Nagpur Violence : ६५ आरोपी ताब्यात, अनेक भागात संचारबंदी लागू

18 Mar 2025 14:43:19

Nagpur Violence Accused Arrested

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Nagpur Violence Accused Arrested) 
औरंगजेबाच्या थडग्यावरून राज्यात सुरु असलेल्या वादाला सोमवारी नागपुरात हिंसक वळण लागले. महाल परिसरात दोन गटात तणाव वाढला आणि काही वेळातच हिंसाचार उसळला. अगदी हंसपुरीपर्यंत तो रात्री पोहोचल्याचे निदर्शनास आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अनेक भागात संचारबंदी लागू केली आहे. आतापर्यंत ६० ते ६५ हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

 हे वाचलंत का? : जमावाकडून दगडफेक ते पोलिस उपायुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला! नागपूर घटनेबाबत मुख्यमंत्र्यांचे सभागृहात निवेदन; हिंसाचाराचा संपूर्ण घटनाक्रम केला उघड

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेसात वाजता सर्वप्रथम महाल परिसरात हिंसाचार सुरू झाला. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आणि अनेक वाहने पेटवून दिली. यात अनेक पोलीस जखमी झाले. दरम्यान १० हून अधिक दुचाकी आणि तीन कार, जेसीबी, क्रेन जळून खाक झाल्या आहेत. यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास हंसपुरीच्या जुना भंडारा पथावर हिंसाचार झाला. येथे जमावाने वाहनांना लक्ष्य केले आणि काही घरांवर हल्ले केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला.

हिंसाचारानंतर नागपुरातील कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपौली, शांतीनगर, शक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर इत्यादी भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कर्फ्यू दरम्यान, कोणत्याही आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई आहे आणि पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास देखील मनाई आहे. तथापि, वैद्यकीय आणीबाणी, परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोकांना सूट देण्यात आली आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महल परिसरातील हिंसाचार अफवा आणि गैरसमजातून सुरू झाला. परंतु परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने गुन्हेगारांची ओळख पटवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Powered By Sangraha 9.0