भारतीय संस्कृतीचे विविध पैलू हे वैज्ञानिक पायावर आधारभूत आहेत. तसेच त्यांना आरोग्याचेही अधिष्ठान लाभले आहे. म्हणूनच आपले सणवार, प्रथा-परंपरा, व्रतवैकल्ये अशा सगळ्याच्या मुळाशी मानसिक व सामाजिक आरोग्य निगडित आहे. त्याचेच या लेखात केलेले सखोल विवेचन...
विश्लेषणात्मक व एकात्मिक अशा दोन पद्धती शास्त्रीय विचारात वापरल्या जातात. पाश्चात्य शास्त्रीय परंपरा मुख्यतः विश्लेषणात्मक पद्धतीवर भर देते. ज्ञेय विषयाचे लहान तुकडे करून प्रत्येक तुकड्याचा अभ्यास केला की, पूर्ण विषयाचे ज्ञान होते, असे या पद्धतीचे मुख्य गृहीतक आहे. सध्याची शास्त्रीय व तांत्रिक प्रगती ही मुख्यतः या पद्धतीने झालेली आहे. यातूनच ही शास्त्रीय अभ्यासाची ही एकमेव पद्धत आहे, अगदी वैद्यकशास्त्रासाठीसुद्धा, अशी ठाम समजूत निर्माण झाली.
याउलट, पौर्वात्य ज्ञान परंपरा बहुतेक वेळा एकात्मिक पद्धतीने विचार करतात. विषयांचे पाडलेले विभाग हे सोयीसाठी केलेले कृत्रिम विभाग आहेत व खरे तर सर्व ज्ञान हे एक व अविभाज्य आहे, असा पौर्वात्य विचार आहे. आरोग्याबद्दल विचार करताना, पाश्चात्य पद्धतीत शरीराला जास्त महत्त्व दिले जाते व मानसिक, आध्यात्मिक व सामाजिक पैलूंकडे त्या मानाने दुर्लक्ष होते. परंतु, हल्ली उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग अशा असंसर्गजन्य रोगांच्या संदर्भात या पैलूंना खूप महत्त्व येत आहे.
भारतात ‘धर्म’ ही संकल्पना समाजाला आधार देणारे तत्त्व म्हणून मान्य आहे.
धारणाद्धर्ममित्याहुः धर्मो धारयते प्रजाः।
यस्याद्धारणसंयुक्तं स धर्म इति निश्चयः॥
जी जी गोष्ट समाजाला आधार देते, ती ती गोष्ट ‘धर्म’ या संकल्पनेचा भाग मानली आहे. या श्लोकाचा अर्थ साधारणतः सामाजिक संदर्भात लावला जातो. पण, आरोग्याच्या संदर्भातसुद्धा तो तेवढाच खरा आहे. आपल्या संस्कृतीतील धार्मिक, आध्यात्मिक पैलूसुद्धा आरोग्याच्या दृष्टीने सुसंगत असेच रचले गेले आहेत. गेल्या शतकात हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह हे रोग भारतात किंवा एकूणच आशियात झपाट्याने वाढले. जीवनशैलीतील बदल याच्या मुळाशी आहे, हे सर्वमान्य आहे. पण, साधारणतः ‘जीवनशैली’ या कल्पनेत जास्त अन्न, बदललेला आहार, वाढलेली संपन्नता व व्यायामाचा अभाव एवढ्याचाच समावेश केला जातो. बदललेली किंवा अभारतीय झालेली मनोभूमिका या आजारांना कितपत कारणीभूत आहे, याचा विचार फारसा झालेला दिसत नाही.
या रोगांना कारणीभूत असणारे मानसिक बदल हे मुख्यतः राग, भीती आणि चिंता यांमधून निर्माण होतात. इतिहासपूर्व काळात, जेव्हा माणूस जंगलात पशुतुल्य जीवन जगत होता, तेव्हा या भावना खर्याखुर्या धोक्यामुळे निर्माण होत असत. उदा. वणवा, दुष्काळ, मारामारी इत्यादी. त्यातून होणारे शारीरिक बदल हे त्या माणसाला-प्राण्याला मारामारी किंवा पळून जाण्यासाठी तयार करत असत. उदा. स्नायूंमधील ताण वाढणे, रक्तदाब वाढणे, रक्तातली साखर वाढणे व मनात विरोधाचे-भांडणाचे विचार येणे इत्यादी. जंगलात अशी स्थिती थोडा वेळच टिकत असे व त्यानंतर तो प्राणी सामान्य आयुष्य जगायला परत सुरुवात करत असे. पण, माणसांच्या जगात मात्र असे ताण वर्षानुवर्षे टिकू शकतात. उदा. गृहकर्ज २० वर्षे चालू शकते किंवा न आवडणार्या वरिष्ठांच्या हाताखाली आयुष्यभर काम करायला लागू शकते. अर्थातच, जंगलातील मारामारी किंवा पलायन या प्रकारची प्रतिक्रिया माणसांच्या जगात योग्य ठरणार नाही. नागर समाजात पशुतुल्य प्रतिक्रिया अयोग्य ठरतात, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी समाजात राहण्यासाठी यम-नियम (do's and don'ts) मुद्दाम निर्माण केले. विचारांच्या पाश्चात्यिकरणात आपण आपला हा अमूल्य वारसा गमावतो आहोत.
