२०२२ साली मादी सापडली कर्नाटकात, २०२५ साली नर सापडला महाराष्ट्रात; जम्पिंग स्पायडरचा विलक्षण शोध

17 Mar 2025 21:03:24
jumping spider male



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
कर्नाटकामधील मुकांबिका वन्यजीव अभयारण्यातून २०२२ साली नव्याने शोधलेल्या हॅब्रोसेस्टम मुकांबिकाएन्सिस या कोळ्याच्या प्रजातीच्या नराचा शोध महाराष्ट्रातून लागला आहे (jumping spider male). राज्यातील सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात या नव्या प्रजातीचे नर आढळून आले आहेत (jumping spider male). त्यामुळे अधिवासाच्या विस्ताराच्या दृष्टीने पूर्वी कर्नाटकापर्यंत सिमित असलेली ही प्रजात आता महाराष्ट्रातही सापडत असल्याचे या शोधामुळे समोर आले आहे.
(jumping spider male)
 
 
 
'जम्पिंग स्पायडर' ही कोळ्यांची जात शरीरावरील डोळ्यांच्या विशिष्ट रचना आणि सतत उडी मारण्याच्या गुणधर्मामुळे ओळखली जाते. भारतात जम्पिंग स्पायडरच्या ३३० प्रजाती सापडतात. यामधीलच हॅब्रोसेस्टम मुकांबिकाएन्सिस या प्रजातीचा शोध २०२२ साली कर्नाटकातील मुकांबिका वन्यजीव अभयारण्यातून लावला होता. त्यावेळी संशोधकांनी या प्रजातीचा शोध केवळ मादी नमुन्याच्या आधारे लावला होता. त्यांना या प्रजातीचा नर आढळला नव्हता. मात्र, आता जवळपास चार वर्षांनी या नव्या प्रजातीचा नर महाराष्ट्रात आढळून आला आहे. राजेश सानप, गौतम कदम, ऋषिकेश त्रिपाठी आणि जाॅन कॅलेब यांनी हा नर महाराष्ट्रातून शोधून काढला आहे. यासंबंधीचे शोधवृत्त नुकतेच प्रकाशित झाले आहे.
 
 
 
राजेश सानप यांना हॅब्रोसेस्टम मुकांबिकाएन्सिस प्रजातीचा नर हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील विंडी हिल अ‍ॅग्रो टुरिझम रिसॉर्टच्या परिसरात आढळून आला. तर गौतम कदम आणि ऋषिकेश त्रिपाठी यांना या नराचे दर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवापूर येथील मनोहर गडावर झाले. ही दोन्ही ठिकाणे कर्नाटकमध्ये या प्रजातीचा शोध लागलेल्या ठिकाणापासून ४३० किलोमीटर लांब उत्तरेकडे आहे. त्यामुळे पूर्वी केवळ कर्नाटकातील मुकांबिका वन्यजीव अभयारण्यामध्येच सापडणारी ही प्रजात आता महाराष्ट्रात देखील सापडत असल्याचे समोर आले आहे. हॅब्रोसेस्टम मुकांबिकाएन्सिस या प्रजातीच्या नराच्या डोक्याचा विस्तार हा मादीपेक्षा थोडा मोठा असतो. महत्त्वाचे म्हणजे त्याचे पेडीपॅल्प्स नामक अवयव हे रुंद असून त्यावर पांढऱ्या रंगाचे ठिपके आहेत, जे मादीच्या पेडीपॅल्प्सवर नाहीत.
Powered By Sangraha 9.0