या देशात अनेक आक्रमणे झाली. या प्रत्येक आक्रमणाचा उद्देश फक्त साम्राज्य विस्तारच नव्ह्ता, तर त्याचबरोबर भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म नासवण्याचे कार्यही या आक्रमकांनी केले. मात्र, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमामुळेच परिस्थिती आमूलाग्र बदलली हे खरेच. शिवरायांच्या जयंती(तिथीप्रमाणे)निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा मागोवा...
छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांनी अन्याय अत्याचाराचे, पारतंत्र्याचे युग बदलून स्वातंत्र्याचे, स्वधर्माचे, स्वसंस्कृतीचे, स्वभाषेचे युग निर्माण केले. शिवकाळापूर्वी या देशावर इ. स. ७११मध्ये मोहम्मद बिन कासीमपासून, इस्लामिक आक्रमणे सुरू झाली. या आक्रमणाची चार भागात विभागणी करण्यात येते. १) समाजावर झालेले अत्याचार, २) समाज नेतृत्वावर झालेले अत्याचार, ३) देवीदेवता, मठ-मंदिरे यांची झालेली तोडफोड, ४) स्त्रियांवर झालेले अत्याचार.
समाजावर झालेले अत्याचार...
१) अल्लाउद्दीन खिलजीने इ. स. १३०३ मध्ये चितोडचा किल्ला जिंकल्यानंतर आदेश दिला की, दिसेल त्या हिंदूंना कापून काढा. त्याच्या आदेशानुसार, ३० हजार हिंदूंची कत्तल करण्यात आली. ही सर्व हकीकत अमीर खुसरो याने, स्वतःच्या ‘खजाइन-उल-फुतुह’ या फारसी ग्रंथात लिहून ठेवली आहे.
२) फिरोजशहा तुघलकाने इ. स. १३६१मध्ये ओडिशावर आक्रमण करून असा आदेश दिला की, ज्या ठिकाणी हिंदूंनी बायका-पोर आणि नातेवाईकांसह आश्रय घेतला आहे, ते बेट रक्तात बुडवा. त्याच्या हुकुमानुसार, जवळपास एक लाख हिंदूंची कत्तल करण्यात आली.
३) इ. स. १६३२मध्ये ‘ईस्ट इंडिया कंपनी’चा पीटर मंडी नावाचा एक मनुष्य आग्रा येथून पटणा येथे जात असताना, वाटेत हिंदू रयतेचे बंड सुरू होते. पीटर मंडीने स्वतः पाहिलेले दृश्य, वाटेवरील गावे यांची नोंद स्वतःच्या डायरीमध्ये नमूद केली. तो लिहितो, “बकेवारपासून इथंपर्यंत २००पेक्षा अधिक मिनारांमध्ये फक्त चेहरा सोडून बाकी काही राहणार नाही, अशा रितीने चुन्यात बसवलेली मुंडकी होती. बादशहाच्या हुकुमानुसार, अब्दुलखानाने लोकांच्या मुंडक्यांचे मिनार उभे करून केलेला हा प्रताप होता.
समाज नेतृत्वावर झालेले अत्याचार
१) विजयनगर हे हिंदू साम्राज्य जगातील सुसंस्कृत, संपन्न, वैभवशाली राज्य होते. या विजयनगरचा राजा रामराय हा वयाने वृद्ध होता; पण राज्य चालवत होता. इ. स. १५६५मध्ये आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही हे सगळे सुलतान एकत्र येऊन, त्यांनी राजा रामरायाचा पराभव केला. निजामाने राजारामरायाचा शिरच्छेद करून, ते मस्तक भाल्यावर मिरवले. अली आदिलशहाने राजा रामरायाचे मस्तक विजापुरातील एका घाणेरड्या नाल्याच्या तोंडाला असे बसवले की, नालीतील घाण रामरायाच्या तोंडातून बाहेर पडावी.
२) इ. स. १६०६ मध्ये जहांगीर याचा मुलगा खुसरो याने बंड पुकारले. शिखांचे पाचवे गुरू अर्जुनसिंह आणि खुसरो यांची भेट झाली. भेटीमध्ये अनेक गोष्टींवर चर्चा झाली. खुसरोच्या कपाळावर हिंदू पद्धतीचा टिळा गुरू अर्जुनसिंह यांनी लावला. या घटनेवरून गर्विष्ठ गुरू अर्जुन यांना हजर करावे, असा हुकूम जहांगीर याने सोडला. खुसरोचे स्वागत केल्याच्या आरोपावरून, गुरू अर्जुनसिंह यांना हालहाल करून ठार मारण्यात आले.
देवी-देवता, मठ, मंदिरे यांची झालेली तोडफोड...
मंदिर पाडणे, त्यातील मूर्ती फोडणे व त्या जागेवर स्वतःचे प्रार्थनास्थळ उभे करणे, हा इथल्या इस्लामिक राजवटींचा नित्याचा कार्यक्रम होता.
