लांब चोचीचा अ‘सामान्य’ डॉल्फिन

निळ्या देवमाशाच्या शोधात : भाग - ४

    17-Mar-2025
Total Views | 7
 
article about the long-beaked common dolphin
 
 
 
जगभरात ‘डेल्फीनीडे’ वा सोप्या शब्दांत बोलायचे झाल्यास डॉल्फिन या कुळात ३७ प्रजाती असल्याची नोंद आहे. यातील १५ डॉल्फिन प्रजाती या आपल्या भारतीय सागरी क्षेत्रात विचरण करतात. आजच्या लेखातून आपण ‘लांब-चोचीचा सामान्य डॉल्फिन’विषयी जाणून घेऊया...
 
लॅान्ग-बिक कॉमन डॉल्फिन’ या डॉल्फिनच्या प्रजातीला आपण ‘लांब-चोचीचा सामान्य डॉल्फिन’ असे संबोधू. याचे शास्त्रीय नाव Delphinus capensis असे आहे. या डॉल्फिन प्रजातीचे वजन साधारण ७२ ते २२६ किलो, लांबी सहा ते ८.५ फूट, तर सरासरी ४० वर्षे इतके आयुर्मान असते. शरीराच्या लांबीबद्दल एक महत्त्वाची विशेष बाब म्हणजे, या प्रजातीतील नर डॉल्फिन हे मादी डॉल्फिनच्या तुलनेने निदान पाच टक्के लांब असतात. इतर डॉल्फिनच्या प्रजातीसोबत जर आपण या प्राजातीची तुलना केल्यास, याची चोच थोडी लांब असते, ज्यात वरच्या आणि खालच्या जबड्यात ४७ ते ६७ छोटे परंतु टोकदार दात असतात.
 
या डॉल्फिनच्या डोळ्यांपासून ते वर असलेल्या मोठ्या परापर्यंत फिकट पिवळ्या रंगाची एक पट्टी असते. हीच फिकट पिवळी पट्टी शरीराच्या मधल्या भागापासून पुढे थोडी गडद रंगाची होत शेपटीपर्यंत जाते. त्याचबरोबर एक गडद काळ्या रंगाची पट्टी त्याच्या डोळ्यांकडून समोर असते. वेगवेगळ्या सागरी प्रदेशानुरूप या रंगसंगतीमध्ये काही तफावत जाणवते. डॉल्फिनची ही प्रजात बहुधा मोठ्या समूहामध्ये (१०० ते ३००) विचरण करताना दिसून येते. कधीकधी मात्र यापेक्षा कमी डॉल्फिन आपणास दिसू शकतात.
 
मांदेली, तारली, माकुल इत्यादी मत्स्यप्रजाती यांचा समावेश त्याच्या खाद्यामध्ये होतो. त्यामुळे जेथे या मत्स्यप्रजाती मुबलकतेने आढळून येतात, तेथे लांब-चोचीचा सामान्य डॉल्फिन दिसण्याची अधिक शक्यता असते. त्याचबरोबर समुद्र किनार्‍यापासून साधारण ५० ते १०० सागरी मैल इतक्या अंतरापर्यंत या प्रजाती विचरण करत असतात. बहुधा उथळ समुद्र किनारे आणि तेथे असलेली अन्नाची मुबलकता हा त्याचा आवडता आधिवास आहे. आपल्या सर्वसाधारण ४० वर्षांच्या जीवनात या डॉल्फिन प्रजाती वयाच्या दहा वर्षांतर पिल्ले जन्माला घालतात. साधारण दहा ते ११ महिने डॉल्फिनची पिल्ले आपल्या आईच्या पोटात वाढतात आणि मग बाहेर येतात. सुरुवातीला त्याची लांबी २.५ ते तीन फूट इतकीच असते, जी वाढून जवळपास ६.५ फूट इतकी होते. वावरीची जाळी, किनारी धरण पद्धतीने उभी केलेली जाळी, पर्ससिन आणि ट्रालिंग पद्धतीची मासेमारी या प्रकारात हे डॉल्फिन अडकून जखमी वा मृत होतात. त्याचबरोबर, समुद्रात जेव्हा हानिकारक शेवाळ मोठ्या प्रमाणात असते, त्यावेळीदेखील या प्रजातीला धोका असतो.
 
एक मासेमारी बांधव म्हणून त्याचबरोबर समुद्र संवर्धन करणार्‍या भूमिकेतून आपण नक्की या प्रजातीला समजून घेऊन तिचे रक्षण केले पाहिजे. सागरी अधिवासातील अन्नसाखळीमध्ये या प्रजाती महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ज्यामुळे त्याच्या अधिवास आणि संख्येमध्ये जर काही नकारात्मक बदल झाला, तर त्याचे दूरगामी परिणाम मासेमारी, समुद्र पर्यटन आणि संपूर्ण मानवी जीवनावर कमी अधिक प्रमाणात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दिसून येऊ शकतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत विशेषतः सागरी मासेमारी समाज आणि किनारपट्टी क्षेत्रात राहणार्‍या नागरिकांपर्यंत आपण हे पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
 
मासेमारी करताना जाळ्यात अडकू नये, म्हणून मासेमार काय करू शकतात? 
  • डॉल्फिन पाण्यात पोहताना दिसत असतील, तर जाणीवपूर्वक आपली मासेमारी बोट त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे. जमले तर आपला वेग कमी करणे. साधारण तो सहा सागरी मैल प्रतितास यापेक्षा अधिक नसावा.
  • डॉल्फिन समुद्रात दिसत असतील, तर त्यांना काही खाऊ घालू नका.
  • डॉल्फिन जर मासेमारी जाळ्यात अडकले असतील, तर त्यांची योग्य काळजी घेऊन सुटका करा किंवा सबंधित आधिकारिवर्गाला त्यासंबंधी माहिती द्या.
  • जर कोणी डॉल्फिन आणि इतर सागरी सस्तन प्राणी यांना त्रास देत असेल, तर ती बाब निदर्शनात आणून देणे.
  • ‘भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२’ अंतर्गत या प्रजातीला कोणत्याही स्वरूपात त्रास देणे हा कायद्याने गुन्हा आहे.
  • त्याचबरोबर ‘सागरी सस्तन प्राणी संरक्षण कायदा’ (MMP act, US) अंतर्गत या प्रजातीला संरक्षण देण्यात आले आहे.
 
 
 
 
 प्रदीप चोगले
 
(लेखक ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी - इंडिया’ या संस्थेत सागरी संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा