भारताच्या कानाकोपर्यात आपल्या संस्कृतीच्या आणि सांस्कृतिक वैभवाच्या पाऊलखुणा जागोजागी दिसतात. यातल्या काही अतिशय प्रसिद्ध आणि सतत पर्यटकांनी भरलेल्या आहेत; पण अनेक जागा या आडवाटेवरच्या आणि काहीशा प्रसिद्धीच्या झोकातून बाहेर असलेल्या दिसतात. अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या जागेचा परिचय आज आपण करून घेणार आहोत. ‘हम्पी’ हे नाव तुम्ही ऐकले असेलच. कदाचित त्या ठिकाणी जाऊनदेखील आला असाल. विजयनगरचे भव्य साम्राज्य डोळे भरून बघितले असेल. याच हम्पीपासून फक्त 90 किमी अंतरावर, बेल्लारी-गदक रस्त्यावर एक छोटसे गाव आहे, त्या गावाचे नाव लक्कुंडी.
आजपासून साधारण हजार-बाराशे वर्षांपूर्वी हे गाव अतिशय वैभव संपन्न होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्ञानदानाची अनेक केंद्र (विद्यापीठे) होती. इथून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्तीदेखील दिल्या जात होत्या. ज्ञान, कला, व्यापार, सुपीक जमीन, महत्त्वाचे भौगोलिक स्थान असलेले हे गाव आपल्या ताब्यात राहावे म्हणून कल्याणीचे चालुक्य, सेऊण राजे, होयसळ राजघराणे इत्यादी राजसत्ता अथक प्रयत्न करत होत्या. इथे राज्य करताना त्या त्या राजघराण्यांनी खूप सुंदर हिंदू तसेच, जैन मंदिरांची निर्मितीदेखील केली. या छोट्याशा गावाला मंदिर स्थापत्याचे विद्यापीठ असे आपण नक्कीच म्हणू शकतो. इसवी सनाच्या चौदाव्या शतकात सुलतानांच्या आक्रमणात हे गाव आपले सगळे वैभव गमावून बसले. पण, त्याची जाणीव इथल्या स्थानिकांना नक्कीच होती. कदाचित याचसाठी काही वर्षांपूर्वी लक्कुंडी गावातल्या लोकांनी एकत्र येऊन आपापल्या घरात असणारी अनेक प्राचीन नाणी, मूर्ती, खापराचे तुकडे, दगडी हत्यारे असा सर्व प्राचीन ठेवा पुरातत्त्व खात्याकडे जमा केला. स्थानिकांनी एकत्र केलेल्या या वारशाच्या खुणा आज लक्कुंडी गावातल्या उत्तम व्यवस्थापन असलेल्या संग्रहालयात आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या सर्वांसाठी या गावाने घालून दिलेला हा उत्तम आदर्श आहे.
जेम्स फर्ग्युसन नावाच्या स्कॉटिश पुरातत्त्व अभ्यासकाने 19व्या शतकात या गावाला भेट दिली आणि 30पेक्षा जास्त शिलालेखांची नोंद आपल्या अभ्यासात केली. यातला एक शिलालेख हा आठव्या शतकातला असून, त्यातदेखील या गावाचा उल्लेख केलेला आढळतो. इसवी सन 1192 साली या गावाला होयसळ राजा बल्लाळ दुसरा याने आपली राजधानी बनवली, असेदेखील शिलालेखात नमूद केलेले आहे. त्याच काळात इथे खूप मोठी टंकसाळ म्हणजे नाणी बनवण्याचा कारखाना होता. ज्यात सोन्याची नाणीदेखील घडवली जात होती. मधुसूदन ढाकी यांनी लिहिलेल्या ‘इनसायक्लोपीडिया ऑफ इंडियन टेम्पल आर्किटेक्चर’ या पुस्तकात इथल्या मंदिरांचे विस्तृत वर्णन केलेले आहे.
लक्कुंडी गावातल्या संग्रहालयाच्या थोडेसे वरच्या बाजूला ‘जिनालय’ म्हणजे जैन मंदिर आहे. हे मंदिर या भागातले बांधले गेलेले पहिले मंदिर असावे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, इथे नेहमी वापरला जाणारा दगड न वापरता वेगळा दगड
या मंदिरासाठी वापरला गेला. हा दगड कोरण्यासाठी थोडा सोपा असून कालांतराने तो घट्ट होतो. कदाचित यामुळेच जैन मंदिरावर नक्षीकाम हे खूप बारीक करणे स्थपतींना शक्य झाले असावे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना असून, दुर्दैवाने आज गर्भगृहात कुठलीही मूर्ती नाही. पण, आतल्या मंडपामध्ये गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अतिशय सुंदर असे सरस्वती आणि ब्रह्मदेव कोरलेले दिसतात. या ब्रह्मदेवाच्या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे, पाठीमागे वाकून बघितल्यावर ब्रह्मदेवाचा चौथा चेहरादेखील इथे कोरलेला दिसतो.
जैन मंदिरापासून जवळ, मुख्य रस्त्यावर काशीविश्वेश्वर नावाचे अजून एक मंदिर आहे. सर्व मंदिरांपैकी या मंदिरावर सर्वाधिक नक्षीकाम आणि शिल्प कोरलेली दिसतात. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपण चार पायर्या चढून वर जातो आणि एकाच मुखमंडपात डावीकडे आणि उजवीकडे अशी दोन मंदिरे दिसतात. या मंडपाला आधी वितान म्हणजे छत असावे, असे बांधणीवरून लक्षात येते. त्यातलेमोठे मंदिर शिवाला तर छोटे मंदिर सूर्याला अर्पण केलेले आहे. मंदिर स्थापत्याशी निगडित वेगवेगळ्या शैलीदेखील या ठिकाणी एकत्र वापरलेल्या दिसतात. मंदिराचा मंडप हा स्तंभ आणि अर्धस्तंभ यांच्या वरती उभा आहे. काळ्या कुळकुळीत दगडांवरती उत्तम नक्षीकाम केलेले दिसते. या स्तंभांच्या वरच्या बाजूला म्हणजेच स्तंभशीर्षावरती भारवाहक यक्ष कोरलेले दिसतात. काशीविश्वेश्वर मंदिराच्या सर्व द्वारशाखा (प्रवेशद्वाराच्या शेजारी असणार्या पट्ट्या) हा एक थक्क करणारा भाग आहे. अतिशय बारीक आणि सुबक नक्षीकाम, विविध गंधर्व, देवता आणि द्वारपाल असलेल्या शाखा आपले लक्ष वेधून घेतात. मंडपात एका बाजूला नऊ आकृतींचा एक शिल्पपट दिसतो. या दुसर्या-तिसर्या कोणी नसून ‘सप्तमातृका’ आहेत. शिल्पपटाच्या सुरुवातीला शिव किंवा वीरभद्र असतो आणि मग नंतर ब्रम्हाणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा या मातृका दिसतात, तर सर्वांत शेवटी यांचे रक्षण करण्यासाठी गणपतीदेखील कोरलेला दिसतो.
मंदिराच्या मंडोवरावर म्हणजेच बाह्य भिंतीवर रामायण-महाभारत, विविध पुराणे यांच्यातल्या कथा कोरलेल्या आहेत. इथे मन लावून नृत्य करणारा नृत्य गणेश आणि बारीक लक्ष देऊन लिहिणारा गणपती असे दोघेही दिसतात. गळ्यात नरमुंडमाळा, डोक्यावर जटा, मोठे डोळे असलेला आणि हातामध्ये खटवांग म्हणजेच कवटी असलेला दंड धारण केलेला भैरव पण दिसतो.
रावणाने कैलास पर्वत उचलून लंकेमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला; पण शिवाने निव्वळ पायाच्या अंगठ्याने तो पर्वत खाली दाबून रावणाचे गर्वहरण केले. ही कथा अनेक मंदिरांमध्ये कोरलेली दिसते. इथेदेखील या कथेचे शिल्पं असून ते आकाराने छोटे असले, तरीही त्यातली प्रमाणबद्धता आणि कथेमधले बारीकसारीक अंश यत्किंचितही कमी झालेले नाहीत. या भग्न झालेल्या छोट्याशा शिल्पातदेखील रावणाची घाबरलेली मुखे आणि शंकराचा संयम आपल्याला बघता येतो. गजासूर नावाच्या असुराने पार्वतीच्या लालसेने आक्रमण केल्यावरती शिवाने मधोमध त्याला फाडून आपल्या सर्व हातांमध्ये त्याचे कातडे वरती ताणून धरले ही गजासुर संहाराची कथादेखील या मंदिरात कोरलेली आहे. पाठीमागच्या बाजूला अजून एक छोटेसे शिल्प आपल्याला दिसते, ज्यामध्ये काही माकडे जीवाच्या आकांताने मोठे दगड उचलून आपला राम सीतामाईपर्यंत पोहोचावा म्हणून सेतू बांधताना दिसतात.
जिनालय आणि काशीविश्वेश्वर यांच्याबरोबरच 50 ते 60 इतर मंदिरेदेखील या गावात आहेत. त्याचबरोबर अनेक बारवदेखील इथे कोरलेल्या आहेत आणि त्याभोवती शंकराला अर्पण केलेली छोटी छोटी मंदिरे पण दिसतात. या गावातली लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे, मंदिरांच्या आवारात असणारी अप्रतिम स्वच्छता आणि हिरवागार मंदिर परिसर. असे हे अद्भुत लक्कुंडी गाव तुमच्या माझ्यासारख्या प्राचीन भारतीय इतिहास आणि मंदिरांवर प्रेम करणार्या लोकांची वाट बघत उभे आहे. हम्पीला जाताना किंवा येताना इथे भेट द्यायला अजिबात विसरू नका. भेट द्यायला जाताना एक छोटी काळजी मात्र सगळ्यांनी घेऊया. आजूबाजूला फार मोठी हॉटेल्स नसल्यामुळे थोडे खाण्याचे काहीतरी सामान मात्र नक्की बरोबर ठेवा. कारण, मंदिरे बघताना मंत्रमुग्ध होऊन वेळ कसा निघून जातो, हे कळतदेखील नाही!
एकदा ही दगडाची भाषा आपल्याला यायला लागली की, मग ही मंदिरे आपल्याशी अजून छान बोलायला लागतील. या लेखमालेच्या माध्यमातून ही भाषा शिकायचा प्रयत्न आपण हळूहळू करत राहूया. पुढच्या भागात आपल्या सर्वांच्या लाडक्या गोवा राज्यातील एका प्राचीन मंदिराचा परिचय करून घेऊयात.
heritagevirasat@gmail.com
7841934774