पाश्चात्य प्रभावाची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत :
१. चंगळवाद : स्वतःच्या सुखलोलुपतेवर नियंत्रण ठेवण्याला हल्ली फार किंमत नाही. खूप खर्च करून चैनीत जगणे यालाच प्रतिष्ठा आहे. त्यामुळे चंगळ करण्यासाठी प्रथम पैशाच्या मागे धावावे लागते व त्याचा ताण येतो. नंतर त्या पैशांनी चंगळ करताना आरोग्यविषयक समस्या गळ्यात पडतातच. उदा. लठ्ठपणा, दारूमुळे यकृत खराब होणे इत्यादी.
२. पैशाला अवास्तव महत्त्व : पैसा हा यश मोजण्याचा एकमेव निकष होऊन बसतो. त्यामुळे लोक वाटेल तो धोका पत्करून न्याय्य-अन्याय्य मार्गाचा विचार न करता, पैसे मिळविण्याचा प्रयत्न करतात.
३. स्पर्धा : ‘प्रगती’ या शब्दाचा अर्थ सध्या इतरांशी स्पर्धा करून जिंकणे, असा होऊन बसला आहे. सहकार्य आणि स्थैर्य यांपेक्षा स्पर्धा आणि गती हे कळीचे शब्द झाले आहेत. पण, स्पर्धा ही नेहमीच कोणाच्या तरी विरुद्ध असते व त्यामुळे उपरोल्लेखित ताण व त्याची प्रतिक्रिया आपोआप निर्माण होतात.
४. आनंदाचा पाठलाग : ’Pursuit of Happiness’ ही संकल्पना अमेरिकन आहे. किंबहुना, त्या देशात तो लोकांचा घटनादत्त अधिकार आहे. यातील विरोधाभास असा की, त्या बिचार्यांना फक्त पाठलागाचा अधिकार मिळाला आहे. आनंदापर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याचा नाही. कारण, पाठलाग करून आनंद मिळत नाही. पण, आपणसुद्धा आपल्या संस्कृतीतला ‘समाधान’ हा शब्द विसरून जाऊन या अमेरिकन आदर्शाचा पाठलाग करत आहोत.
मानसिक पाश्चात्यिकरणाचे परिणाम
१. स्वतःच्या परंपरा व समाजाबद्दल न्यूनगंड : हा न्यूनगंड स्वतःच मानसिक ताणाचे एक कारण आहे.
२. उत्क्रांत झालेल्या परंपरांचा नाश : हजारो वर्षे टिकलेल्या समाजात अनेक पद्धती व विचार निर्माण होतात. त्यातील लाभदायक विचार टिकतात, विकसित होतात व हानीकारक विचार काळाच्या निकषावर नष्ट होतात. शेवटी त्या समाजासाठी व त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थिती व हवामानासाठी योग्य अशी संस्कृती निर्माण होते. अचानक या सगळ्याचा त्याग करून परदेशी संस्कृती स्वीकारणे म्हणजे, हजारो वर्षे विकसित झालेल्या शहाणपणाचा नाश!
३. कठीण प्रसंगी मानसिक आधार देऊ शकतील, अशा पारंपरिक संकेतांचा नाश : उदा. स्वतःच्या प्रियजनांशी मोठा संघर्ष आवश्यक झाल्यास असा माणूस युद्धाच्या सुरुवातीला गोंधळून गेलेल्या अर्जुनाबद्दल आठवून स्वतःचा योग्य मार्ग शोधू शकतो.
अशा प्रकारचा एक पेच छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम महाराज यांच्या समोर पडला होता. औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली होती व त्यांचे पुत्र शाहू यांना कैद केले होते. राजाराम महाराजांना राज्य सांभाळणे आवश्यक होते, पण राज्याचे खरे अधिकारी बाल शाहू असल्याने राजाराम महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेणे योग्य नव्हते. तेव्हा राम वनवासात असताना भरत मंचकारुढ होऊन राज्य सांभाळत होता, या रामायणातील कथेचा आधार घेऊन राजाराम महाराजांनी कारभार केला. जर स्वतःच्या संस्कृतीशी नाळ तुटली, तर हा मार्गदर्शक आधार नाहीसा होतो.
४. युरोपीय रिवाजांचा भारतीय संदर्भात फोलपणा : परदेशी पद्धती या आपल्या देशाच्या भौगोलिक, सामाजिक किंवा अनुवंशिक संदर्भात असंबद्ध ठरू शकतात. उदाहरणार्थ, भारतात कापसाचा ‘स्नो मॅन’ आणि प्लास्टिकची ‘ख्रिसमस ट्री’ उभारणे. भारतात बहुतेकांनी कधीच हिमवर्षाव बघितला नसल्यामुळे ही पद्धत भारतात काहीही मानसिक आधार किंवा आनंद देऊ शकत नाही.
५. अनैसर्गिक मोठी उत्तेजना(supernormal stimulus) व त्याचा रोगांशी संबंध: माणूस बाहेरून येणार्या उत्तेजनांना एका ठराविक मर्यादेपर्यंत ठराविक व योग्य प्रतिसाद देतो. उदाहरणार्थ, फळे हे चांगले अन्न आहे, फळे ही गोड असतात. म्हणून गोड खाण्याची आवड उत्क्रांतीच्या ओघात विकसित झाली, पण प्रगत समाज सामान्य मर्यादेच्या बाहेरच्या उत्तेजना निर्माण करू शकतो. (उदा. शुद्ध साखर, जी फळापेक्षा खूप जास्त गोड असते.) उपजत भावनेला फळापेक्षाही साखर जास्त गोड, म्हणून जास्त हवीशी वाटते व ही आवड प्रकृतीला घातक ठरते.
आधुनिक विज्ञान म्हणते की, आपला अधिक उत्क्रांत मेंदू वापरून आपण आपले हित-अहित जाणले पाहिजे व उपजत भावनेला बळी पडता कामा नये. पण, जर संस्कृतीमध्येच इन्द्रियनिग्रहाची पद्धत अंतर्भूत असेल, तर किती छान होईल!
भारतीय संस्कृतीतील काही कल्पना व परंपरा
१. रथ व नाठाळ घोड्यांची उपमा : कठोपनिषदात आपल्या इंद्रियांना नाठाळ घोड्यांची उपमा देऊन त्यांना मनाचा लगाम घालायची गरज सांगितली आहे. उपरोल्लेखित ’supernormal stimulus’च्या सिद्धांताशी याची तुलना करण्यासारखी आहे.
२. निष्काम कर्म विरुद्ध चिंता : प्रगत समाजातील बरीचशी चिंता ही भविष्यातील अनिश्चिततेमुळे असते. याउलट फलाशा न धरता केलेले काम हे चिंतारहित असते. म्हणून भगवद्गीतेत निष्काम कर्माला खूप महत्त्व दिले आहे.
३. चतुर्विध पुरुषार्थ : सध्या इतरांहून जास्त पैसे मिळवणे हे यशाचे एकमेव माप झाले आहे. अर्थात, प्रत्येकाहून दुसरा कोणीतरी श्रीमंत असल्याने असमाधानाची कायमची पार्श्वभूमी आजच्या जीवनाला आहे (आशावधिं को गतः?) पण, भारतीय संस्कृतीत यशस्वी जीवनाचे धर्म, अर्थ, काम व मोक्ष असे चार पैलू मानले आहेत. अर्थ हा त्यातला फक्त चतुर्थांश आहे व त्याचा अर्थसुद्धा केवळ पैसे याहून मोठा आहे. त्यामुळे पैसे थोडे कमी मिळाले, तरी धर्म, काम व आध्यात्मिक उन्नती यांतील यशाच्या जोरावर माणूस समाधानी-यशस्वी जीवन जगू शकतो.
४. चिंता दहति जीवितम् : सततची चिंता हे हृदयरोग व मधुमेहाचे कारण असू शकते, हे आधुनिक विज्ञानाला मान्य आहे. या संदर्भात यक्षप्रश्नातले हे वचन विचारणीय आहे. चिंता टाळून आनंदी जीवन जगता यावे, अशा प्रकारे विचार करायला भारतीय परंपरा शिकवते.
५. ॐ सहनाववतु : जेवायला बसल्यावर भीती किंवा राग मनात असणे गैरसोयीचे आहे. कारण, शरीराची स्वायत्त मज्जासंस्था (automatic nervous system) मारामारीच्या पवित्र्यात असते, तेव्हा अन्नपचन इत्यादी नीट होत नाही. म्हणून ‘सहनाववतु, सह नौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै’ (मिळून खाऊ, मिळून उपभोग घेऊ, मिळून पराक्रम करू) अशी मैत्रीची अधिकृत घोषणा करूनच जेवायला सुरुवात करायची प्रथा होती.
६. षड्रिपु : सहा शत्रू - काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सहा भावना नैसर्गिक आहेत. पण, जंगलात योग्य असणार्या या भावना, सुसंस्कृत समाजात अयोग्य ठरतात. त्यातून मानसिक त्रासच निर्माण होतो. यांची मुद्दाम शत्रू म्हणून यादी केल्यामुळे माणसाला यापासून सावध राहण्यास मदत होते.
ही उदाहरणे केवळ वानगीदाखल दिली आहेत. पण, जे लोक लहानपणापासून अशा सुयोग्य मानसिक संकल्पनांशी परिचित असतील, त्या लोकांचे मानसिक आरोग्य व त्यावर अवलंबून असलेले शारीरिक आरोग्यसुद्धा चांगले राहील. म्हणून आपण आपल्या संस्कृतीतील चांगल्या परंपरा, संकल्पना, विचार यांच्याकडे लक्ष देऊन त्यांचा आपल्या आरोग्यासाठी व सामाजिक स्वास्थ्यासाठीसुद्धा फायदा करून घेतला पाहिजे.
(लेखक आरोग्य भारती, कोकण प्रांत मधुमेह योग प्रबंधन आयाम प्रमुख आहेत.)