नागपूरात तुफान राडा! दोन गटात दगडफेक; नेमकं काय घडलं?

18 Mar 2025 11:34:47
 
Nagpur Mahal
 
नागपूर : नागपूरमधील महाल परिसरात सोमवार, १७ मार्च रोजी रात्री औरंगजेबाच्या कबरीवरून तुफान राडा झाला. यादरम्यान, दोन गटात दगडफेक झाली असून मोठ्या प्रमाणात जाळपोळही करण्यात आली. यावेळी जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली.
 
राज्यभरात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला असून ती कबर हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. याच मुद्यावरून नागपूरात सोमवारी रात्री हिंसाचार उसळला. काही अफवा पसरल्यामुळे नागपूरमध्ये तणाव निर्माण झाला आणि दोन गटांनी एकमेकांना हाणामारी करत रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. दरम्यान, जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली असून जवळपास ३४ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत.
 
दरम्यान, पोलिसांनी ५० पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतले असून विविध भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आदेश येईपर्यंत ही संचारबंदी लागू असेल. यासोबतच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता महाल परिसरातील शाळांनाही सुटी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांततेचे आवाहन केले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0