नागपूर (Nana Patole) : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर खुर्च्यांच्या अदलाबदलीवरून चर्चाही झाल्या. त्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, असे नाना पटोले म्हणाले. यामुळे आता राज्याच्या राजकीय परिस्थितीत उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नाना पटोले यांनी धुलिवंदनाच्या निमित्ताने नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधला आहे. त्यावेळी बोलत असताना पटोलेंनी बुरा न मानो होली है म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काँग्रेससोबत येण्याची ऑफर देत त्यांची वाईट अवस्था असून पक्ष टिकेल की नाही माहिती नाही. भाजप त्यांना जगूच देणार नाही. अजित पवार यांनी सादर केलेला यंदाचा अर्थंसंकल्पा हा विना पैशांचा आहे, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
त्यानंतर ते पुढे म्हणाले की, त्यांनी आमच्यासोबत यावे. आमचाही एक राष्ट्रीय एक राष्ट्रीय पक्ष आहे, आम्ही त्यांची काळजी घेऊ, त्यात त्यांना मुख्यमंत्री पदाची ओढ लागली आहे. आम्ही काही दिवस दोघांनाही मुख्यमंत्री पदाची संधी देऊ. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काही दिवस मुख्यमंत्री पदाची धुरा देऊ, असे नाना पटोले म्हणाले आहेत.