दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा 'अशी ही जमवा जमवी' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; 'या' तारखेला पाहायला मिळणार चित्रपट! जाणून घ्या

18 Mar 2025 11:58:56
 



Teaser of veteran actor Ashok Saraf
 
 
 
मुंबई : मैत्री, प्रेम, कुटुंब या विषयांवर आजवर बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत; मात्र राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित 'अशी ही जमवा जमवी' या चित्रपटात फक्त तरुणांचीच नाही तर वृद्ध मित्र मैत्रिणींचीसुद्धा एक धमाकेदार कहाणी आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे. या दमदार आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाचं टिझर प्रदर्शित झालंय, ज्यात अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दोन दिग्गजांची मजेदार जुगलबंदी पहायला मिळते. चित्रपटाचं नाव आणि रिलीझ झालेल्या टिझरवरून संपूर्ण सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता आता वाढली आहे.
 
 
 
थोडी खट्याळ, थोडी गोंडस, थोडी हळवी अशी चित्रपटाची कथा असून आजच्या तरुणाईसोबत प्रौढांनाही भावणारा, मनोरंजक आणि नवीन विचार मांडणारा हा सिनेमा आहे. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या अनुभवी कलाकारांसोबत सिनेमात सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे अशा लोकप्रिय कलाकारांची फौज आहे.
 
 
भारतीय सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणारे चित्रपती व्ही. शंताराम यांचे नातू आणि किरण व्ही. शांताराम यांचे चिरंजीव राहुल शांताराम यांनी मनोरंजनविश्वात सिनेप्रेमींसाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचे उद्दिष्ट ठेवत ‘राजकमल एंटरटेनमेंट’ ही नवीन कंपनी सुरू केलेली आहे. प्रेमाची ही नवी कहाणी कशी जमणार आहे, हे जाणून घेणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 'राजकमल एंटरटेनमेंट’चा हा नवाकोरा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहात भेटीला येणार आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0