हर्षवर्धन सपकाळांच्या विधानानंतर सभागृहात गदारोळ! कारवाईची मागणी; काय घडलं?
17-Mar-2025
Total Views |
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी सोमवार, १७ मार्च रोजी सभागृहात केली.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचे विधानपरिषदेत जोरदार पडसाद उमटले. याविषयी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, "राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक म्हणून महाराष्ट्राने गेल्या ५ वर्षांत पाहिले. आजही राज्याचा कारभार उत्तम चालवत असताना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा फडणवीस यांचा व्यक्तिगत अपमान तर आहेच पण तर देशाला आदर्श ठरणाऱ्या, देशाला दिशा दाखविणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा अपमान आहे, या सभागृहाचाही अपमान आहे."
"राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा मी जाहीर निषेध करतो. सभागृहाने याची गंभीर दखल घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना समज देण्याची किंवा कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा," अशी मागणी प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली.