बेडूकदादांचे डरावडराव

    17-Mar-2025
Total Views | 31

article explores voice recognition in frogs
 
 
दि. २० मार्च रोजी जगभरात जागतिक बेडूक दिन साजरा केला जाईल. आपण नेहमीच सुंदर दिसणार्‍या गोष्टींकडे प्रामुख्याने आकर्षित होतो. बर्‍याचजणांना बेडूक सुंदर वाटत नाही. मात्र, बेडूक सुंदर का वाटत नाहीत? त्यांचे आवाज काही वेळा विक्षिप्त का असतात? ते आवाज कसे काढतात? याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
 
जगातील सर्वांत जुन्या पृष्ठवंशी कणाधारी प्राण्यांपैकी एक म्हणजे बेडूक. साधारण ३७० दशलक्ष वर्षांपूर्वी lobe-finned fish या जलचर माशासारख्या प्राण्यापासून बेडकांची उत्क्रांती झाली आणि पहिले पृष्ठवंशी प्राणी जमिनीवर आले. त्याकाळचे उभयचर पृथ्वीच्या तत्कालीन वातावरणासाठी असे काही उत्क्रांत झाले की त्यांनी सुमारे १०० दशलक्ष वर्षे जमिनीवर आणि पाण्यात राज्य केले. त्यानंतर उभयचरांची जागा सरीसृपांनी घेतली.
 
बेडूक हा उभयचर प्राणी आहे. इंग्रजीमध्ये त्यासाठी amphibian हा शब्द वापरला आहे. उभयचर म्हणजे असे प्राणी जे जमिनीवर आणि पाण्यात आपले जीवन जगू शकतात, ही आपल्याला शाळेमध्ये शिकवली जाणारी व्याख्या. पण याचा खरा अर्थ असा आहे, उभयचर म्हणजे असे प्राणी ज्यांच्या आयुष्याचा काही काळ पाण्यात आणि उर्वरित काळ हा जमिनीवर व्यतीत होतो. भारतामध्ये उभयचरांच्या ४५४ प्रजाती आढळतात. त्यांपैकी ३५९ प्रजाती (८० टक्के) या स्थलनिष्ठ म्हणजेच फक्त भारतातच सापडणार्‍या आहेत. महाराष्ट्रामध्ये हाच आकडा ४३ आणि दहा (२३ टक्के) असा आहे. उन्हाळा संपून पावसाची जोरदार सर येऊन गेली की, डबकी साठायला सुरुवात होते आणि सूर्यास्तानंतर याच डबक्यांच्या आजूबाजूने बेडकांचा आवाज यायला लागतो. वर्षभर गायब असणारे हे बेडूक अचानक पावसाळ्यात कुठून येत असतील आणि डबक्यापाशी किंवा पाणथळ जागीच यांचा आवाज का येत असेल?
 
साप, सरडे, पक्षी यांसारखेच बेडूक अंडी देतात. पण यांच्या अंड्याचे वैशिष्ट्य म्हणजे, या अंड्यांवर कोणतेही कठीण आवरण नसते. ही अंडी जर कोरड्या वातावरणात घातली, तर आतील अर्भकाची वाढ होणे मुश्किल. त्यामुळेच बेडकाची मादी पाण्यामध्ये, पाणवठ्याच्या शेजारी किंवा ओलसर जागी अंडी देते आणि त्यामुळे मादीला आकर्षित करण्यासाठी नर बेडूक डबक्यापाशी, पाणथळ जागी एकत्र येतात आणि आवाज देतात.
 
बेडकांचे आवाज
 
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण साधारण १८० दशलक्ष वर्षांपूर्वी बेडकांनी आवाजामार्फत संपर्क साधायला सुरुवात केली. आवाजाच्या मदतीने साधलेले संपर्क हे द्रुक संपर्कापेक्षा (रंग, आकार, हालचाली) अधिक प्रभावी असतात. त्यामुळे निशाचर प्राण्यांमध्ये (प्रामुख्याने बेडकांमध्ये) ध्वनिसंपर्काची उत्क्रांती झाली. इतर पक्षी, प्राणी यांच्या प्रमाणेच बेडूकसुद्धा स्वरयंत्राच्या मदतीने आवाज देतात. फुप्फुसात भरून घेतलेली हवा श्वासनलिकेवाटे स्वरयंत्रात सोडली जाते. स्वरयंत्राच्या असणार्‍या ध्वनिपट्टिका एकमेकांसमोर कंप पावतात आणि आवाज तयार होतो (जत्रेत मिळणार्‍या पिपाणीशी याची तुलना होऊ शकते). पण यानंतर खरी गंमत आहे. तुम्ही आवाज देणार्‍या बेडकाला कधी पाहिले आहे का? बेडूक जेव्हा आवाज देतो, तेव्हा त्याच्या गळ्याखाली एक किंवा दोन त्वचेच्या पिशव्या फुग्यासारख्या फुगवल्या जातात. बेडकाचे स्वरयंत्र मोठा आवाज देऊ शकत नाही. त्यामुळे श्वसनलिकेतून येणारा आवाज या पिशव्यांमध्ये बहुगुणित (amplify) केला जातो.
 
