आध्यात्मिक अनुभूतीची प्रचिती देणारी 'जय जय स्वामी समर्थ' मालिका!

    15-Mar-2025
Total Views |



Jai Jai Swami Samarth marathi series that gives a sense of spiritual experience


'जय जय स्वामी समर्थ’ या सुप्रसिद्ध मालिकेच्या सेटवर भेट देण्याचा नुकताच योग आला. तिथे पोहोचल्यावर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. मालिकेतील कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ सगळ्यांचाच हा केवळ एक कामाचा भाग नाही, तर त्यांच्यासाठी हा एक आध्यात्मिक प्रवास ठरला आहे. मी समर्थांचे नाव जरी घेतले, तरी मन शांत होते. मनातील अस्वस्थता दूर होते आणि भक्तिभाव अधिक गहिरा होतो. त्यांच्या स्मरणाने संकटांवर मात करण्याची नवी ऊर्जा मिळते.


उगाची भितोसी भय हे पळू दे,
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे।
जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांच्या,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा॥



अशा या स्वामीभक्तीचा आणि त्यांच्या दिव्य लीलांचा अनुभव प्रेक्षकांना ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेतून येत आहे. कलाकारांनी या भूमिकांसाठी केवळ अभिनयच केला नाही, तर त्यांनी स्वामी समर्थांचे चरित्र, त्यांचे ग्रंथ आणि विचार सखोल अभ्यासले आहे. मालिकेच्या निर्मितीदरम्यान अनेकदा अशा काही घटना घडल्या, ज्या योगायोग म्हणून नाकारता येणार नाहीत. चित्रीकरणदरम्यान काही कलाकारांना अचानक समाधानाची अनुभूती आली. काहींना असे वाटले की, जणू काही दैवी शक्तीच त्यांच्या भूमिका साकारण्यात मार्गदर्शन करीत आहे. काही कलाकारांनी अनुभव सांगितले की, चित्रीकरणदरम्यान अनपेक्षित शांतता, समाधान किंवा ऊर्जा जाणवत होती.


...ही तर स्वामींचीच कृपा

या मालिकेतील काही प्रसंग चित्रित करताना कलाकारांना खर्‍या अर्थाने स्वामी समर्थांचा आशीर्वाद असल्यासारखी जाणीव झाली. विशेषतः ज्या क्षणी मोठे आध्यात्मिक प्रसंग साकारले जात होते, तेव्हा सेटवरील वातावरण भारावल्यासारखे वाटायचे. अशाच प्रसंगाबद्दल प्रतिक्रिया देणारे श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारणारे अक्षय मूडवाडकर म्हणाले की, “स्वामींचा आशीर्वाद आणि प्रेक्षकांची साथ असल्यामुळे आम्ही हे शिवधनुष्य पेलू शकतो. आज या प्रवासाला स्वामींच्या कृपेने पाच वर्षे पूर्ण झाली आणि १ हजार, ४०० भागांचा टप्पा पूर्ण झाला. मी स्वत:ला खरंच भाग्यवान समजतो. आमच्या या प्रवासात प्रेक्षकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, मालिकेच्या प्रत्येक कलाकारांना खूप प्रेम दिले. एकूणच स्वामींचा आशीर्वाद आणि प्रेक्षकांची साथ असल्यामुळे आम्ही हे शिवधनुष्य पेलू शकतो. ज्यावेळी मला पहिल्यांदा कळाले, त्यावेळी अंगावर काटा आला. स्वामींचे नाव घेऊन मी कामाला सुरुवात केली. एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात त्याच्या कारकिर्दीची सुरुवात अशा संताच्या भूमिकेने व्हावी, जे स्वत: ब्रह्मांडनायक आहेत आणि त्या भूमिकेने सुरुवात झाली, ही स्वामींची कृपा आहे. आता कर्ताधर्ता स्वामीच आहेत; तर इथून पुढे मला काळजी करण्याची काही आवश्यकता नाही.”


मालिकेच्या माध्यमातून मला रोज नव्याने स्वामी कळतात


कलाकार, दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमसाठी ही मालिका फक्त एक प्रोजेक्ट नसून, एक आध्यात्मिक यात्रा ठरली आहे. याविषयी मालिकेचे दिग्दर्शक दिगंबर फासाटे दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना म्हणाले की, “आम्हाला अक्षयमध्ये स्वामी दिसतात. त्यांचा आशीर्वाद घेऊनच चित्रीकरणाला सुरुवात करतो. कधीच असे वाटले नाही की, आता बराच काळ लोटून गेला. रोज नव्याने काम करतो आहे. या वातावरणात अजूनही तीच प्रसन्नता आहे. स्वामींचे नाव घेऊन मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात होते. प्रत्येकवेळी आम्हाला अक्षयमध्ये स्वामी आशीर्वाद देऊन जातात. या मालिकेच्या माध्यमातून मला रोज नव्याने स्वामी कळतात आणि मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की, मला त्यांच्या या मालिकेचे दिग्दर्शन करायला मिळते. बर्‍याचदा मालिकेमध्ये काम करणारे कलाकार प्रसिद्ध असतात. पण, स्वामींमुळे मला माझी ओळख मिळाली, प्रसिद्धी मिळाली. मालिकेचा प्रत्येक भाग स्वामीच करून घेतात. स्वामी जोपर्यंत चालवणार तोपर्यंत ही मालिका चालणार आहे. काही प्रसंगांमध्ये स्वामी आदेश, आज्ञा देतात, त्यावेळी कळत नकळतपणे ते आपल्या जीवनाशी इतके मिळते जुळते असते की, असे वाटते, अरे स्वामींनी आपल्या प्रश्नाचे किती सहज उत्तर दिले. स्वामींची लीला एवढी आहे की, ते एका दिवसात सांगून अथवा वाचूनही कळणार नाही.