राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य समजून घेणे आवश्यक!, रा.स्व.संघाबद्दल काय म्हणाले नरेंद्र मोदी?

17 Mar 2025 11:40:10
 Narendra Modi work of the Rashtriya Swayamsevak Sangh
 
नवी दिल्ली: ( Narendra Modi on Rashtriya Swayamsevak Sangh ) “बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकींना उपस्थित राहणे माझ्यासाठी आनंददायी होते. आपण देशासाठी समर्पित जीवन जगावे, हे मला रा. स्व. संघाने शिकवले. यावर्षी १०० वर्षे पूर्ण करणार्‍या रा. स्व. संघापेक्षा जगात अन्य दुसरा मोठा स्वयंसेवी संघ नाही.‘आरएसएस’ समजून घेणे सोपे काम नाही, त्याचे कार्य समजून घेणे आवश्यक आहे,” अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
 
यावेळी पंतप्रधान मोदींनी लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “मला रा. स्व. संघासारख्या प्रतिष्ठित संघटनेकडून जीवनाचे सार आणि मूल्ये शिकायला मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. देशाची सेवा करणे हे मला संघानेच शिकवले. यावर्षी ‘आरएसएस’ला १०० वर्षे पूर्ण करत आहे. जगात ‘आरएसएस’पेक्षा मोठी स्वयंसेवी संघटना नाही. ‘आरएसएस’ समजून घेणे सोपे काम नाही, त्याचे कार्य समजून घ्यावे लागेल. राष्ट्र हेच सर्वस्व आहे आणि समाजसेवा हीच देवाची सेवा आहे, हे रा. स्व. संघ सदस्यांना शिकवते.”
 
मी नेहमीच टीकेचे स्वागत करतो
 
आपल्यावर टीका करणार्‍यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “मी नेहमीच मी टीकेचे स्वागत करतो. माझा ठाम विश्वास आहे की तो लोकशाहीचा आत्मा आहे.”
 
भारत गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींची भूमी
 
“आम्हाला पूर्ण आशा आहे की, पाकिस्तान शांतीचा मार्ग निवडेल. पाकिस्तानच्या लोकांनाही शांतता हवी आहे. मी माझ्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानला आमंत्रित केले होते, जेणेकरून एक नवीन अध्याय सुरू होईल. परंतु, शांततेच्या प्रत्येक प्रयत्नावेळी शत्रुत्व आणि विश्वासघाताचा सामना करावा लागला. जेव्हा आपण शांततेबद्दल बोलतो, तेव्हा जग आपले ऐकते. कारण भारत ही गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींची भूमी आहे,” असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
 
माझ्या नावात नाही, १.४ अब्ज भारतीयांमध्ये ताकद
 
“जेव्हा मी जागतिक नेत्यांशी हस्तांदोलन करतो, तेव्हा मोदी नव्हे, तर 1.4 अब्ज भारतीय हस्तांदोलन करतात. माझी ताकद माझ्या नावात नाही, तर १.४ अब्ज भारतीयांच्या आणि देशाच्या कालातीत संस्कृती, वारशाच्या पाठिंब्यात आहे,” असेही त्यांनी सांगितले.
 
गुजरातमध्ये २००२ नंतर दंगल नाही
 
“दि. २७ फेब्रुवारी रोजी २००२ नमध्ये गोध्रा रेल्वे अपघाताची माहिती मिळाली. या दिवशी माझे सरकार अर्थसंकल्प सादर करणार होते. ती एक अतिशय गंभीर घटना होती. लोकांना जिवंत जाळण्यात आले. २००२ पूर्वी राज्यात २५० हून अधिक मोठ्या दंगली झाल्या. १९६९ च्या दंगली सहा महिने चालल्या. आमचा विरोधी पक्ष सत्तेत होता आणि त्यांनी आमच्याविरुद्धच्या या खोट्या प्रकरणांमध्ये आम्हाला शिक्षा व्हावी, यासाठी सर्वतोपरि प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना न जुमानता, न्यायव्यवस्थेने संपूर्ण घटनाक्रमाचे तपशीलवार विश्लेषण केले. आरोपींना शिक्षा झाली आहे. २००२ पूर्वी गुजरातमध्ये वारंवार दंगली होत होत्या. मात्र, २००२ नंतर कोणतीही मोठी घटना घडलेली नाही,” असेही पंतप्रधानांनी या पॉडकॉस्टमध्ये सांगितले.


Powered By Sangraha 9.0