मुंबई : भारतातील खासगी क्षेत्रातील पाचव्या क्रमांकाची बँक असणाऱ्या इंडसइंड बँकेचा घोटाळा नुकताच समोर आला आहे. या घोटाळ्यामुळे बँकेच्या खातेदारांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. परंतु शनिवारी रिझर्व्ह बँकेने इंडसइंड बँकेच्या आर्थिक स्थिती स्थिर असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर आता सोमवारी शेअर बाजारात या बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. बँकेचे शेअर्स तब्बल पाच टक्क्यांनी वधारले आहेत. यामुळे या घटनेमुळे तयार झालेला तणाव आटोक्यात येण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेचे नेमके म्हणणे काय ?
इंडसइंड बँकेत झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला आणि शनिवारी याबद्दलचे निवेदन प्रस्तुत केले. रिझ्रर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार बँकेचे भांडवल उत्तम स्थितीत असून ठेवीदारांनी घाबरण्याची गरज नाही. बँकेची रोख उपलब्धता हीसुध्दा आवश्यक पातळीपेक्षा जास्त आहे. बँकेकडून लवकरच बाह्य लेखापरिक्षणाची प्रक्रिया सुरु केली गेली असून त्याचे परिणाम लवकरच दिसतील. रिझ्रर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५ च्या जानेवारी महिन्याच्या लेखापरिक्षण सुधाराची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांच्या ठेवींबद्दल सुरु असलेल्या चर्चांवर ठेवीदारांनी विश्वास ठेवू नये. थोडक्यात रिझर्व्ह बँकेने इंडसइंड बँकेची स्थिती उत्तम असल्याचा निर्वाळा दिला आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
१० मार्च २०२५ रोजी इंडसइंड बँकेकडून आपल्या डेरिव्हेटिव्हज सौद्यांमध्ये गफलत झाल्याचे सांगत हिशेबात चूक आढळून येत आहे असे जाहीर केले. विदेशी चलन व्यवहाराशी संबंधित या व्यवहारांतून बँकेला तब्बल २१०० कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याचे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले. बँकेकडून असेही जाहीर करण्यात आले की ही आतापर्यंतची माहिती ही अंतर्गत सर्वेक्षणातून समोर आली आहे. अजून बाह्य सर्वेक्षण बाकी असून आतापर्यंत आलेला तोट्याचा आकडा वाढू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. एकूणच या प्रकरणाने प्रचंड घबराट पसरुन ठेवीदारांमध्ये बँकेबद्दल अविश्वाची भावना तयार झाली. आता रिझर्व्ह बँकेकडून दिल्या गेलेल्या निर्वाळ्यानंतर परिस्थिती सुधारण्याची चिन्हे आहेत.