भाषा म्हटले की, हल्ली अवतीभोवतीचे अनेक वाद आपल्याला आठवतात. भाषा म्हणजे संस्कृतीची वाहक आहे, भाषा ही माणसाची अस्मिता आहे. भाषा म्हणजे अनेक प्रश्न आणि भाषा म्हणजे, अनेक प्रश्नांची उत्तरेसुद्धा. थोडक्यात काय, तर भाषा हा तुमच्या माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग. परंतु, भाषा जीवनाचा अविभाज्य भाग कधीपासून झाला, याचा आपण कधी विचार केला आहे का? अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’मध्ये, या संदर्भात एक महत्त्वाचे संशोधन सुरू होते. या संशोधनामधून अनेक नवीन गोष्टी पुढे येत आहेत. या विद्यापीठातील एका प्रबंधानुसार असा निष्कर्ष काढता येतो की, सुमारे दीड लाख वर्षांपूर्वी मानवाच्या आयुष्यात भाषेचा जन्म झाला. या प्रबंधाच्या लेखक आणि ‘एमआयएटी’मधील प्राध्यपक शिगेरू मियागावा म्हणतात की, “अनुवांशिक जनुकशास्त्रातील नव्या संशोधनानुसार आपण हे खात्रीशीरपणे सांगू शकतो की, भाषेचा जन्म दीड लाख वर्षे जुना आहे. जगाच्या पाठीवर जिथे मानवी वसाहती निर्माण झाल्या, तिथे भाषा अस्तित्वात आली. त्याचबरोबर हे सुद्धा सांगता येईल की, जगभरातल्या भाषा कुठल्या ना कुठल्या प्रकारे एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत.”
‘एमआयटी’ विद्यापीठातील या नव्या संशोधनाअंर्तगत, गेली १८ वर्षे १५ वेगवेगळ्या जनुकीय गटांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाअंती असा निष्कर्ष निघाला की, जवळपास दीड लाख वर्षांपूर्वी मानवाच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाली. या स्थलांतराच्या प्रक्रियेमुळेच जैविक विविधता जन्माला आली. या जैविक विविधतेच्या माहितीमुळेच असे ठोसपणे सांगता येते की, एक प्रादेशिक अविभाजित गट एकेकाळी अस्तित्वात होता. प्राध्यापक शिगेरू मियागावा पुढे म्हणतात की, “संख्यात्मकदृष्ट्या नवीन माहिती मुबलक प्रमाणात अस्तित्वात आल्यामुळेच हे संशोधन शक्य झाले.” अनेक भाषातज्ज्ञांप्रमाणे मियागावा यांचेसुद्धा असे मत आहे की, “जगातल्या सगळ्या भाषा एकमेकांशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे जोडल्या गेल्या आहेत.” २०१० साली मियागावा यांनी आपल्या एका पुस्तकात इंग्रजी, जपानी आणि काही बांटू भाषांमधील साम्यस्थळे दाखवून दिली होती.
अनेक भाषातज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मानवाची भाषाक्षमता काही दशलक्ष वर्षांपूर्वी विकसित झाली. मियागावा मात्र या संशोधनाच्या दोन पावले पुढे जाऊन असा प्रश्न विचारतात की, भाषा विकसित करण्यासाठी आवश्यक अशी मानवाची संज्ञात्मक क्षमता केव्हा विकसित झाली? मियागावा म्हणतात की, “गुणात्मकदृष्ट्या मानवी भाषा, इतर प्राणीमात्रांच्या भाषेपेक्षा वेगळी आहे. भाषेच्या माध्यमातून शब्दांच्या आधारे, अत्यंत गुंतागुंतीची प्रणाली तयार होते. इतर कुठल्याही प्राण्याच्या संवाद प्रणालीमध्ये, अशा प्रकारची समांतर रचना आपल्याला आढळून येत नाही. आपल्या याच वेगळेपणामुळे, आपल्यामध्ये संवादाची क्षमता तयार होते. भाषा हे संवादाचे माध्यम आहेच परंतु, त्यासोबत ती एक स्वतंत्र संज्ञात्मक प्रणालीसुद्धा आहे.” मियागावा यांच्या म्हणण्यानुसार, भाषेच्या उगमाचा आधुनिक मानवाच्या वर्तनावर खूप मोठा प्रभाव पडला आहे. वर्तनाच्या विविध प्रणालींचा विकास भाषेमुळे शक्य झाला. लोकसमूहामध्ये वेगवेगळ्या आचारविचारांची देवाणघेवाण होत होती. दुसर्या बाजूला भाषेसंदर्भातील प्रबंधाच्या सहलेखिका टॅटरसॉल यांच्या मते, “भाषेच्या विकासामुळे, मानवाला प्रतिकात्मक विचार करण्याची सवय लागली. त्याचबरोबर भाषेमुळेच मानवाच्या संघटनात्मक कौशल्यांचाही विकास झाला.”
एक लाख वर्षांपूर्वी मानवाच्या उत्क्रांतीमध्ये, अनेक घटकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. परंतु, उत्क्रांतीच्या या व्यापक पटलावर भाषेने मध्यवर्ती भूमिका बजावली का? याविषयी काही तज्ज्ञांकडून साशंकता व्यक्त केली जाते. मियागावा यांच्या मते मात्र, भाषा आणि मानवाचा इतिहास या विषयात संशोधनासाठी भरपूर वाव आहे. या संशोधनाच्या माध्यमातून भाषेचा उगम आणि त्याचे वर्तमानात मानवाच्या जीवनावर होणारे विविधांगी परिणाम, याची सांधेजोड करता येईल. भाषेचा विचार करताना प्रामुख्याने त्यातील अस्मिता, त्याचे राजकारण याच रिंगणात आपण फिरत असतो; परंतु यामुळे व्यापक पातळीवर काही कार्य होताना आपल्याला दिसत नाही. दुसर्या बाजूला भाषेचा उगम आणि त्यावरील संशोधनकार्य, समाजासाठी खर्या अर्थाने दिशादर्शक आहे. त्यामुळे आपल्या मूळाचा शोध घेत, मानवी स्वभावाच्या अनेक कंगोर्यांचे आकलन व्हायला आपल्याला मदतच होईल.