बीड (Khokya Bhosale) : बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच धनंजय देशमुख यांना मारहाण केल्याप्रकरणाचा व्हि़डिओ काही दिवसांआधी व्हायरल झाला. त्यानंतर फोटोत दिसणाऱ्या आरोपींची माहिती समोर आली. त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा विश्वासू असलेल्या वाल्मिक कराडला मुख्य गुन्हेगार ठरवले आहे. यानंतर आता बीडमधील गुन्हेगारांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. अशातच आता बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्याचे अनेक मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे खोक्या भोसलेच्या पोलिसांनी प्रयागराजमध्ये मुसक्या आवळल्या आहेत. तसेच त्याच्या अनधिकृत बांधकामावर प्रशासनाने बुलडोझर चढवला. तसेच त्याला न्यायालयीन कोठडीही सुनावणी करण्यात आली आहे.
काही दिवसांआधी सतीश भोसलेने एका टेलिव्हिजन वृत्तवाहिनीला आपली प्रतिक्रीया दिली. त्यावेळी त्याने आपण समाजसेवा करत असल्याचे सांगितले. तेव्हा माध्यमाने आपण पोलिसांना शरण का जात नाहीत? असा प्रश्न विचारला असता, त्याने सांगितले की, मी चुकीचे केले नसून मी जर काही चुकीचे केले असते तर मी शिक्षा भोगण्यास तयार आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असून तो १२ मार्च २०२५ रोजी प्रयागराजमध्ये पोलिसांच्या हाती सापडला. बीड पोलीस आणि प्रयागराज पोलिसांनी एकमेकांशी संपर्क साधत खोक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान, सतीश भोसले हा आमदार सुरेश धश यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे फोटोही व्हायरल होत आहेत. अशातच सुरेश धस यांनी सतीश भोसलेवर कारवाईचे आदेश दिले होते. त्याची जर चूक असेल तर कारवाई झालीच पाहिजे, असे सुरेश धस म्हणाले होते. सतीश भोसलेने वन विभागाच्या जमिनीवर अनाधिकृत बांधकाम केले. त्यावर स्थानिक प्रशासनाने बुलडोझर चालवला आहे. दरम्यान, आता खोक्या भोसलेला संभाजीनगरात दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.