मुंबई: ( Nitesh Rane on nagpur riots ) नागपूरमधील हिंसाचार पूर्वनियोजित होता, असा वास येत आहे. याबाबत सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. दंगेखोरांना पाकिस्तानचा 'अब्बा' आठवेल, अशी कारवाई आता होणार आहे, असा इशारा कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी मंगळवार, दि. १८ मार्च रोजी दिला.
विधानभवनात माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, "नागपूरच्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात निवेदन केले आहे. त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे. सकाळी बजरंग दल, विहिंप आणि हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करत होत्या. दुपारी तो विषय मिटलेला. मग संध्याकाळी काही लोक आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले. हे पूर्वनियोजित होते, असा वास येतोय. काही गोष्टी ठरवून केलेल्या होत्या. तेथे दंगल घडवायचीच आहे, अशी काही लोकांची तयारी होती का? यादिशेने चौकशी होईल. या राज्यात काहीही घडवणे आता सोपे राहिलेले नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी होते, त्यांच्यावर हल्ला करण्याचे कारण काय?", असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
नितेश राणे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्याविषयी विचारले असता नितेश राणे म्हणाले, सभागृहाबाहेर काय झाले, त्याला मी उत्तर देत नाही. सभागृहात कोणी माझा राजीनामा मागितला असता, तर मी त्यांना त्या ठिकाणी उत्तर दिले असते. पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्यांना हवे तर नाश्ता देईन. मत्स खात्याचा मंत्री म्हणून मी मासे पाठवीन, असा टोला राणे यांनी लगावला. 'भाजपला महाराष्ट्राला पेटता ठेवून मणिपूर करायचे आहे' अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. त्यावर बोलताना राणे म्हणाले, त्या व्यक्तीला पेटवणे काय, हे माहिती नाही. त्यांना आधी कंठ तरी फुटू द्या, असा टोला राणे यांनी लगावला.