'उबाठा'चे नेते लपून-छपून भाजपश्रेष्ठींना भेटून आले - एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

18 Mar 2025 16:39:31
 
Eknath Shinde on UBT leaders
 
मुंबई: (  Eknath Shinde on UBT leaders ) “२०२२ साली मी लपूनछपून काहीही केले नाही, जे केले ते निधड्या छातीने केले. पण तुमचे नेते (उबाठा गट) लपूनछपून भाजपश्रेष्ठींना भेटून आले. युती करू असे म्हणाले. पण पुन्हा पलटले”, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार, दि. १८ मार्च रोजी विधानसभेत केला.
 
नागपूर येथे घडलेल्या हिंसाचाराबाबत एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत निवेदन दिले. अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानाचा उल्लेख करीत शिंदे यांनी त्यांच्यावर प्रहार केला. उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेत बोलत असताना, माझा छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणेच छळ झाला होता, असा दावा केला होता. "पक्ष बदलण्यासाठी माझा छळ झाला. पण जसे छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही, तसा मी पक्ष बदलला नाही", असे ते म्हणाले होते. याचा संदर्भ देत एकनाथ शिंदे म्हणाले, “तुमचा काय छळ झाला होता? तुमच्यावर कारवाई झाल्यानंतर तुम्हीही लोटांगण घातले होते, हे मला माहीत आहे. पण प्रकरणातून सुटका झाल्यानंतर तुम्ही तुमच्या नेत्यांप्रमाणेच पलटी मारली”, असा चिमटाही शिंदे यांनी काढला.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल हाल करून मारले. त्यांचे डोळे काढले, जीभ हासडली, कातडी सोलली, त्यावर मिठ चोळले. अशाप्रकारचे अत्याचार तुमच्यावर (विरोधक) झाले का? तुम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करली. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी युती तोडली. महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपच्या चार नेत्यांना तुरुंगात टाकून त्यांचे आमदार फोडण्याचा तुमचा कट होता. पण मी युतीधर्मासाठी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी तुमचा 'टांगा पलटी' केला”, असे शिंदे म्हणाले.
 
दंगल पूर्वनियोजित
 
नागपूर दंगलीबाबत बोलत असताना एकनाथ शिंदे म्हणाले, ही दंगल पूर्वनियोजित होती, असे प्रत्यक्षदर्शींकडून पुरावे मिळत आहेत. दंगल झालेल्या भागात दररोज १००-१५० दुचाकी उभ्या असतात. मात्र दंगलखोरांची एकही दुचाकी काल त्याठिकाणी नव्हती. पेट्रोल बॉम्ब, लाठ्या, तलवारी इतक्या मोठ्या प्रमाणात अचानक कशा काय जमवल्या? यासाठी आधीच नियोजन केले गेले असावे, असा संशय शिंदे यांनी व्यक्त केला.
 
 

Powered By Sangraha 9.0