मुंबई : नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर एक ट्रॉली भरून दगड आणि अनेक शस्त्र मिळाले असून या घटनेत काहीतरी सुनियोजित पॅटर्न दिसत असल्याचा संशय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मंगळवार, १८ मार्च रोजी त्यांनी नागपूर घटनेवर विधानसभेत निवेदन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळात शांतता होती. परंतू, त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक असा हल्ला केल्याचे लक्षात येते. जवळपास एक ट्रॉली भरून दगड मिळाले आहेत. काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड आणि शस्त्रदेखील पाहायला मिळाले. वाहनांची जाळपोळ करण्यात आली. यावेळी ठरवून काही ठराविक घरांना आणि आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे या घटनेत काहीतरी सुनियोजित पॅटर्न दिसत असून अशा लोकांवर कारवाई केली जाईल."
हे वाचलंत का? - नागपूर हिंसाचार हा सुनियोजित कट? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली शंका
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही!
"कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कुणालाही परवानगी देण्यात येणार नाही. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांना काहीही झाले तरी सोडले जाणार नाही. पोलिस शांतता प्रस्थापित करत असताना त्यांच्यावर हल्ला करणे चुकीचे असून ते सहन केले जाणार नाही. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या कालावधीत सर्व समाजांचे धार्मिक सण सुरु असून अशा वेळी सगळ्यांनी संयम ठेवायला हवा. कोणीही संयम सोडू नये. एकमेकांप्रति आदरभाव राखण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा," असे आवाहन त्यांनी केले.
छावा पाहिल्यानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित!
"महाराष्ट्रात छावा चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला. त्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा राग बाहेर येत आहे. या सगळ्या गोष्टी असल्या तरी महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणे महत्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी संयम ठेवावा. कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची जात, धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल," असा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.