तुमच्याही आस्था जाहीर कराच!

17 Mar 2025 22:16:40
 
Supriya Sule
 
कुणाच्या आस्था काय, हा वैयक्तिक मुद्दा असू शकतो. मात्र, हिंदूंच्या मानबिंदूंचा उपमर्द करणारे लोक जर तुमचे आस्थेचे विषय असतील, तर संघर्ष उभा राहणारच आहे!
 
एकंदरीतच ‘छावा’ चित्रपटाने महाराष्ट्रातलेच नव्हे, तर देशभरातले वातावरण ढवळून काढले. सिनेमाच्या निकषांवर सिनेमा खरा उतरलाच, पण हिंदूंच्या तीव्र भावना बोथट करून स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्याच्या वृत्तीचा अफजलखानी कोथळाच यानिमित्ताने बाहेर पडला. औरंगजेबाचे खरे रूप इतिहासाच्या तथ्यात पुराव्यांसह नोंदवलेले आहे. मात्र, पुरोगामित्वाचे ताबूत नाचवायचे असतील, तर खोट्या इतिहासाचे बुरखे घालावेच लागतात. हा बुरखा जरा जरी वर उचलला, तरी त्याखाली आत्याच्या नावाखाली वावरणारे मिश्या असलेले करामती काकाच सापडतात. एखादा कावळा मेला की, त्याचे जातभाई त्याच्या मुडद्याभोवती गोळा होतात. त्यांच्यात अंत्यसंस्कार कसे करतात माहीत नाही, पण कावकाव करून कोलाहल मात्र करतातच. औरंगजेबाचे तसेच झाले आहे. मराठ्यांच्या पराक्रमामुळे, धर्मासाठी लढण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे महाराष्ट्र काही केल्या औरंगजेबासमोर झुकला नाही. औरंगजेब मात्र महाराष्ट्रातच मरण पावला. आजच्या छत्रपती संभाजीनगरात आणि कधीकाळी हिंदूंची समृद्ध राजधानी असलेल्या देवगिरीत त्याला गाडावे लागले. याच देवगिरीतून अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्राची राजकन्या जेष्ठापल्ली पळविली होती आणि याच देवगिरीत महाराष्ट्राच्या राजपुत्राला आणि दुसर्‍या छत्रपतींना हालहाल करून मारणार्‍या औरंगजेबाला गाडावे लागले. महाराष्ट्राच्या शत्रूच्या अंताचा हाच खरा इतिहास आहे. मात्र, खरा इतिहास जाचक असतो आणि तो पुन्हा पुन्हा सांगितला गेला, तर तो अस्सल हिंदू अस्मिता निर्माण करतो आणि दाढ्या कुरवाळून निर्माण केलेल्या मतपेट्यांना ठोकर मारतो. यातून दुकाने बंद होतात, ती ढोंग्यांची!
 
शरद पवारांच्या कन्या व त्यांच्या उरलेल्या पक्षाच्या उत्तराधिकारी सुप्रिया सुळे यांना यातला धोका जाणवायला लागला आहे. औरंगजेबाची कबर उखडली, तर कोणाला काय फरक पडणार? पण, औरंग्याच्या वारसांनी मतांचे जे दान भरभरून या मंडळींच्या पदरात टाकले आहे, त्यासाठी हा आकांडतांडव चालू आहे. ‘छावा’मुळे औरंगजेबाची कबर उखडण्याचा जो काही सिलसिला आता सुरू झाला आहे, तो थांबणार नाही. रामजन्मभूमीचा लढा हिंदूंनी 500 वर्षे लढला आणि न्यायसंगत मार्गाने जिंकलासुद्धा. महाराष्ट्र ही पराक्रमाची भूमी. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पानिपतपर्यंत लढलेल्या अठरापगड जातींच्या महाराष्ट्र धर्माच्या पाईकांपर्यंत जे जे धर्मरक्षणाचे उदात्त ध्येय ठेवून लढले, त्यांच्यासमोर शत्रू म्हणून कुणी ना कुणी धर्मांध मुसलमानच उभे होते. जेष्ठापल्लीला अल्लाउद्दीन खिलजीने पळविले, औरंगजेबाने संभाजीराजांची हाल हाल करून हत्या केली, दत्ताजी शिंदेंना नजीबाने कपटाने मारले, अब्दालीशी लढताना विश्वासराव पेशवे मारले गेले, हे ऐतिहासिक वास्तव आहे. राजकीय वरदहस्तावर जगणार्‍या पोंगापंडितांना धर्माची लढाई वाटत नाही. खरेतर, हे ‘जिहाद’ला उत्तर देणारे धर्मयुद्धच आहे. छत्रपती शिवाजी महाराज या धर्मयुद्धाचे मूळ प्रेरणास्थान बनले. ‘महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे॥’ ही समर्थ रामदासांची उक्ती महाराष्ट्राच्या धर्माभिमानी वृत्तीची साक्ष देणारी होतीच; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा विशद करणारी आहे. मग हा सगळा इतिहास बोथट करायचा ठरवला, की कथी आणि कथानके रचली जातात. महापुरुषांविषयी ‘फेक नॅरेटिव्ह’ तयार केले जातात आणि जाणते-अजाणतेपणे शहाणे म्हणून ओळखले जाणारे लोकही त्यात सहभागी होऊन जातात. गद्दारी करणारे टिचभर हिंदू आणि कुठल्यातरी फालतू चाकरीत असणारे, हाताच्या बोटावर मोजता येणारे मुसलमान सैनिक ही या कथानकांची प्रमुख पात्रे असतात. मदारी मेहतरचे पात्रही असेच घुसडवण्यात आले आहे. फुले दाम्पत्यांमध्ये फातिमा घुसवली गेली, तसाच हा मदारी मेहतर. मात्र, अशी पात्रे अनेक राजकीय बेरोजगारांना कायमची रोजीरोटी देऊन जातात. हिंदूंच्या आस्था पायदळी तुडवायच्या, मात्र अल्पसंख्याकांच्या आस्था तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायच्या, ही शरद पवार कंपूची जुनीच नीती. यात नव्याने बाटलेले संजय राऊत व उद्धव ठाकरेही सहभागी झाले आहेत. औरंगजेबाच्या कबरीला हात लागताच, या मंडळींनी उर बडवायला सुरुवात केली आहे. धर्मांध मुसलमान व हिंदुत्व विचार मानणारे यांच्यातला उभा संघर्ष हा इथेच आहे. छत्रपतींपासून ते सावरकरांपर्यंत, सावरकरांपासून ते डॉ. हेडगेवारांपर्यंत, या महापुरुषांनी याच धर्मांधतेशी लढा स्वीकारला. अंदमानच्या कारागृहात इस्लाम स्वीकारण्याचे लालूच देऊन कैद्यांना बरी वागणूक देणारा मिर्झा खान सावरकरांच्याच लक्षात आला होता.
 
कुठलेतरी अरबी, इराणी, अफगाणी व हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणारे औरंगजेबासारखे लोक जर तुमच्या आस्थेचे प्रतीक असतील, तर अशा आस्थांचा सन्मान राखणे आम्हाला शक्य नाही. सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यानंतर तिथल्या सरकारने लेनिनच्या समाधीच्या देखरेखीचा खर्च करायलाही सरळ नकार दिला होता. ‘मातुष्का रोशिया’च्या भावजागरणानंतर रशियनांनी लेनिनच्या विचारांनासुद्धा तिलांजली दिली. त्यातूनच आजचा राष्ट्राभिमानी रशिया उभा राहिला आहे. जगाच्या इतिहासात अशा घटना नव्या नाहीत. 2014 साली त्रिपुरात सत्तांतर झाल्यानंतर लेनिनचा पुतळा जेसीबी लावून पाडून टाकला होता. ज्यांचे आपल्याशी, आपल्या देशाशी, आपल्या धर्माशी काहीही देणे-घेणे नाही, अशांचे पुतळे, मजारी का जोजवायचे, हा प्रश्नच आहे.
 
धर्मांध मुसलमानांचा मूळ मुद्दा असा की, देशापेक्षा इस्लाम त्यांना महत्त्वाचा आहे. छत्रपतींचा जीव घेण्यासाठी आलेल्या अफजलखानाचा छत्रपतींनी कोथळा काढला, मावळ्यांनी त्याच्या सैन्याची दाणादाण उडवली. प्रतापगडावर जिथे त्याचा देह सौजन्य म्हणून पुरला गेला, धर्मांधांनी त्या थडग्याचा ‘पीर अफजलखान’ कधी केला, हे कुणालाच कळले नाही. जणू काही तो छत्रपतींना स्वराज्यासाठी आशीर्वादच द्यायला आला होता. अब्दुल हमीद ते अब्दुल कलाम अशा राष्ट्रभक्त मुसलमानांची एक मालिका या देशात आहे आणि त्यांची स्मारकेही आपल्या देशात आहेतच. मात्र, श्रद्धेपोटी त्यांच्या स्मृतिदिनाला फारशी गर्दी होत असल्याचे ऐकीवात नाही. हिंदूंवर आक्रमण करणार्‍यांचे मात्र ‘पीर’ केले जातात. कबर मग ती औरंगजेबाची असो किंवा याकूब मेननची, धर्मांध मुसलमानांपेक्षा बाटलेलेच त्यावर अधिक धाय मोकलून रडायला लागतात. अस्मिता या प्रखर असतात, पराक्रमाच्या निकषावर त्या सिद्ध होतात आणि त्याला धर्माभिमानाचे तेज असते. सुप्रिया सुळे, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या आस्था जरूर जाहीर कराव्यात, जेणेकरून बर्‍याच गोष्टींत सुस्पष्टता येईल.
 
Powered By Sangraha 9.0