आडवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजाराची जोरदार उसळी, सेन्सेक्सने ओलांडला ७४ हजारांचा टप्पा

निफ्टीनेही उसळी घेत ओलांडला २२ हजारांचा टप्पा

    17-Mar-2025
Total Views |
stock
 
 
मुंबई : सातत्याने तेजी- मंदीच्या हिंदोळ्यांवर हेलकावे खात असलेल्या शेअर बाजाराने आठवड्याच्या सुरुवातीलाच तेजीचा गिअर टाकला आहे. सेन्सेक्समध्ये तब्बल ३४१ अंशांची वाढ झाली. सेन्सेक्स दिवसाअखेरीस ७४,१७० अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्येही चांगली तेजी दाखवत ११२ अंशांची वाढ झाली आणि तोही निर्देशांक २२,५०९ अंशांवर बंद झाला. यामुळे गुंतवणुकदारांची आठवड्याची सुरुवात मात्र उत्साहजनक झाली. यामागे प्रामुख्याने वित्तीय कंपन्या, हेल्थकेअर तसेच धातू निर्मिती कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली वाढ हे मुख्य कारण आहे.
 
शेवटच्या सत्रात तेजीने जोर पकडला असला तरी शेअर बाजाराची दिवसाची सुरुवात मात्र अडखळत झाली. नंतर मात्र एकदम ४०० अंशांची उसळी घेतली होती. परंतु परत त्यात घसरण होत, ही वाढ ३४१ अंशांवर आली. सोमवारी तेजीत असलेल्या कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अँड महिंद्रा, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स या कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय, आयसीआयसीआय बँक, अदानी पोर्ट्स, सन फार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्येही वाढ झाली.
 
शेअर बाजारातील या घडामोडींवर शेअर बाजार तज्ज्ञांकडून सावध प्रतिक्रिया दिली गेली आहे. सोमवारी शेअर बाजारातील उसळीमागे, हेल्थकेअर तसेच वित्तीय संस्थांच्या शेअर्समध्ये झालेली वाढ कारणीभूत आहे. त्यातच महत्वाचे म्हणजे सध्या सुरु असलेले आयातशुल्कवाढीचे युध्द, त्यामुळे निर्माण झालेली अनिश्चितता यांमुळे गुंतवणुकदार अजूनही हात आखडता घेत आहेत. त्यातच देशांतर्गत गुंतवणुकीला अजूनही चालना मिळत नाही ही थोडी चिंतेची बाब असली तरी त्यातही लवकरच सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.