ठाणे : काहीही झाले तरी महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन आणि उदात्तीकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १७ मार्च रोजी दिली. भिवंडी येथे 'श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तिपीठ) परिसरा'च्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आ. किसान कथोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या देशात छत्रपती शिवरायांचे महिमामंडन होईल औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन होणार नाही. औरंग्याची कबर कशाला ही गोष्ट ठीक आहे. परंतू, एएसआयने त्याला संरक्षित स्थळ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर आहे. ज्या औरंग्याने आमच्या हजारों लोकांना मारले त्याच्या कबरीचे संरक्षण आम्हाला करावे लागणे हे दुर्दैव आहे. पण काहीही झाले तरी महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन आणि उदात्तीकरण होऊ देणार नाही. तसे करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिघळून टाकण्याचे काम करू, हे वचन देतो."
हे वाचलंत का? - राष्ट्रवादी काँग्रेसकडून विदर्भातील 'या' बड्या नेत्याला विधानपरिषदेसाठी संधी! एकाच घरात दोन आमदार?
छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचे दर्शन फळणार नाही!
"आपण आपल्या ईष्टदेवतेच्या मंदिरात जाऊन त्यांची साधना करू शकतो याचे एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी देव, देश आणि धर्माची लढाई जिंकली म्हणून आपण हिंदू आहोत आणि आपल्या देवदेवतांचे दर्शन करू शकतो. ज्याप्रमाणे हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचे दर्शन पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचे दर्शन कधीच आपल्याला फळणार नाही. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे मंदीर बांधण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टचे आभार मानतो. तुमच्या कामाकरिता मी तुमच्या ठायी नतमस्तक होतो. हे केवळ मंदीर नाही तर त्याला सुंदर तटबंदी आहे, बुरुज आहे, दर्शनीय प्रवेशाचा मार्ग, बगिचाची जागा आणि शिवरायांच्या जीवनातील सगळे प्रसंग इथे पाहायला मिळतात."
हे तर राष्ट्रमंदीर!
छत्रपती शिवरायांसोबत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि राजमाता आई जिजाऊ माँसाहेबदेखील आहे. त्यामुळे हे राष्ट्रमंदीर आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. या राष्ट्रमंदीरातून आपल्याला मोठी प्रेरणा मिळणार आहे. या देशात प्रभू श्रीरामांना आपण युगपुरुष म्हणतो. त्यांनी छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यातील पौरूष जागृत केले आणि त्यांच्या भरवशावर जगातील सर्वात मोठ्या अधर्मी शक्तीचा निप्पात केला. त्यामुळे एका नव्या युगाची निर्मिती करणारे प्रभू श्रीराम आमच्यासाठी युगपुरुष आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांनीसुद्धा अठरापगड जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यात पौरूष निर्माण केले. आपल्याला राजाकरिता किंवा सिंहासनाकरिता लढायचे नसून देव, देश आणि धर्माकरिता लढायचे आहे, या गोष्टीचे त्यांनी बीजारोपण केले. त्यातूनच पुढच्या काळात छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी यांच्यापासून मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले आणि अफगाणिस्तानपर्यंत हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा लागला. महाराज खूप लवकर आपल्यातून निघून गेले. पण त्यांनी या मराठी मातीत असा अंगार फुलवला की, त्यानंतर इथे औरंगजेबाला गाडल्याशिवाय मराठे थांबले नाहीत. मराठ्यांनी संपूर्ण मुघल साम्राज्याचा निप्पात केला आणि दिल्लीवर झेंडा गाडला. असे ते म्हणाले.
मंदिर परिसराला तीर्थस्थळाचा दर्जा देणार!
"एकोप्याने, सोबत राहणारा एकसंघ महाराष्ट्र हाच छत्रपती शिवरायांना अपेक्षित महाराष्ट्र आहे. जाती धर्मात विभंगलेला महाराष्ट्र शिवरायांना अपेक्षित नाही. त्यामुळेच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाताना तोच संकल्प घेतला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांचे जागतिक वारसास्थळांची मान्यता मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक बनवणार आहोत. यासोबतच आग्राची कोठी स्मारक म्हणून विकसित करण्यासाठी देण्याबाबत उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली आहे. या मंदिराच्या परिसराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात येणार असून मंदिराच्या विकासाकरिता आवश्यक सगळ्या गोष्टी करण्यात येतील. तसेच याठिकाणी रस्त्यांचे जाळे तयार करण्याचाही प्रयत्न करणार आहोत," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.