नागपूर : महाल परिसरात सोमवारी घडलेली हिंसाचाराची घटना दुर्भाग्यपूर्ण असून या हिंसाचाराच्या सूत्रधाराला बेड्या ठोका, असे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. मंगळवार, १८ मार्च रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "यापूर्वी कधीही बघितली नाही अशी दुर्भाग्यपूर्ण घटना काल नागपूर शहरामध्ये घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. सर्व समाजांनी अशा घटनेत शांतता प्रस्थापित करून यामागच्या मूळ समाजकंटकांना शोधण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. तसेच विरोधकांनी या घटनेचे राजकारण न करता समाजकंटकाना शोधण्यासाठी मदत करावी," असे आवाहन त्यांनी केले.
हे वाचलंत का? - दापोली, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईत उबाठा गटाला खिंडार! अनेक बडे नेते शिवसेनेत दाखल
"पोलिसांनी प्रचंड क्षमतेने या घटनेत पुढाकार घेऊन ही संपूर्ण परिस्थिती हाताळली. जवळपास ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ३४ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले असून ५० ते ५५ वाहने जाळण्यात आली आहेत. पोलिसांनी या घटनेत मध्यस्ती केली असून यामध्ये पोलिसच जास्त जखमी झाले आहेत. महाराष्ट्रात अशा घटना घडणार नाही यासाठी सरकार काम करत आहे. पोलीस या घटनेचे मूळ शोधून काढतील. सोशल मीडिया, सीडीआर, कॉल चेक करून घटनेमागे कोण आहेत हे शोधून काढतील. समाजकंटकाना शोधण्यासाठी नागरिकांनी मदत करायला हवी," असे ते म्हणाले.
नागपूरच्या संस्कृतीची विरासत कायम ठेवा
"नागपूरच्या संस्कार, संस्कृतीची विरासत ही सर्व धर्मांना आणि समाजाला सोबत घेऊन काम करण्याची आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपण सर्वांनी एकत्र येऊन नागपूरचा एक सांस्कृतिक इतिहास जपला आहे. हा सांस्कृतिक इतिहास नागपूरच्या भूमीत कायम राहावा आणि आपला सलोखा कायम राहावा यासाठी सर्व समाजांनी, संघटनांनी, सरकारी आणि विरोधी पक्षांनी मिळून शांतता प्रस्थापित करण्याचे काम करायचे आहे. विरोधकांनी या घटनेकडे राजकीय दृष्टीने पाहू नये."
सोशल मीडिया अकाऊंट्सवर नजर
"समाज माध्यम अकाउंटच्या माध्यमातून दोन समाजात द्वेष निर्माण करण्यात आला त्यातून ही घटना घडली आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचे आवाहन केले आहे. संचारबंदीकरिता पर्याप्त पोलिसांचा बंदोबस्त आहे. पुन्हा अशी घटना होणार नाही याची काळजी पोलिस आणि शासनाने घेतली आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर आमचे जास्त लक्ष आहे. या अकाऊंटच्या माध्यमातून जे काही पसरवले जात आहे त्यावर आमचे लक्ष आहे," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले.