सांगणार आहोत, जे तुमच्या मुलाला आत्मविश्वासाने आणि यशस्वीपणे परीक्षा देण्यास मदत करतील.
 
परीक्षेची प्रभावी तयारी करण्यासाठी सुयोग्य अभ्यासाचे वेळापत्रक सर्वप्रथम आवश्यक आहे. परीक्षेपूर्वी तुमच्याकडे किती वेळ उपलब्ध आहे, हे विचारात घ्या आणि अभ्यासाचे तास त्यानुसार वाटून द्या. पालकांनी मुलांना परीक्षेची तयारी खूप आधीपासून सुरू करण्यास मदत केली पाहिजे. त्यामुळे परीक्षेसाठी उपयुक्त मानसिक पार्श्वभूमी तयार होते. अभ्यासाचे वेळापत्रक लहान, व्यवस्थित विभागांमध्ये विभाजित करा. लहान व एकाग्रतेने केलेले अभ्यास सत्र मोठ्या व विस्कळीत अभ्यास सत्रांपेक्षा अधिक प्रभावी ठरते. मोठ्या अभ्यास सत्रांमुळे बर्‍याच वेळा मानसिक थकवा जाणवतो व पटकन आठवत नाही. दररोज थोडा अभ्यास करणे परीक्षेच्या आदल्या रात्री घाईघाईने अभ्यास करण्यापेक्षा कधीही अधिक फायदेशीर ठरते.
 
उदाहरणार्थ, एखादे प्रकरण पूर्ण करणे किंवा ठराविक संख्येने सराव प्रश्न सोडवणे असे उद्दिष्ट ठरवा. मेंदूला विश्रांती व नवचैतन्य मिळण्यासाठी मधून-मधून थोडी विश्रांती घ्या. प्रत्येक विषयाला त्याच्या महत्त्वानुसार आणि तुमच्या समजुतीच्या पातळीवरून वेळ द्या. सर्व विषयांचा पुरेसा अभ्यास होईल, याची खात्री करा. पालकांनी मुलांना स्वतःची काळजी कशी घ्यावयाची, हे परीक्षेदरम्यान शिकवले पाहिजे. अभ्यासाच्या तयारीसह, परीक्षेच्या काळात स्वतःची काळजी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
 
झोपेला प्राधान्य द्या
 
गुणवत्तापूर्ण झोप मेंदूच्या कार्यासाठी आणि भावनिक स्थैर्यासाठी अत्यावश्यक आहे. परीक्षेच्या काही आठवड्यांपूर्वी दररोज सात ते नऊ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. अपुरी झोप एकाग्रतेवर आणि स्मरणशक्तीवर मोठा परिणाम करू शकते, ज्यामुळे तणाव आणखी वाढू शकतो.
 
संतुलित आहार ठेवा
 
योग्य आहार मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, आणि प्रथिनेयुक्त पदार्थ असलेला आहार ऊर्जेची पातळी आणि मेंदूचे कार्य वाढवतो. जास्त प्रमाणात कॅफिन, चहा आणि साखरयुक्त पदार्थ टाळा. कारण, त्यामुळे ऊर्जेतील चढ-उतार आणि मूडमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते.
 
नियमित व्यायाम करा
 
हा शारीरिक हालचाल तणाव कमी करण्यासाठी प्रभावी उपाय आहे. वेगाने चालणे, योगाभ्यास किंवा नृत्य यांसारखे व्यायाम तणाव कमी करण्यास आणि मूड सुधारण्यास मदत करतात. मानसिक आरोग्यासाठी आठवड्यात काही वेळा किमान ३० मिनिटे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.
 
