बालिश बहु बरळला

17 Mar 2025 12:59:59
 
 Chandrashekhar Bawankule on harshvardhan sankpal
 
मुंबई : ( Chandrashekhar Bawankule on harshvardhan sankpal ) “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे ‘बालिश बहू बरळला’ असा प्रकार झाला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांचे वक्तव्य म्हणजे अत्यंत बालिश, बेजबाबदार आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. औरंगजेब हा क्रूर, अत्याचारी, धर्मांध शासक होता, ज्याने हिंदू धर्म आणि हिंदुस्थानच्या अस्मितेवर आघात केले. त्याची तुलना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या लोकशाहीवादी, सक्षम आणि विकासाभिमुख नेत्याशी करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न आहे.
 
औरंगजेबाने धर्माच्या नावावर हिंदूंचे शिरकाण केले, मंदिरे पाडली, कर लादले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र सर्वांना घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून राज्य चालवत आहेत. त्यांच्या काळात हिंदू धर्माला अभिमानाने उभे राहण्याची संधी मिळाली,” असे मंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे.
 
गांधीजींच्या मूल्यांना तिलांजली देणारे वक्तव्य
 
“हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे,” अशी टीका महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आ. अमित गोरखे यांनी केली आहे. दिल्लीतील नेत्यांना विशेषतः राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी सपकाळ यांनी हे अविवेकी आणि बेताल विधान करून महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचा अपमान केला आहे. काँग्रेसचे हे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष स्वतःला गांधीवादी म्हणवून घेतात, महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात जाऊन ध्यानस्थ बसतात आणि दुसरीकडे गांधीजींच्या मूल्यांना तिलांजली देणारे वक्तव्य करतात. सपकाळ यांचे हे सोंग सार्‍या महाराष्ट्राला आता कळून चुकले आहे.
 
छत्रपती शिवरायांचा अपमान
 
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधायक आणि रचनात्मक कार्यातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याची संकल्पना ते पुढे नेत आहेत. असे असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची यांची तुलना क्रूरकर्मा औरंगजेब्याशी करून छत्रपती शिवरायांचा अपमान केला आहे. अनेक वर्षे महाराष्ट्राबाहेर राहिलेल्या आणि अलीकडेच दिल्लीतून थेट राज्यात आलेल्या नवशिक्या सपकाळ यांना देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाबद्दल माहिती असण्याचे काहीच कारण नाही. त्यांनी आपल्या पक्षातील राज्यातील ज्येष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा केली असती, तर असे संतापजनक विधान करण्यास ते धजावले नसते,” असे आ. अमित गोरखे यांनी म्हटले आहे.
 
हा केवळ चर्चेत राहण्याचा प्रयत्न
 
“औरंगजेबाची तुलना देवेंद्र फडणवीस यांच्याशी करून काँग्रेस महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करत आहे. सपकाळ आणि काँग्रेसने खालची पातळी गाठली आहे. त्यांच्या याच बालिश मानसिकतेमुळे काँग्रेसला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावे लागते आणि असे हास्यास्पद वक्तव्य करून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, ती सपकाळ आणि काँग्रेसला जागा दाखवून देईल,” असे बावनकुळे यांनी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0