५० वाहनांची जाळपोळ, ३४ पोलिस जखमी; नागपूर हिंसाचारावर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले, "घटनेचा सूत्रधार..."

18 Mar 2025 12:20:33
 
Chandrashekhar Bawankule on Nagpur Violence
 
नागपूर : नागपूरमधील महाल परिसरात सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारामुळे सध्या वातावरण तापले आहे. दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, १८ मार्च रोजी पत्रकार परिषद घेत या हिंसाचारातील आकडेवारी जारी केली. या घटनेचा सूत्रधार लवकरच कळणार असून नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "यापूर्वी कधीही बघितली नाही अशी दुर्भाग्यपूर्ण घटना काल नागपूर शहरामध्ये घडली आहे. सर्व समाजांनी अशा घटनेत शांतता प्रस्थापित करून यामागच्या मूळ समाजकंटकांना शोधण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याची नागपूरकरांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालपासूनच या घटनेबाबत जिल्हा प्रशासन आणि पोलिस आयुक्तांशी संपर्क करून ही घटना वाढू नये यासाठी प्रयत्न केले आहेत. या घटनेबाबत पोलिस अॅक्शन मोडमध्ये आहेत. त्यांनी प्रचंड क्षमतेने या घटनेत पुढाकार घेऊन ही संपूर्ण परिस्थिती हाताळली. जवळपास ३४ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी या घटनेत मध्यस्ती केली असून यामध्ये पोलिसच जास्त जखमी झाले आहेत. चार पाच नागरिक जखमी आहेत तर ५० ते ५५ वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागपूरमध्ये वातावरण बिघवडण्याचा प्रयत्न झाला असून त्यातून पुढे मग दोन समाजांत द्वेष निर्माण झाला आणि ही घटना घडली," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  नागपूरात तुफान राडा! दोन गटात दगडफेक; नेमकं काय घडलं?
 
नागपूरमध्ये संचारबंदी!
 
"आम्ही सर्वांनी नागपूर शहरात शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रात कुठेही अशा घटना घडू नये यावर देवेंद्रजी लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी योग्य पद्धतीने ही घटना हाताळली आहे. नागपूर शहरात तणावपूर्ण परिस्थितीत असलेल्या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मी स्वत:, देवेंद्रजी, गडकरीजी आणि आमचे सर्व लोकप्रतिनिधी या घटनेत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आहोत."
 
नागपूरच्या संस्कृतीची विरासत कायम ठेवा
 
"नागपूरच्या संस्कार, संस्कृतीची विरासत ही सर्व धर्म आणि समाजाला सोबत घेऊन काम करण्याची आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपण सर्वांनी एकत्र येऊन नागपूरचा एक सांस्कृतिक इतिहास जपला आहे. हा सांस्कृतिक इतिहास नागपूरच्या भूमीत कायम राहावा आणि आपला सलोखा कायम राहावा यासाठी सर्व समाजांनी, संघटनांनी, सरकारी आणि विरोधी पक्षांनी या सर्वांनी मिळून शांतता प्रस्थापित करण्याचे काम करायचे आहे. विरोधकांनी या घटनेकडे राजकीय दृष्टीने पाहू नये. ज्या समाजकंटकांकडून ही घटना घडली ते यात मुख्य आरोपी असतात. इथे समाजाचा किंवा राजकीय दोष नसतो. त्यामुळे पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी सर्व पक्षांनी काम करायचे आहे. नागपूरमधील सर्व राजकीय पक्ष, एनजीओ, संघटना, सामाजिक संस्था या सर्वांनी सरकारला सहकार्य करावे आणि नागपूर शहराची पारंपारिक विरासत आणि आपला सलोखा कायम ठेवावा," असे आवाहनही त्यांनी केले.
 
सोशल मीडिया अकाऊंट्सवर नजर
 
"संचारबंदीकरिता पर्याप्त पोलिसांचा बंदोबस्त आहे. पुन्हा अशी घटना होणार नाही याची काळजी पोलिस आणि शासनाने घेतली आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर आमचे जास्त लक्ष आहे. या अकाऊंटच्या माध्यमातून जे काही पसरवले जात आहे त्यावर आमचे लक्ष आहे," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0