आवाजामधील विविधता
 
बेडकांच्या आवाजातसुद्धा विविधता आहे. बेडकांच्या आवाजांमध्ये पक्ष्यांसारखी विविधता नसली, तरी त्यामध्ये वैविध्य आहे. बेडकाच्या प्रत्येक प्रजातीचा आवाज हा वेगळा असतो. आवाजाचा वापर प्रामुख्याने आपल्या प्रजातीच्या मादीला आकर्षित करण्यासाठी केला जात असल्याने प्रत्येक प्रजातीचा आवाज, त्यातले चढ-उतार, वारंवारता (frequency) यांमध्ये अचंबित करणारी विविधता आहे. डबक्यापासून येणार्‍या बेडकांचा आवाज हा तेथील सर्व नरांचा एकत्रित येणारा आवाज (कोरस) असतो. एवढेच नाही, तर प्रत्येक प्रजातीच्या वेगवेगळ्या नरांचा आवाजसुद्धा वेगवेगळा असतो. जसे दोन बुलबुल पक्ष्यांचे गाणे जरी सारखे असले, तरी त्यांचे आवाज वेगवेगळे असतात. आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, बेडकांमध्ये फक्त नर आवाज देतो. मादीला आकर्षित करण्यासाठीचा आवाज वेगळा आणि दुसर्‍या नरांसोबत स्पर्धा करण्यासाठीचा आवाज वेगळा असू शकतो.
 
 
 voice recognition in frogs
 
Wrinkled frog च्या आवाजाची वारंवारता (Frequency) 
 
 
द्रुक संपर्काचा वापर
 
ध्वनिसंपर्कासोबतच काही बेडूक द्रुक संपर्काचा वापर करतात. महाराष्ट्रातील आंबोलीच्या जंगलात झर्‍यांमध्ये NORTHERN DANCING FROG हा बेडूक सापडतो. पावसाळा संपल्यानंतर झर्‍यांमधील पाणी कमी होते. त्यावेळी हा बेडूक मादीला आकर्षित करण्यासाठी उच्च वारंवारतेचा (high frequency) आवाज देतो. आवाज देताना मागचा एक पाय हवेमध्ये गोल फिरवतो. हा वैशिष्ट्यपूर्ण बेडूक फक्त आंबोलीमध्येच सापडतो. इंडियन बुल फ्रॉग (Hoplobatrachus tigerinus, मराठी नाव - सोन्या बेडूक) ही भारतामध्ये आढळणारी बेडकाची सर्वांत मोठी प्रजात आहे. इतर महिन्यांत हिरवट रंगाचे दिसणार्‍या या प्रजातीच्या नरांचा रंग पावसाळ्यात पिवळा धमक होतो. त्याच्या गळ्याखाली दोन मोठ्या जांभळ्या रंगाच्या पिशव्या दिसतात. पहिल्या दोन जोरदार पावसानंतर हे पिवळे नर मोठ्या डबक्यांमध्ये एकत्र येतात आणि बैलासारखा आवाज देऊन माद्यांना आकर्षित करतात. आवाजाच्या पिशव्यांचे रंग, पायाच्या किंवा शरीराच्या हालचाली यांची सांगड आवाजासोबत घातली जाते आणि द्रुक-श्राव्य संदेश इतर बेडकांपर्यंत पोहोचवला जातो.
 
आवाजाची ओळख
 
एवढ्या मोठ्या बेडकांच्या घोळक्यात तीन-चारपेक्षा जास्त प्रजातीचे नर असतात. ते एकत्रच आवाज देतात. मग मादीला नक्की समजते कसे की, आपल्या प्रजातीच्या नराचा आवाज कोणता? याचे उत्तर आहे बेडकाच्या कानांमध्ये. बेडकाला आपल्यासारखे बाह्यकर्ण नाहीत. त्यांच्या डोळ्यांमागे त्वचेचा गोलाकार पडदा असतो. या पडद्यामागे छोटा अंतर्कर्ण असतो, ज्याच्या मदतीने बेडूक ऐकू शकतो. बेडकांची श्राव्यक्षमता ही नेमकी त्या प्रजातीच्या वारंवारतेसाठी (frequency) बनलेली असते. त्यामुळे मादीला नेमक्या आपल्याच प्रजातीच्या नरांचे आवाज प्रामुख्याने ऐकू जातात आणि आपल्याच प्रजातीचा नर शोधण्यास मदत होते.
 
बेडूक उत्तम प्रतीच्या पर्यावरणाचा सूचक आहे. पर्यावरणावर होणार्‍या लहान बदलांचा बेडकांवर लगेच परिणाम होतो. पाणी, हवा प्रदूषण, पाणथळ जागांचा नाश यांशिवाय ध्वनी आणि प्रकाश प्रदूषणाचासुद्धा यांवर परिणाम होतो. रात्रीच्या वेळी बेडूक दिसणे तसे अवघड असल्याने त्यांचा आवाज हाच त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. त्यामुळेच बेडकांच्या आवाजाचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. विणीच्या हंगामात बेडूक आवाज करू शकले नाहीत, तर प्रजनन खंडित होते आणि कालांतराने स्थानिक अस्तित्व नष्ट होते. गेल्या दहा वर्षांत अनेक भारतीय अभ्यासक व विद्यार्थी बेडकांच्या आवाजांवर संशोधन करीत आहेत.
 
या अभ्यासाचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. उच्च प्रतीचे रेकॉर्डर्स आणि सॉफ्टवेअर वापरून बेडकांचे आवाज आलेखरूप चित्रित करता येतात. या आलेखांना ‘स्पेक्टरोग्राम’ म्हणतात. तुम्ही अगदी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन वापरूनसुद्धा हे आवाज चित्रित करू शकता. बेडकांच्या आवाजांचे कोडे अजूनही पूर्णपणे उलगडले नाही. त्यामुळे नवोदित विद्यार्थ्यांपुढे संशोधनासाठी निसर्गरूपी व्यासपीठ खुले आहे.
 

निनाद गोसावी
 
 
(लेखक बेडकांवर संशोधनाचे काम करतात.)
अग्रलेख
जरुर वाचा