मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Aurangzeb Kabar Demolished in Kolhapur) छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापलंय. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने सोमवारी राज्यव्यापी आंदोलन करत, औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशाराही दिला. अशातच कोल्हापुरात बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसले. औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणून ती तोडल्याचे कोल्हापुरात पाहायला मिळाले.
आंदोलनावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका टेम्पोतून औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणली होती. त्यासोबत औरंगजेबाचा एक फोटोही ठेवण्यात आला होता. दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक कबरीवर दगडफेक केली तसेच औरंगजेबाचा फोटोही उध्वस्त केला. पोलिसांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले.