दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? आणि नागपूरातील हा हिंसाचार पूर्वनियोजित कट होता का? याबद्दलच जाणून घेऊया...
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सभागृहात निवेदन केलं. यावेळी त्यांनी हिंसाचाराच्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम उघड केलाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, १७ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता नागपूरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 'औरंगजेबाची कबर हटाओ' असे नारे देत आंदोलन केलं. यावेळी त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. त्यानंतर दुपारी ३ वाजताच्या दरम्यान गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. मात्र, त्यानंतर सायंकाळी सकाळच्या आंदोलनात जाळलेल्या प्रतिकात्मक कबरीच्या कापडावर धार्मिक मजकूर असल्याची अफवा पसरली. त्यानंतर नमाज आटपून २०० ते २५० लोकांचा जमाव तयार झाला आणि नारे देऊ लागला. शिवाय याच लोकांनी आग लावण्याबाबत हिंसक बोलणंही सुरु केलं. ही झाली पहिली घटना.
दुसरी घटना अशी की, या घटनेच्या पूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार देण्याबाबत मागणी करण्यात आल्याने काही लोकांना गणेशपेठ पोलिस ठाण्यात आमंत्रित करत त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली. एकीकडे पोलिसांची ही कारवाई सुरु असतानाच दुसरीकडे हंसापूरी भागात २०० ते ३०० लोकांनी हातात काठ्या घेऊन दगडफेक केली. त्यांच्या तोंडावर फडके बांधलेले होते. या घटनेत १२ दुचाकींचं नुकसान झालं असून काही लोकांवर धारदार शस्त्राने हल्लादेखील करण्यात आला.
त्यानंतर तिसरी घटना सायंकाळी ७.३० वाजता भालदारपुरा भागात घडली. ८० ते १०० लोकांच्या जमावानं पोलिसांवर हल्ला केल्यानं पोलिसांना अश्रृधुराचा आणि सौम्य बळाचा वापर करावा लागला. या घटनेत १ क्रेन, २ जेसीबी आणि काही चारचाकी वाहनं जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेत ३३ पोलिस जखमी झालेत. यात तीन उपायुक्त दर्जाचे पोलिस असून यातील एका उपायुक्तांवर तर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आलाय. शिवाय एकूण पाच नागरिकही जखमी झालेत. यातील दोघांवर उपचार सुरु असून यातील एकजण आयसीयूमध्ये आहे.
या संपूर्ण घटनेनंतर ११ पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आलीये. यात तहसील, कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपीलनगर या ठाण्यांचा समावेश आहे. याठिकाणी एसआरपीएफच्या पाच तुकड्यादेखील तैनात करण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे, ही संपूर्ण हिंसाचाराची घटना पूर्वनियोजित असल्याचा संशयही आता व्यक्त करण्यात येतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्यानुसार, सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळात या भागात शांतता होती. परंतू, त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक असा हल्ला केल्याचं लक्षात आलंय. संबंधित भागात जवळपास एक ट्रॉली भरून दगड मिळाले आहेत. काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड आणि शस्त्रदेखील आढळलेत. शिवाय यावेळी ठरवून काही ठराविक घरांना आणि आस्थापनांना लक्ष्य करण्यात आल्याचीही माहिती आहे.
आणखी एक असं की, नागपूरमध्ये आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब मध्यस्ती करत दोन्ही समाजांमध्ये शांतता प्रस्थापित केली. परंतू. बरोबर संध्याकाळी ८ वाजता लोकांचा जमाव जमतो. महाल परिसर, मोमीनपुरा, हंसापूरी यासह इतर भागात लोक जमले. घरांमध्ये मोठमोठे दगड टाकण्यात आले. हॉस्पीटलची तोडफोड करण्यात आली. एका विशिष्ट ठिकाणी दररोज १०० ते १५० गाड्या पार्क करण्यात येतात. पण काल तिथे एकही गाडी पार्क करण्यात आली नव्हती. याचा अर्थ जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक विशिष्ट समुदायाच्या लोकांना टार्गेट करण्याची ही साजीश होती, असा संशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. नागपूरातील हा सगळा प्रकार पाहता ही घटना सुनियोजित होती अशी शंका उपस्थित होते.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....