१) इ. स. १०२५ मध्ये महमूद गझनीने सोरटी सोमनाथावर आक्रमण करून, सोरटी सोमनाथाचे मंदिर पूर्णपणे जमीनदोस्त केले. सोमनाथाची मूर्ती भंग करून, तिचे तुकडे गझनीला नेले. अल्बेरुने याविषयी लिहून ठेवले की, “सोमनाथाच्या मूर्तींचे तुकडे मशिदीच्या दरवाजात टाकले होते आणि आपल्या पायाला लागलेला चिखल काढण्यासाठी, त्या मूर्तींच्या तुकड्यावर लोक आपले पाय घासत असत.”
२) उज्जैन हिंदूंसाठी महत्त्वाचे आणि पवित्र असणारे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक तीर्थक्षेत्र. सुलतान इल्तूमिश याने उज्जैनवर आक्रमण केले आणि संपूर्ण मंदिर पाडून टाकले. तसेच, महाकालेश्वराची मूर्ती आपल्यासोबत दिल्लीला नेऊन, दिल्लीतील जामा मशिदीच्या पुढे ती मशिदीत येणार्यांनी तुडवावी म्हणून ठेवली.
३) इ. स. १६६९ मध्ये औरंगजेबाने हुकूम काढला की, काशी विश्वनाथाचे मंदिर पाडून टाकावे. त्याच्या आदेशाने ते मंदिर अर्धवट पाडून, त्यावरच मशीद उभी करण्यात आली.
४) मोहम्मद बख्तियार खिलजी या कुतुबुद्दीन ऐबकाच्या सरदाराने इ. स. १२०२ मध्ये, बिहारमधील एक मोठा बौद्ध विहार पाडून टाकला आणि तिथल्या बौद्ध भिक्खुंची सरसकट कत्तल केली. याविषयीचा इतिहास मीनाजुद्दीन याने ‘तबकात-इ-नासिरी’ या त्याच्या फारसी ग्रंथात लिहून ठेवला आहे. तसेच, बिहारमधील अनेक बौद्धविहार, अनेक जैन मंदिरे व जगन्नाथपुरीचे मंदिर व आसपास असलेली अनेक मंदिरे व विहार पाडून, त्यांचे अवशेष निरनिराळ्या मशिदींच्या पायर्यांवर टाकले.
स्त्रियांवर झालेले अत्याचार...
इस्लामिक राजवटीमध्ये स्त्रियांची अवस्था अतिशय बिकट होती. कोणीही यावे आमच्या माय-भगिनीला घोड्यावर टाकावे, तिच्यावर बलात्कार करावा, महिलांचे ओठ शिवून त्यांना गुलाम म्हणून बाजारामध्ये विकावे, त्यांच्या नशिबी जनानखान्याचे आयुष्य यावे अशी अवस्था या देशातील महिलांची होती. युद्धात हाती सापडलेल्या विवाहित किंवा अविवाहित काफिर स्त्रियांशी शरीरसंबंध करण्याचा हक्कच, इस्लाममध्ये मुसलमान पुरुषांना दिला आहे. याचाच उपयोग भारतातील इस्लामिक राजवटी करत होत्या.
१) इ. स. ११६९ मध्ये गुजरातमधील राजा कर्ण यांच्यावर अलाउद्दीन खिलजीच्या सैन्याने आक्रमण केले. या युद्धामध्ये राजाकर्ण यांच्या स्त्रिया व मुली इस्लामी सैन्याच्या हाती सापडल्या. तेव्हा राजा कर्ण यांची पत्नी कमलादेवी यांना, अलाउद्दीन खिलजीने आपल्या जनानखान्यात सामील केले.
२) इ. स. १३६१ मध्ये फिरोजशहा तुघलकाने ओडिशावर आक्रमण केले. त्यावेळी इस्लामिक आक्रमणाला घाबरून जाजनगरच्या जवळ एक लाख लोकांनी, आपल्या बायका-मुली व नातेवाईकांसह एका बेटाजवळ आश्रय घेतला होता. ही माहिती बादशाही सैन्याला समजली, त्यावेळी बादशाही सैन्याने तरुण, म्हातार्या, लेकुरवाळ्या, गर्भवती इत्यादी सर्व प्रकारच्या स्त्रियांना कैद करून, आपल्या सैनिकांच्या घरी गुलाम म्हणून कामाला लावले.
इस्लामिक राजवटी, असे अनन्वित अत्याचार हिंदू समाजावर करत आहेत, याची संपूर्ण जाणीव जिजामातांना होती. त्यांना या अन्यायाविरोधात लढणारा एक वीर पाहायचा होता. शिवरायांच्या जन्माच्या कथेचे वर्णन करताना, कवींद्र परमानंद जिजाऊंच्या डोहाळ्यांचे वर्णन करतात. जिजाऊ गरोदर आहेत आणि त्यांना हत्तींवर, वाघांवर आणि गडांवर आरोहण करावे. शुभ्रछताखाली सुवर्ण सिंहासनावर बसावे. झेंडा उंच उंच उभारावा. धनुष्यबाण, भाला, तलवार आणि चिलखत धारण करून लढाया कराव्या. गड हस्तगत करावा. विजयश्री मिळवावी. मोठमोठे दानधर्म करावे. धर्म स्थापना करावी. अशा अनेक प्रकारचे डोहाळे लागले. म्हणूनच धर्मसंस्थापनेची इच्छा राजांना उपजत होती, असे म्हणायला हरकत नाही.
जिजाऊंनी शिवरायांना गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदू समाजावर, समाज नेतृत्वावर, स्त्रियांवर व इथल्या देवी-देवता, मठ-मंदिरे यांच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती लहानपणापासूनच दिली. प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जगण्याचे ध्येय असते की, पारतंत्र्यात असलेल्या समाजाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे, याच गोष्टींची जाणीव करून दिली. त्यामुळे शिवरायांनी अगदी लहानपणापासून ठरवले की, आपल्याला या पारतंत्र्यात असलेल्या समाजाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे आहे. गेल्या ७५० वर्षांपासून ज्या समाजावर अत्याचार करण्यात आले, त्या समाजाला शिवरायांनी स्वातंत्र्य देण्याचे काम केले. ज्या समाज नेतृत्वावर हल्ले करण्यात आले, त्या समाज नेतृत्वाच्या हातात शिवरायांनी तलवार देऊन, त्यांना अन्य अत्याचार विरुद्ध लढण्यासाठी उभे करून त्यांना विजयश्री मिळवून देण्याचे काम केले.
ज्या देवी-देवता, मठ-मंदिरांची तोडफोड करण्यात आली, त्यापैकी अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार शिवरायांनी केला. तिरुवन्नामलाई येथील शिवमंदिर आणि समीरतीपेरूमल येथील विष्णु मंदिर आक्रमकांनी बाटवले होते आणि ही मंदिरे पाडून, त्या ठिकाणी मशिदी उभ्या केल्या होत्या. शिवाजी महाराजांनी या दोन्ही मशिदी पाडून, त्याचे पुन्हा मंदिरामध्ये रूपांतर केले. या घटनेचा समकालीन प्रत्यक्ष पुरावा मिळतो, तो म्हणजे रघुनाथ नारायण हनुमंते यांनी लिहिलेल्या ‘राजव्यवहार कोश’ या ग्रंथात. ही मंदिरे पुन्हा उभारावी, अशी आज्ञा शिवरायांनी रघुनाथ पंतांना दिल्याचे लिहिले आहे. समाजात काळानुसार जे बदल व्हायला हवेत ते बदल घडवून, काळानुसार सुधारणा करण्याचे काम शिवरायांनी केले. परधर्मात गेलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू करता येत नव्हते; पण शिवाजी महाराजांनी मुसलमान झालेल्या नेतोजी पालकरांना पुन्हा हिंदू केले आणि एक क्रांतिकारी पाऊल उचलले.
समकालीन संदर्भ आणि पुरावे पाहिले, तर आपल्या लक्षात येते की, शिवाजी महाराज हे हिंदूधर्माभिमानी होते आणि त्यांनी हिंदूंच्या रक्षणासाठी मोठे कार्य केले. इंग्रजांच्या राजापूर वखारीचा प्रमुख हेन्री रेव्हींगटन याने दि. १३ फेब्रुवारी १६६० रोजी शिवाजी महाराजांना पत्र लिहिले आहे. त्यात महाराजांना उद्देशून ’General og Hindu Forces’ अर्थात हिंदूसेनाधिपती असा उल्लेख केला आहे. कविराज भूषण हा शिवरायांच्या दरबारातला कवी होता. त्याने शिवरायांसमोर ‘शिवबावनी’ ही प्रमुख रचना लिहिली. त्यात तो लिहितो,
कासीहुकी कला जाती मथुरा मसीत होती
सिवाजी न होतो तो सुनति होत सबकी
शिवाजी महाराज नसते, तर काशीचा प्रभाव गेला असता. मथुरेत मशीद उभी राहिली असती आणि सगळ्या हिंदूंनासुद्धा सुंता करून घ्यावी लागली असती. दि. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीतील शेवटच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की, शिवाजी महाराज हे हिंदूंच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत होते. आपला देश प्रत्येक क्षेत्रात संपन्न आणि आत्मनिर्भर व्हावा, परमवैभवाच्या सर्वोच्च शिखरावर जावा, समाजातील सर्व प्रकारचा भेदभाव नाहीसा होऊन समतायुक्त, शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा, यासाठी शिवरायांचे पुन्हा पुन्हा स्मरण आणि अनुकरण करणे गरजेचे आहे.
(लेखक ‘श्री शिवशंभू विचार मंच, पुणे’ महानगरमध्ये वक्ता म्हणून सक्रिय असून, या संस्थेमध्ये संपर्क प्रमुख म्हणूनही दायित्व सांभाळत आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर लेखकांची ५००च्यावर व्याख्याने झाली आहेत.)