सर्वच क्षेत्रांमध्ये जोरदार वाढ, १ हजारपेक्षा जास्त अंशांची उसळी
18-Mar-2025
Total Views |
मुंबई : मागील आठवड्यात सातत्याने मंदीचे वातावरण अनुभवणाऱ्या शेअर बाजाराने या आठवड्यात जोरदार पुनरागमन केले आहे. सोमवारी तीनशे पेक्षा जास्त अंशांची उसळी अनुभवणाऱ्या शेअर बाजारात मंगळवारी तेजीचा धमाका झाला. तब्बल ११३१ अंशांची उसळी घेत शेअर बाजाराचा निर्देशांक ७५, ३०१ अंशांवर थांबला. निफ्टीमध्येही तेजीचा जोर कायम राहून निर्देशांकाने ३२५ अंशांची उसळी घेत २२, ८३४ अंशांचा टप्पा गाठला. शेअर बाजारात झालेल्या या जोरदार उसळींनी गुंतवणुकदार मालामाल झाले आहेत.
क्षेत्रांनुसार बघितले तर शेअर बाजारात वाहन निर्मिती, सरकारी बँका, धातू उत्पादन, खासगी बँका, ग्राहकोपयोगी वस्तु या क्षेत्रांत जोरदार वाढ झाली. तर मंगळवारी तेजी अनुभवणाऱ्या कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एलएनटी, श्रीराम फायनान्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. शेअर बाजारात त्यामुळे उत्साहाचे वातावरण होते.
या तेजीच्या वातावरणाबद्दल तज्ज्ञांकडूनही उत्साहजनक प्रतिक्रिया आल्या आहेत. शेअर बाजाराचा निर्देशांक घेत असलेली उसळी हे भारतीय अर्थव्यवस्था स्थिरावू लागल्याचे प्रतिक आहेत. आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत व्यापारात होत असलेली वाढ ही अर्थव्यवस्थेत गुंतवणुकदारांचा उत्साह वाढवणारी आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुध्दावरही तोडगा निघण्याची चिन्हे असल्याने आता परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार होऊन, त्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होण्याची शक्यता जबरदस्त आहे.