इंडसइंड बँकेकडून ठेवीदारांचा विश्वास मिळवण्याची धडपड

18 Mar 2025 13:40:51

ind
 
 
 
मुंबई : संपूर्ण बँकिंग विश्वात खळबळ माजवणाऱ्या इंडसइंड बँक घोटाळ्याचा नवा अपडेट समोर आला आहे. बँकेकडून आता आपल्या ठेवीदारांचा विश्वास परत मिळवण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शनिवारी बँकेची भांडवली स्थिती मजबूत असल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी बँकेने आपल्या गुंतवणुकदारांसाठी मुदत ठेव प्रमाणपत्रे जाहीर केली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळून बँकेने अवघ्या एकाच दिवसात ११ हजार कोटी रुपये या ठेव प्रमाणपत्रांच्या सहाय्याने उभारले आहेत. तज्ज्ञांच्या मते, बँकेला एका दिवसात मिळालेला हा प्रतिसाद बघता, बँक आपल्या गुंतवणुकदारांचा तसेच ठेवीदारांचा विश्वास परत मिळवण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे. या ठेव प्रमाणपत्रांवर बँकेकडून ७.८० ते ७.९० टक्के इतका व्याजदर देण्यात येणार आहे.
 
मार्च महिन्यातील दहा तारखेला इंडसइंड बँकेने स्वत:हून जाहीर केले की त्यांच्या विदेशी चलन व्यवहारांच्या खात्यात काहीतरी मोजणी पध्दतीतील गफलतीमुळे तब्बल २१०० कोटी रुपयांचा फटका बँकेला बसला असण्याची शक्यता आहे. बँकेकडून असेही सांगितले गेले की हा आकडा फक्त आतापर्यंत झालेल्या अंतर्गत लेखापरिक्षणाचाच आहे. अद्याप बाह्य लेखापरिक्षण होणे बाकी असून त्यातील आकडा हा कदाचित अजून मोठा असू शकतो. या बातमीमुळे अवघ्या बँकिंग क्षेत्रातच जबरदस्त घबराट उडाली, शेअर बाजारातही याचे पडसाद उमटले.
 
आता पर्यंतच्या माहितीनुसार इंडसइंड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत कठपालिया यांची मुदत या मार्च महिन्यात संपणार होती. तरी त्यांना हा सगळा घोळ निस्तरेपर्यंत एकच वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. शनिवारी रिझर्व्ह बँकेनेही बँकेच्या सर्व स्थितीचा आढावा घेऊन बँकेची भांडवलात्मक स्थिती मजबूत असल्याचे सांगीतले होते. त्यामुळे इंडसइंड बँकेच्या भोवतीचे तयार झालेले संशयाचे वातावरण आता निवळण्यास सुरुवात झाली आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 
ठेव प्रमाणपत्र म्हणजे काय ?
 
बँकांकडून निधी उभारण्यासाठी वापरण्यात येणारे ठेव प्रमाणपत्र एक वित्तीय साधन आहे. ही बँकेकडून जाहीर केलेली एक गुंतवणुक योजनाच आहे. ज्यात गुंतवणुकदार विशिष्ट काळासाठी पैसे गुंतवून परतावा मिळवू शकतात. यांवर मिळणारा व्याजदर हा निश्चित बचत खात्यांपेक्षा जास्त असतो. बँकांना निधी उभारण्यासाठी हे वित्तीय व्यवस्थेमधील एक महत्वाचे साधन आहे.
  
Powered By Sangraha 9.0