बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार

15 Mar 2025 16:08:38

badalapur karjat line extention


मुंबई,दि.१५ : प्रतिनिधी केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'पीएम गतिशक्ती' अंतर्गत 'नेटवर्क प्लॅनिंग गटा'च्या '89व्या' बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार व कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून या निर्णयासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले.

दरम्यान,नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप (एनपीजी) च्या शुक्रवार, दि.१४ रोजी झालेल्या 89व्या बैठकीत रस्ता, रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांबाबत चर्चा झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) चे संयुक्त सचिव पंकज कुमार होते. या बैठकीत पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखडा (पीएमजीएस एनएमपी) च्या अनुषंगाने बहुपर्यायी कनेक्टीव्हिटी आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारण्यावर भर देण्यात आला. एनपीजीने आठ प्रकल्पांचे मूल्यमापन केले. त्यामध्ये चार रस्ते, तीन रेल्वे आणि एका मेट्रो प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे एकीकृत बहुआयामी पायाभूत सुविधा ,सामाजिक आणि आर्थिक भागांच्या अखेरच्या टोकापर्यंत कनेक्टीव्हिटी आणि इंटरमोडल समन्वय या पीएम गतीशक्ती योजनेच्या तत्वांना अनुसरून हे मूल्यमापन करण्यात आले.

यात महाराष्ट्रातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार करण्यास मंजुरी देण्यात आली. ३२.४६० किमी लांबीच्या या ब्राउनफिल्ड प्रकल्पामुळे मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाढत्या प्रवासी आणि माल वाहतुकीमुळे होणाऱ्या विलंबावर उपाय तसेच बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी आणि कर्जत यांसारख्या प्रवाश्यांच्या आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांच्या कनेक्टीव्हिटीमध्ये वाढ अपेक्षित आहे.

"हा पायाभूत प्रकल्प 'पीएमजीएस एनएमपी'च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, यामुळे विविध ठिकाणांदरम्यान जोडणी सुधारेल, कार्यक्षमतेत वाढ होईल आणि स्थानिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी केंद्र सरकार आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे आभार!"

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
Powered By Sangraha 9.0