मुंबई : विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीकरिता शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेकडून संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. दरम्यान, भाजपला तीन तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली आहे. याकरिता शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. चंद्रकांत रघुवंशी हे १९९२ पासून राजकारणात सक्रिय असून त्यांनी काँग्रेस पक्षातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती.
भाजपकडून कुणाला संधी?
भाजपने रविवार, १६ मार्च रोजी विधानपरिषदेसाठी आपले तीन उमेदवार जाहीर केलेत. यात संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना संधी देण्यात आली आहे. विरोधी पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने ते उमेदवार देणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
विधानपरिषद पोटनिवडणूकीचा कार्यक्रम कसा असेल?
१० ते १७ मार्च - अर्ज भरण्याची प्रक्रिया
१८ मार्च - अर्जाची छाननी
२० मार्च - अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
२७ मार्च - सकाळी ९ ते ४ मतदान प्रक्रिया आणि त्यानंतर मतमोजणी