नागपूर हिंसाचार हा सुनियोजित कट? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली शंका

18 Mar 2025 13:55:52
 
Eknath Shinde Nagpur violence
 
मुंबई : नागपूरमध्ये दोन गटात झालेल्या हिंसाचार हा सुनियोजित कट असल्याचा संशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत व्यक्त केला. औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून त्याचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण का सुरु आहे? कुणी सुरु केले? कशासाठी सुरु केले? याच्या मुळाशी तर सरकार जाईल. ज्या औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा छळ करून हत्या केली. छावा सिनेमात त्यांची खरी वस्तुस्थिती दाखवण्यात आली आहे. औरंगजेबाने ४० दिवस छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला. अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे योग्य आहे का? औरंग्याचे उदात्तीकरण करणे म्हणजे शंभूराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे आहे. हा देशद्रोह आहे. औरंग्या आपल्या महाराष्ट्राचा घास घेण्यासाठी आला. आपली मंदिरे उध्वस्त केली. रक्ताचे पाट वाहिले. हा सगळा इतिहास असताना औरंगजेबाचे समर्थन करणे योग्य नाही. आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. एक सच्चा देशभक्त मुसमानसुद्धा औरंग्याचे समर्थन करणार नाही असे त्याचे क्रौर्य होते. औरंग्याने शंभूराजांचा छळ करून त्यांना मारले तरीसुद्धा त्यांनी त्याच्यासमोर मान झुकवली नाही. हा इतिहास आहे."
 
हे वाचलंत का? -  जमावाकडून दगडफेक ते पोलिस उपायुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला! नागपूर घटनेबाबत मुख्यमंत्र्यांचे सभागृहात निवेदन; हिंसाचाराचा संपूर्ण घटनाक्रम केला उघड
 
"काल नागपूरमध्ये औरंगजेबाच्या विरोधात आंदोलन केले. असे कितीतरी आंदोलन होत आहेत. औरंगजेब आपला संत, सगासोयरा किंवा नातेवाईक होता का? कोण आहे हा औरंग्या? औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. नागपूरमध्ये आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब मध्यस्ती केली आणि दोन्ही समाजांमध्ये शांतता प्रस्थापित केली. परंतू. बरोबर संध्याकाळी ८ वाजता पाच हजार लोकांना जमाव कसा काय जमतो? महाल परिसर, मोमीनपुरा, हंसापूरी यासह इतर भागात लोक जमले. घरांमध्ये मोठमोठे दगड टाकले, हॉस्पीटलची तोडफोड केली, तिथल्या देवांचे फोटो जाळू टाकले. एक पाच वर्षांचा बच्चू मरता मरता वाचला. हे सगळे काय सुरु आहे?" असा सवाल त्यांनी केला.
 
विशिष्ट समुदायाला टार्गेट केले!
 
"लोकशाही मार्गाने तुम्ही आंदोलन करा. पण तुम्ही कायदा हातात घेऊन लोकांवर अन्याय करणार का? एका विशिष्ट समुदायाला टार्गेट केले गेले. या हल्ल्यात तीन उपायुक्त अधिकारी जखमी होतात. दगडफेक, कुऱ्हाडीने हल्ले होतात. पेट्रोल बॉम्ब फेकले जातात, गाड्या जाळल्या जातात. एका विशिष्ट ठिकाणी दररोज १०० ते १५० गाड्या पार्क करण्यात येतात. पण काल तिथे एकही गाडी पार्क करण्यात आली नव्हती. याचा अर्थ जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक विशिष्ट समुदायाच्या लोकांना टार्गेट करण्याची ही साजीश होती," असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0