नवी दिल्ली : शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित नवी दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे. तसेच या पत्रातून त्यांनी पंतप्रधान मोदींकडे एक मागणीदेखील केली.
पत्रात काय?
"२१ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याची माझी विनंती स्विकारल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. सरहद पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांनी आयोजित केलेल्या या साहित्य संमेलनाला तुमच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. तुमचे सखोल आणि अभ्यासपूर्ण भाषण जगभरातील मराठी लोकांना खूप भावले," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी लातूरमध्ये गुन्हा दाखल! ९ जणांची नावे समोर
शरद पवारांची मागणी कोणती?
"तालकटोरा स्टेडियमला प्रचंड ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. एकेकाळी पेशवे बाजीराव पहिले, महादजी शिंदे आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांनी येथे तळ ठोकला होता, त्यांचा वारसा आपल्या राष्ट्राच्या इतिहासाच्या रचनेत कोरला गेला होता. त्यामुळे सरहद, पुणे यांनी सुरुवातीला या ठिकाणी या महान योद्ध्यांचे अर्धपुतळे बसवण्याचा प्रस्ताव मांडला. तर अनेक साहित्यिक आणि हितचिंतकांनी पूर्ण आकाराचे अश्वारुढ पुतळे उभारण्याची मागणी केली. तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली महानगरपालिका (एनडीएमसी) च्या अखत्यारीत येत असल्याने, पूर्ण आकाराचे अश्वारुढ पुतळे उभारण्यासाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी दिल्ली सरकार आणि एनडीएमसीला निर्देश देण्यासाठी आपण हस्तक्षेप करावा," अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.