‘त्या’ धर्मांधांचा शोध घ्या: कपिल पाटील यांचे पोलिसांना आवाहन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल शाखेवरील हल्लाचा निषेध
17-Mar-2025
Total Views |
कल्याण: ( Kapil patil on the Rashtriya Swayamsevak Sangh childrens wing attack ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्यवीर नगर कल्याण पूर्व येथील कचोरे गावच्या बालशाखेवर रविवार, दि. १६ मार्च रोजी धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली होती. या घटनेचा डोंबिवली पाठोपाठ आता कल्याणमधून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात दगडफेक करणार्या धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या प्रकरणामागे नेमकी कोणती शक्ती काम करते आहे? याचा पोलिसांनी तपास करावा, असे आवाहन भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे.
कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा परिसरात दगडफेक प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर रमाबाई आंबेडकर उद्यान येथेही निषेध करण्यात आला. संघ स्वयंसेवक, भाजपचे पदाधिकारी आणि हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. “जिहादी भस्मासुराचा धोका ओळखा, संघ शाखेवर हल्ला करणार्या धर्मांध शक्तीचा जाहीर निषेध, ‘एक हैं तो सेफ हैं,” असे फलक हाती घेऊन स्वयंसेवकांनी घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी आ. नरेंद्र पवार यांनी हातात फलक घेऊन घटनेचा निषेध केला.
कपिल पाटील म्हणाले की, “शाखेमध्ये देशावरचे प्रेम आणि धर्म जागरणाबाबत कार्यक्रम राबविले जातात. त्याठिकाणी दगडफेक करणे, हे खर्या अर्थाने धर्मांधांचे लक्षण आहे. प्रत्येकाला आपापल्या जातीचा, धर्माचा अभिमान असला पाहिजे. मात्र, दुसर्याच्या धर्माचा अनादर करणे हा अधिकार या देशात कोणालाही नाही. संघाच्या शाखेवर दगडफेक करणार्या धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या प्रकरणामागे नेमकी कोणती शक्ती काम करते? याचा तपास पोलिसांनी करावा. पोलीस या प्रकरणामागे असलेल्या शक्तींना योग्य शिक्षा देतील,” असा विश्वास वाटतोे.