मुंबईच्या आर. ए. पोदार महाविद्यालय आणि एम. ए. पोदार रुग्णालयाच्या अधिष्ठातापदावर कार्यरत असलेल्या डॉ. संपदा संत यांच्या विचारकार्याचा घेतलेला मागोवा...
ऐंशीचे दशक होते. ती सातवीला होती आणि तिची शिष्यवृत्तीची परीक्षा होती. कधी एकदा परीक्षेचा पेपर हातात पडतो, असे तिला झाले होते. मात्र, परीक्षेच्या दिवशीच छोटासा अपघात झाला आणि तिच्या बरगड्यांमध्ये काच घुसली. बाबांनी तातडीने रुग्णालयात नेले. पाच टाके पडले. त्या मुलीने धैर्याने ठामपणे म्हटले, “मला परीक्षा द्यायची आहे” आणि तिने परीक्षा दिलीच. नांदेडच्या छोट्या गावा-खेड्यातली संगम गावची ती मुलगी. तोपर्यंत गावात वीज आणि वाहतुकीची साधनेही नव्हती. पण, १२ किमी चालत जाऊन तिने परीक्षा दिलीच. ते धैर्य, ती जिद्द आणि ठरवलेल्या कामाप्रति असलेली निष्ठा आजही त्या मुलीमध्ये कायम आहे. आज तीच मुलगी आर. ए. पोदार महाविद्यालय आणि एम. ए. पोदार रुग्णालयात अधिष्ठाता (डीन) या पदावर कार्यरत आहे. त्यांचे नाव आहे डॉ. संपदा संत. त्यांनी ‘बीएएमएस’ तसेच ‘फिजिओलॉजी’ (शरीरक्रिया विज्ञान) यामध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि पुढे याच विषयामध्ये ‘पीएच.डी.’ केली आहे. अधिष्ठाता पदानुसार त्यांना विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासह संपूर्ण महाविद्यालय आणि रुग्णालयाची जबाबदारी पार पाडावी लागते. यामध्ये पदवीचे शिक्षण घेणारे ५०० विद्यार्थी, तर पदव्युत्तर शिक्षण घेणारे १५० आणि ‘पीएच.डी.’ करणारे २५ असे ७५० विद्यार्थी असून, व्याख्याते आणि कर्मचारी यांची एकूण संख्या ४५० आहेत. अधिष्ठातापदाची जबाबदारी संपदा लीलया पार पाडत आहेत.
संपदा संत माहेरच्या अलका संगमकर. देशस्थ ब्राह्मण असलेले संगमकर कुटुंब मूळचे नागपूरचे. अलका यांचे आजोबा वासुदेव शास्त्री हे नागपूर येथे भोसले-पेशवे यांच्या दरबारी दिवाणजी होते. त्यावेळी संगमकर कुटुंबाचे सोन्याचे दिवस होते. मात्र, आजोबांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आर्थिक घाला आला. अचानक आलेल्या या दिवसांना त्यांचे पुत्र रामचंद्रराव यांनी हिमतीने उत्तर दिले. ते काम करून शिकू लागले. याच काळात ते रा. स्व. संघाच्या शाखेत जाऊ लागले. देश, धर्म, समाज, संस्कृती यांबद्दल त्यांची बैठक ठाम झाली. पुढे कामानिमित्त ते नांदेडला आले. तिथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करू लागले. त्यांची पत्नी प्रमिला ही अत्यंत सहनशील, प्रेमळ गृहिणी. उभयतांना पाच अपत्ये. त्यांपैकी एक अलका. संगमकर कुटुंब अत्यंत धार्मिक. बाबा संघाचे स्वयंसेवक असल्याने देश-धर्म-कर्म आणि संस्कार यांबाबत मुलांना आवर्जून माहिती देत. अलका यांची काकू लीलाबाई ही अत्यंत कर्तृत्ववान स्त्री. वयाच्या १६व्या वर्षी वैधव्य आल्यावर तिने संपूर्ण घरादाराचा डोलारा सांभाळत सगळ्या संगमकर कुटुंबीयांना स्नेहनात्यात गुंफून ठेवले. घरी संस्काराची श्रीमंती होती. मात्र, आर्थिक स्थिती साधारणच. मुलांच्या शिक्षणासाठी संगमकर कुटुंबीयांना शेती विकावी लागली. अगदी प्रमिलाबाईंचे मंगळसूत्रही विकावे लागले. लहानपणीची आठवण सांगण्यासारखी. बाबा कपड्याचा तागा आणायचे आणि त्यातून पाच भावंडांना कपडे शिवले जायचे. पुढे आई त्यांना साड्यांचा परकर-पोलका शिवून देऊ लागल्या.
