Orry aishno Devi Drinking Case : हॉटेलमध्ये गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी ओरी अवात्रमाणी वर गुन्हा दाखल!
17-Mar-2025
Total Views |
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे असलेल्या एका हॉटेलमध्ये मद्यसेवन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याने ओरहान अवात्रमाणी उर्फ ओरी अवात्रमाणी कायदेशीर अडचणीत सापडला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या सात मित्रांसह उपस्थित असल्याचे दिसत आहे. या प्रकरणात जम्मू-काश्मीर पोलिसांनी ओरीसह आठ जणांवर भारतीय न्याय संहिता (BNSS) च्या कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच सर्वांना चौकशीसाठी नोटीस पाठवली जाणार आहे.
कलम २२३ नुसार कोणती शिक्षा होऊ शकते?
भारतीय न्याय संहितेतील (BNSS) कलम २२३ हे सार्वजनिक अधिकारीद्वारे जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास लागू होते. या कलमाअंतर्गत शिक्षा खालीलप्रमाणे असू शकते:
१. जर उल्लंघनामुळे कोणाला अडथळा, त्रास किंवा इजा होत असेल तर सहा महिने कारावास अथवा २,५०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
२. जर उल्लंघनामुळे मानवी जीवन, आरोग्य किंवा सुरक्षिततेस धोका निर्माण झाला किंवा दंगल होण्याची शक्यता निर्माण झाली असेल, तर एक वर्षांपर्यंत कारावास, ५००० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
ओरी आणि मित्रांविरोधात कायदेशीर कारवाई:
ओरी आणि त्याचे मित्र १६ मार्च रोजी कटरातून निघून गेले आणि ते रस्तेमार्गे जम्मू-काश्मीरच्या बाहेर गेले. या प्रकरणी कटरा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ओरी, दर्शन सिंग, पार्थ रैना, रितिक सिंग, राशी दत्ता, रक्षिता भोगल, शगुन कोहली आणि रशियन नागरिक अनास्तासिला अर्जामास्किना यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कटरा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक नेमले आहे. या पथकाचे नेतृत्व एसपी कटरा, डीसपी कटरा आणि एसएचओ कटरा करत आहेत. लवकरच सर्व आरोपींना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात येणार आहे. "धार्मिक स्थळी मद्य किंवा अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल," असे रियासी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.