औरंग्याला विरोध पण कबरीला समर्थन; महाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका
15-Mar-2025
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Aurangzeb Kabar Controversy) समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर औरंग्याची कबर उखडून काढण्याच्या मागणीला पुन्हा जोर धरू लागला. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने सोमवारी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. अशातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, उबाठा खासदार अरविंद सावंत, इत्यादींनी औरंग्याच्या कबरीच्या बाजूने आपलं झुकतं माप ठेवल्याचं दिसतंय.
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, २७ वर्ष औरंगजेबाला येथे राहून राज्य करता आले नाही; त्याचे प्रतीक म्हणजे औरंगजेबाची कबर आहे, त्यामुळे एक प्रतीक म्हणून त्या कबरीला हात न लावण्याचे योग्य ठरेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मते, औरंगजेबाची कबर म्हणजे विरत्वाची कबर नाही तर ती कबर क्रूरपणाची आहे. ती कबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देखील आहे. त्यामुळे औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे.
औरंगजेब क्रूर होता हे स्पष्टच आहे. परंतु छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाला गाढलं हे दाखवण तितकंच गरजेचं आहे. ते काढून टाकलं तर औरंगजेबाला कुठे गाढलं हे कळणार नाही, अशी भूमिका उबाठा खासदार अरविंद सावंत यांनी मांडली आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव झाला. त्यानंतर आता कबरीच्या वादात उडी मारून अशा प्रकारची विधाने करणे म्हणजे औरंग्याला विरोध पण कबरीला समर्थन अशा प्रकारची भूमिका यातून स्पष्टपणे दिसतेय.
मिलिंद एकबोटेंना ५ एप्रिल जिल्हाबंदी
धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा दिला होता. याबाबत गंभीरतेने दखल घेत प्रशासनाने मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना १६ मार्च २०२५ ते ५ एप्रिल जिल्हाबंदी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी मिलिंद एकबोटे आपल्या कार्यकर्त्यांसह कबर नष्ट करणार असल्याची वार्ता पसरली होती, त्यामुळे प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचे सांगिण्यात येत आहे.