सविश्रांती तंत्रांचा वापर करा
 
‘माईंडफुलनेस’ आणि विश्रांतीसाठीचे तंत्र तणाव कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. खोल श्वासोच्छ्वास, ध्यान आणि स्नायू विश्रांती यांसारख्या तंत्रांचा अवलंब करा. काही मिनिटांचे सखोल श्वसनदेखील चिंता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
बर्‍याच विद्यार्थ्यांची अभ्यासाची आधीची तयारी बरी असते; पण परीक्षेच्या दिवसांत नेमकी त्यांची गडबड होते. प्रभावी तयारीच्या पद्धती अवलंबून, स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य देऊन आणि तणाव व्यवस्थापनतंत्रांचा सराव करून विद्यार्थी परीक्षेच्या भीतीवर मात करू शकतात आणि आपली कामगिरी सुधारू शकतात.
 
 
परीक्षेसाठी सर्वोत्तम अभ्यासतंत्रे कोणती आहेत?
 
प्रत्येकाची अभ्यासाची स्वतःची अशी प्रभावी पद्धत असते. तांत्रिकदृष्ट्या उजळणी आणि सक्रिय पुनरावलोकन (Active Recall), टप्प्याटप्प्याने अभ्यासाची पुनरावृत्ती-उजळणी (Spaced Repetition), संक्षेपीकरण संक्षिप्त, सार, (Summarization) ही प्रभावी अभ्यासतंत्रे आहेत.
 
पोमोडोरो तंत्राचा अवलंब करा (Pomodoro Technique) :
पोमोडोरो तंत्र म्हणजे २५ मिनिटे संपूर्ण लक्ष केंद्रित करून अभ्यास करणे आणि त्यानंतर पाच मिनिटांची लहानशी विश्रांती घेणे. हा प्रक्रिया सतत चक्रांमध्ये चालू ठेवली जाते. चार चक्रे पूर्ण केल्यानंतर, तुम्ही थोडी मोठी विश्रांती घेऊ शकता. हे तंत्र परीक्षेच्या तयारीदरम्यान कार्यक्षमता वाढवते आणि मानसिक थकवा टाळण्यास मदत करते.
 
 
परीक्षेसाठी दिवसाला किती तास अभ्यास करावा?
 
हे वैयक्तिक क्षमतेवर अवलंबून असते, परंतु चार-सहा तास एकाग्रतेने, आवश्यक विश्रांती घेत अभ्यास करणे आदर्श आहे.
परीक्षा काळात स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी कोणते अन्न उपयुक्त आहे?
सुका मेवा (बदाम, अक्रोड), बेरी फळे, मासे आणि हिरव्या पालेभाज्या मेंदूच्या कार्यक्षमतेस चालना देतात.
अभ्यास करताना चालढकल (procastination) कशी टाळावी?
कामाचे छोटे भाग पाडा. स्वतःसाठी अंतिम मुदती (deadlines) ठेवा आणि विचलित करणार्‍या गोष्टी दूर करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
 
 
परीक्षेचा तणाव त्वरित कसा कमी करावा?
 
सखोल श्वासोच्छवासाचा सराव करा. थोडी विश्रांती घ्या आणि हलकी शारीरिक हालचाल करा. यामुळे तणाव त्वरित कमी होईल.
परीक्षेचा तणाव हा विद्यार्थ्यांकरिता एक सर्वसामान्य अनुभव असला, तरी तो त्यांच्या शैक्षणिक प्रवासावर नकारात्मक वर्चस्व गाजवू नये, याची खबरदारी पालकांनी व शिक्षकांनी घ्यायला हवी. लक्षात ठेवा, उद्दिष्ट केवळ शैक्षणिक यश मिळवणे नसून, जीवनात संतुलन राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आव्हानांना सामोरे जा. अनुभवांमधून शिका आणि तणाव व्यवस्थापन हे वेळेनुसार विकसित करता येणारे कौशल्य आहे, हे लक्षात ठेवा. या साधनांसह तुम्ही परीक्षेला आत्मविश्वास आणि शांततेने सामोरे जाऊ शकता.
 
 
 
 
डॉ. शुभांगी पारकर
 
Powered By Sangraha 9.0