बारावीनंतर ‘बीएएमएस’ला प्रवेश घेतल्यावर पंजाबी डे्रसची ओळख झाली. १२-१३ किमी पायपीट करत त्या शाळेत जायच्या. या सगळ्यांबाबत अलका यांचे काही म्हणणे नव्हते. कारण, काकू, आईबाबा म्हणत ‘शिक्षण हाच खरा दागिना आणि सद्गुण हेच खरे वैभव. आपली प्रगती ही देश-धर्म-समाजाच्या कल्याणासाठी असावी.’ या अशा संस्कारांत वाढल्याने अलका यांना आयुष्यात काय करायचे, याची दिशा मिळाली होती. आईबाबा आपल्या शिक्षणासाठी जीवाचे रान करतात. त्यांची इच्छा पूर्ण करायचीच, या हेतूने अलका मन लावून शिकत गेल्या. ‘बीएएमएस’ झाल्यानंतर काही वर्षे खासगी नोकरी केल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी लागली. दरम्यान, त्यांचा विवाह मुंबईच्या संदिप संत यांच्याशी झाला. पती आणि सासू मीना यांनी संपदा यांना खूपच सहकार्य केले. त्या बळावर संपदा यांनी ‘पीएच.डी.’चे शिक्षणही पूर्ण केले. पुढे ‘एमपीएससी’ परीक्षा दिली. साहाय्यक प्राध्यापक आणि त्यानंतर प्राध्यापक पदावर रूजू झाल्या. अत्यंत कणखर असलेल्या संपदा मनाने तुटल्या त्या आईच्या मृत्यूने. याच काळात त्यांचा संपर्क प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाशी झाला. अध्यात्म, ध्यानधारणा यांमुळे त्या सावरल्या. आज त्या ‘अधिष्ठाता’ या पदावर कार्यरत आहेत.
या काळात परीक्षा घेणारे प्रसंग आलेच; पण सासर, माहेर सांभाळत सहकार्यांच्या मदतीने त्यांनी सर्वच प्रसंगाना उत्तमपणे हाताळले. तसेच काकू, आईबाबांसोबतच पती संदिप, सासुबाई मीना, बंधु राजेश्वर, विजय, विलास, अरविंद, वहिनी मंजूषा, स्वाती, सरोज, संगीता, दीर पराग, जाऊ मनिषा आणि नणंद अनघा या सगळ्यांनी संपदा यांना नेहमीच पाठिंबा दिला. सासरी-माहेरी नात्यागोत्याचे नंदनवन फुलले. त्या सगळ्यांच्या साक्षीने संपदा यांच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला. भारतीय संस्कार, संस्कृती याला प्राधान्य देत कार्य करतानाच, दुसरीकडे आर्थिक सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणार्यांना त्या नेहमीच मदतीचा हात देतात. समाजबांधव म्हणजे आपले कुटुंबच. सहकार्याची वाच्यता करू नये, असे त्यांचे मत. तर अशा डॉ. संपदा म्हणतात की, “आपले आरोग्यशास्त्र अत्यंत अनमोल आहे. त्याच्या संवर्धनासाठी काम करणार आहे. आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार आणि उपयुक्तता सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करते आणि करत राहणार आहे.” डॉ. संपदा संत यांना पाहून वाटते, शक्तिस्वरूपिणी नारी तू नारायणी!