स्पाईस जेटच्या क्रू मेंबर्सनं साजरी केली होळी! उद्धव ठाकरेंच्या 'या' महिला खासदारांना खुपला रंग

15 Mar 2025 17:39:12

ubt mp priyanka chaturvedi raised question on spicejet holi celebration
 
नवी दिल्ली : (Priyanka Chaturvedi on SpiceJet Holi Celebration) देशभरात १४ मार्चला धूलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, १३ मार्चला राजधानी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानातील प्रवाशांनादेखील होळीचा आनंद लुटण्याची संधी मिळाली. स्पाईस जेटच्या क्रू मेंबर्सकडून प्रवाशांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, उबाठा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या सगळ्यावरुन स्पाइस जेटवर निशाणा साधत टीका केली आहे.
 
होळीच्या निमित्ताने स्पाईस जेटच्या क्रू मेंबर्सनी चंदनाचा टिळा लावून प्रवाश्यांचे स्वागत केले. त्यानंतर गाणी लावून नाचगाणंही झाले. या सगळ्या जल्लोषात प्रवासीही सहभागी झाले. यानंतर प्रवाश्यांमध्ये मिठाई वाटण्यात आली. यानंतर एअरलाइन्सकडून सांगण्यात आले की, “हे सगळं करताना आम्ही सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली होती. कोणालाही त्रास होऊ नये म्हणून हे सगळं काळजीपूर्वक करण्यात आले.”कंपनीचे म्हणण्यानुसार , २०१४ पासून ते अशा प्रकारे होळी साजरी करत आहेत, जेणेकरून प्रवाशांना एक अविस्मरणीय अनुभव मिळेल. अनेक प्रवाशांनी त्यांचे कौतुक करत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केले आहेत.
 
मात्र अश्याप्रकारे विमानात होळी साजरी करणे उबाठा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांना फारसे रुचलेले दिसत नाही. यावर त्यांनी नाराजी व्यक्त करत एक्स माध्यमावर पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, “हे योग्य नाही. लोकप्रियतेसाठीमर्यादा ओलांडल्या आहेत. एअरलाइन्सनीं मनोरंजनाऐवजी सुरक्षितता आणि वेळेवर उड्डाण करण्यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे." खासदार प्रियांका यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तो केवळ एक आनंदाचा प्रसंग होता, चुकीच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे , अश्या शब्दांत लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, स्पाइसजेटनेही आपल्या निवेदनात सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली नसल्याचे वारंवार म्हटले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0