योगशास्त्रातील अष्टांगापैकी अतिशय महत्त्वाचे सातवे अंग म्हणजे ध्यान. आजकालच्या ‘सॉफिस्टिकेटेड’ समाजामध्ये ध्यान म्हणजे काय, हेच माहिती नसल्याकारणाने ध्यानाचा ‘पॉम्प शो’ (दिखाऊ प्रदर्शन) तेवढे पाहायला मिळते. त्यानिमित्ताने ‘ध्यान’ या संकल्पनेविषयी केलेले हे चिंतन...
ध्यान म्हणजे मनाला एका विशिष्ट गोष्टीवर किंवा विचारावर केंद्रित करणे, ज्यामुळे मन शांत आणि स्थिर होते. या प्रक्रियेत आपण आपल्या विचारांना आणि भावनांना त्रयस्थ म्हणून पाहतो, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि आत्मिक प्रेरणा वाढते.
ध्यान-१
स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ॥
(भगवद्गीता अध्याय-५ श्लोक २७)
अर्थ : बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन न करता, ते बाहेरच ठेवून, दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान वायू सम करून एकाग्र होणे.
ध्यान याचा अर्थ, मनात उठणार्या विचारांपासून अलिप्तता किंवा साक्षित्व. आपले जीवन विषयसुखांबाबत अत्यंत लिप्त असते. डोळे, कान, जीभ इ. इंद्रियांच्या विषयांकडे आपण आकृष्ट होतो. ध्यानाचा अभ्यास इतर अभ्यासांच्या तुलनेने अतिसूक्ष्म आहे. एका जागी डोळे मिटून बाह्य विषय बाहेरच ठेवून इंद्रियांचे सर्व विषय बंद करून ध्यानाला बसायचे. इंद्रियांचे बाह्यविषय बंद केले, तरी मनामध्ये ते जसेच्या तसे असतात. उदाहरणार्थ, वस्तुतः आपण कोणाशी तोंडाने बोलत नसतानाही मनाने बोलत राहतो. आपल्या ज्या ज्या मानसिक क्रिया चालू असतात, त्यांच्याकडे तटस्थतेने किंवा साक्षित्वाने पाहणे, याचा अर्थ ध्यान.
याला साधन काय? प्राण अपान सम करण्यासाठी काय करणार? अनुलोम-विलोम प्राणायाम. वज्रासनात बसा. डोळे बंद करून, डाव्या हातात वायू मुद्रा लावा आणि उजव्या हाताने प्राण मुद्रा लावून अनामिका व अंगुष्ठ या दोन बोटांमध्ये नाक धरून आलटून पालटून एका नाकपुडीने खेचत श्वास घेणे, दुसरीने हळूहळू सोडणे. असे आलटून पालटून सात, १४, २१ आवर्तने करा.
एकाग्र होणे - ध्यान म्हणजे एका विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची प्रक्रिया, ज्यामुळे मन शांत आणि एकाग्र होते.
मनःशांती - ध्यानामुळे मन शांत होते, मानसिक व शारीरिक तणाव कमी होतात आणि शांती अनुभवता येते. ‘सर्वांभूती परमेश्वर’ ही आध्यात्मिक धारणा ठेवल्यास नम्रता वाढून अहंकार कमी होतो.
आत्मिक समाधान - ध्यान आपल्याला आपल्या विचारांवर आणि भावनांवर लक्ष केंद्रित करून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मदत करते, ज्यामुळे आपण स्वतःला आणि आपल्या भावनांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखून स्वपरिचय करू शकतो.
ध्यान प्रकार - ध्यानाचे अनेक प्रकार आहेत, जसे की धारणात्मक ध्यान, ज्योती ध्यान, श्वासावर ध्यान, शून्य स्थिती ध्यान इत्यादी.
ध्यान कसे करणार?
ध्यानासाठी स्वच्छ, शुद्ध, पवित्र आणि सुरक्षित जागा बघून स्थिर, सुख आसनात बसून डोळे मिटून घ्यावे व वरील चार शब्दांनी दिग्बंध करावा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करून बसावे.
श्वास सूक्ष्मातिसूक्ष्म होईपर्यंत श्वासावर लक्ष केंद्रित करून बसण्याची सवय केल्याने शरीर हलके वाटते, मन शांत होते, रक्तदाब सम होतो, नाडी गती सौम्य होते व मनाला वर्तमानात राहाण्याची सवय लागून हातातील कार्ये उत्तम होतात, ज्यामुळे आनंदाची निर्मिती होऊन चेहर्यावर कायम स्मित राहते.
विद्यार्थी जीवनात या ध्यानाचा अभ्यास केल्यास विषयांचा अभ्यास स्मरणात राहण्यासाठी मदत होईल.
ध्यान-२
अशा सूक्ष्म श्वासाची प्राप्ती झाल्यावर शरीराने आणि मनाने काहीही न करता बसण्याचा प्रयत्न करावा, ज्याने कालांतराने मन निर्विचार होऊन मनाची शून्य स्थिती साधेल परिणामतः चित्तवृत्तिरहित व्हायला मदत होऊन ‘योगः चित्तवृत्तिनिरोधः’ असा अनुभव येईल.
ध्यान-३
अशा निर्विचार मनाने स्वतःला ‘मी कोण?’ हा प्रश्न विचारून आत्मिक धारणा करावी :
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः।
अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च॥
(भगवद्गीता अध्याय १० - विभूतियोग श्लोक २०)
अर्थ : हे गुडाकेशा (अर्थात अर्जुना), मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे. तसेच सर्व भूतांचा आदि, मध्य आणि अंतही मीच आहे. ॥१०-२०॥
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः।
मनः षष्ठानीन्द्रियाणि
प्रकृतिस्थानि कर्षति॥
(श्रीमद्भगवद्गीता अध्याय-१५ श्लोक-७)
अर्थ : या देहात असणारा हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो. ‘मी कोण?’ प्रश्नाच्या भगवंताने गीतेत सांगितलेल्या अचूक उत्तरावर एकाग्र होऊन स्वतःच्या आत्मरूपाचे जाणिवेतून ध्यान करावे. ही जाणीव प्रत्येकामध्येच निर्माण होत नाही, तर जो यम, नियमांचे यथाशक्ती पालन करून स्वधर्म कर्म करतो व प्रत्याहाराचा अभ्यास करतो, त्यालाच ती लाभते. म्हणून असे म्हणतात की, या पायरीपासून पुढचे ध्यान-४ केले जात नाही, तर ते लागते. ती योगसाधना सोपी साधना नाही. ते एक व्रत आहे. जीवनशैलीचे व्रत, जीवन सार्थकी लावायचे व्रत. पुढे ध्यान-४ हे अनुसंधात्मक असते, त्यासाठी योग्य गुरूकडून दीक्षा घेऊन त्याप्रमाणे नम्रपणे अनुसंधानात्मक साधन करावे. उगाच ‘पॉम्प शो’ करू नये.
ध्यानाचे फायदे
ध्यानामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतात. बर्याच प्रमाणात रोगनिर्मूलन होते. स्मरणशक्ती वाढते, शक्ती वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तीला अधिक शांत आणि आनंदी वाटू लागते. खरा मी कोण, याचा भगवद्गीताप्रणित अनुभव येऊन ‘सर्वांभूती परमेश्वर’ ही भावना दृढ होते व आप-पर भाव मिटतो. ज्यामुळे कौटुंबिक, सामाजिक व वैश्विक ऐक्यता भासून जनता जनार्दन रूपी परमेश्वराची सेवा करण्याची इच्छा निर्माण होते. आपण करीत असलेले प्रत्येक कार्य परमेश्वराप्रतीच आहे, ही धारणा दृढ होऊन ईश्वरप्रणिधान घडते व आपण करीत असलेल्या कार्यातून चित्तशुद्धी साधते व समाधान मिळते.
डॉ. गजानन जोग
(लेखक योगोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक आहेत.)
९७३००१४६६५