मुंबई: ( state will need artificial intelligence CCTV Yogesh Kadam) राज्यात कृत्रिम बुद्धीमत्ताधारित (आर्टिफिशीअल इंटेलिजन्स) ‘सीसीटिव्ही कॅमरे’ लावण्यात येणार आहेत. या सीसीटिव्ही कॅमेर्यांद्वारे ‘फेस रिडिंग’द्वारे गुन्हेगारांची ओळख होणार आहेत, तसेच कुणाकडे शस्त्र असल्यास तेही या कॅमेर्यांमध्ये स्कॅन होणार होईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सोमवार, दि. १७ मार्च रोजी विधानसभेत दिली.
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुण्यातील बिघडलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्यांचा विषय लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत उपस्थित केला. त्यावर सविस्तर उत्तर देताना योगेश कदम यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘पुणे येथे एकूण सीसीटिव्ही कॅमेर्यांपैकी ४ हजार २२७ गृह विभागाने, २ हजार २५० महानगरपालिकेने, तर २ हजार कॅमेरे मेट्रोद्वारे लावण्यात आले आहेत. त्यांच्या दुरुस्तीचा कालावधी ६ वर्षांचा निश्चित करण्यात आला आहे. दुरुस्ती न झाल्यामुळे पुणे येथील १ हजार ३०० सीसीटिव्ही कॅमरे बंद आहेत. या बंद कॅमेर्यांची दुरुस्ती करतांना त्यांमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करण्यासाठी प्रयत्न केला जाईल’’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यप्रणाली निश्चित करणार
राज्यात लावण्यात येणारे ‘सीसीटिव्ही कॅमेरे’ विविध विभागांद्वारे लावले जातात. त्यामुळे या सर्वांचे संचालन एकाच ठिकाणी करता येईल, अशी कार्यपद्धती तयार करण्यात येईल. यासाठी नगरविकास, गृह आणि औद्योगिक प्रशिक्षण या विभागांची एकत्रित बैठक घेतली जाईल. भविष्यात सर्व विभागांकडून लावण्यात येणार्या ‘सीसीटिव्ही’ कॅमेर्यांमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करण्याविषयीचे धोरण निश्चित केले जाईल, असे मंत्री योगेश कदम म्हणाले.