मुंबई : पुणे महापालिकेच्या नाट्यगृह आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या 'रंगयात्रा' या ऑनलाइन ॲप्लिकेशनला नाट्यनिर्माते, रंगकर्मी, तंत्रज्ञ आणि विविध सांस्कृतिक संस्थांनी विरोध दर्शवला आहे. या निर्णयाविरोधात बालगंधर्व रंगमंदिर येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेते आणि राज्य नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनीही सहभाग घेतला.
प्रशांत दामले यांनी महापालिकेच्या या नव्या उपक्रमाविषयी नाराजी व्यक्त करताना म्हटले की, “महापालिकेच्या अखत्यारित १४ नाट्यगृहे आहेत आणि ती नाटकांसाठीच वापरण्यात यायला हवीत. मात्र, नव्या प्रणालीमुळे ही नाट्यगृहे सर्वांसाठी खुली करण्यात आली आहेत, त्यामुळे नाटकांसाठी उपलब्धता मर्यादित होईल.” त्यांनी पुढे सांगितले की, "या निर्णयापूर्वी नाट्यसृष्टीतील प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आलेली नाही. आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय असे बदल करू नयेत."
महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, पूर्वी नाट्यगृह आरक्षणासाठी इच्छुकांना थेट कार्यालयात जावे लागत असे. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी 'रंगयात्रा' हे ऑनलाइन बुकिंग ॲप विकसित करण्यात आले आहे. मात्र, रंगकर्मींच्या मते, हे ॲप नाटकांऐवजी इतर कार्यक्रमांसाठी नाट्यगृहे अधिक सहज उपलब्ध करून देईल, ज्यामुळे नाट्यसंस्कृतीवर परिणाम होईल. या आंदोलनानंतर नाट्यसृष्टीतील व्यक्तींनी महापालिकेकडे पुनर्विचार करण्याची मागणी केली असून, या निर्णयावर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे.