जमावाकडून दगडफेक ते पोलिस उपायुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला! नागपूर घटनेबाबत मुख्यमंत्र्यांचे सभागृहात निवेदन; हिंसाचाराचा संपूर्ण घटनाक्रम केला उघड

18 Mar 2025 13:10:19
 
Devendra Fadanvis Nagpur Violence
 
मुंबई : नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, १८ मार्च रोजी सभागृहात निवेदन केले. यावेळी त्यांनी हिंसाचाराच्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम उघड करत पोलिसांवर हल्ला करणाऱ्याला सोडणार नाही, असा इशारा दिला.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सोमवार, १७ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता नागपूरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 'औरंगजेबाची कबर हटाओ' असे नारे देत आंदोलन केले. यावेळी त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. त्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर दुपारी ३ वाजून ९ मिनिटांनी गुन्हा दाखल केला. पुढे सकाळच्या आंदोलनात जाळलेल्या प्रतिकात्मक कबरीच्या कापडावर धार्मिक मजकूर असल्याची अफवा सायंकाळी पसरवण्यात आली. त्यानंतर नमाज आटपून २०० ते २५० लोकांचा जमाव तयार झाला आणि नारे देऊ लागला. याच लोकांनी आग लावण्याबाबत हिंसक बोलणे सुरु केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला."
 
हे वाचलंत का? -  ५० वाहनांची जाळपोळ, ३४ पोलिस जखमी; नागपूर हिंसाचारावर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले, "घटनेचा सूत्रधार..."
 
"त्यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार देण्याबाबत मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशपेठ पोलिस ठाण्यात आमंत्रित करत त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली. एकीकडे पोलिसांची कारवाई सुरु असताना दुसरीकडे हंसापूरी भागात २०० ते ३०० लोकांनी हातात काठ्या घेऊन दगडफेक केली. त्यांच्या तोंडावर फडके बांधलेले होते. या घटनेत १२ दुचाकींचे नुकसान झाले असून काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आला," असे त्यांनी सांगितले.
 
पोलिस उपायुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला
 
"त्यानंतर तिसरी घटना सायंकाळी ७.३० वाजता भालदारपुरा भागात झाली. ८० ते १०० लोकांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याने अश्रृधुराचा आणि सौम्य बळाचा वापर करावा लागला. या घटनेत १ क्रेन, २ जेसीबी आणि काही चारचाकी वाहने जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेत ३३ पोलिस जखमी झाले असून यात तीन उपायुक्त दर्जाचे पोलिस आहेत. यातील एका उपायुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. एकूण पाच नागरिक झाले असून तिघांना उपचार करून सोडले तर २ दोघांवर उपचार सुरु आहेत. यापैकी एकजण आयसीयूमध्ये आहे."
 
"गणेशपेठ पोलिस स्टेशनमध्ये एकूण तीन गुन्हे दाखल झाले असून तहसील पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ११ पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एन्ट्री पॉईंटवर नाकाबंदी करण्यात आली असून यात तहसील, कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपीलनगर या ठाण्यांचा समावेश आहे. याठिकाणी एसआरपीएफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सर्व सीपी आणि एसपींना राज्यभर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0