नागपूर : नागपूर हिंसाचारातील जखमींच्या उपचाराबाबत कोणतीही हलगर्जी होता कामा नये, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. मंगळवार, १८ मार्च रोजी त्यांनी या घटनेत जखमी झालेले नागरिक, त्यांचे कुटुंबीय तसेच पोलिस अधिकाऱ्यांची रुग्णालयात भेट घेतली.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हे वाचलंत का? - हिंसाचाराच्या सूत्रधाराला बेड्या ठोका! नागपूर घटनेबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश
या आढावा बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी न्यू इरा हॉस्पिटलला भेट देऊन जखमी पोलीस अधिकारी आणि नागरिकांची विचारपूस केली. यावेळी उपचाराबाबत कोणतीही हलगर्जी होता कामा नये, अशा सूचना त्यांनी व्यवस्थापनाला दिल्या. तसेच हिंसाचारग्रस्त भागातील नागरिकांनी पोलिस आयुक्त कार्यालयात बावनकुळे यांची भेट घेत निवेदने दिली. दरम्यान, गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी मुलाहिजा ठेवू नका, सूत्रधाराच्या मुसक्या बांधा, असे स्पष्ट आदेश त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. तसेच नागपूरकरांनी शांततेसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या घटनेला जे जबाबदार आहेत त्या समाजकंटकांना पोलीस लवकरच शोधून काढतील. सोशल मीडियावरून ज्यांनी वातावरण बिघडविण्याचे काम केले त्यांचा शोध महत्त्वाचा आहे. त्या सर्वांवर आमची करडी नजर आहे. सी.सी.टि.व्ही.कॅमेरा फूटेच तपासून घेतले जाईल. कोणत्याही स्थितीत यापुढे नागपूरच्या शांततेला गालबोट लागणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. या घटनेत ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे तत्काळ पंचनामे सुरु झाले आहेत, असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.