मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP on Nagpur Violence) औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून सोमवारी रात्री (१७ मार्च) इस्लामिक कट्टरपंथींनी नागपुरात हिंसाचार केला. वाहनांची मोडतोड केली, जाळपोळ केला, घरे आणि रुग्णालयांवरही दगडफेक केली. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी तीव्र शब्दांत या प्रकरणी विरोध दर्शविला आहे. नागपुरात मुस्लिम समाजातील एका वर्गाने ज्याप्रकारे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर, त्यांच्या घरांवर आणि महिलांवर हल्ले केले आहेत. हे अत्यंत निंदनीय असून विश्व हिंदू परिषद या घटनेचा निषेध व्यक्त करते.
हे वाचलंत का? : औरंग्याची कबर तोडली! बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं?
नागपूरात हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या पुतळ्याचे दहन केले मात्र काही धर्मांधांनी कुराण जाळल्याच्या अफवा पसरवल्या. त्यामुळे नागपुरात मोठा हिंसाचार उफाळला. मिलिंद परांडे यांनी ही घटना फेटाळून लावली असून खोटेपणा पसरवून हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद परिसरात असलेल्या मुघल आक्रमक औरंगजेबाच्या कबरीचा गौरव थांबवावा असेही मिलिंद परांडे म्हणाले.
त्यापेक्षा त्या जागी औरंगजेबाचा पराभव करणारे मराठा योद्धे श्री धनाजी, संताजी आणि श्री राजा राम महाराज यांचे स्मारक बांधले जावे आणि औरंगजेब तिथेच मरण पावला हे उद्धृत केले पाहिजे. अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. औरंगजेबाला पाठिंबा देणाऱ्या आणि हिंसाचार पसरवणाऱ्या आणि दडपणाऱ्यांवर सरकारने कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील सरकारकडे करण्यात आली आहे.
शहरातील बहुतांश भागात संचारबंदी लागू
दरम्यान, परिस्थिती पाहता पोलीस प्रशासनाने कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर आणि इतर अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली आहे.